‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आताच्या कलमात ‘ ज्येष्ठ ’ शब्द वडील पुत्रास अगर वडील कन्येस अशा दोन प्रकारांनी योजिण्यात आला आहे. याशिवाय चांद्रमानाने वर्षाचे जे बारा महिने मानिले आहेत, त्यांतही ‘ ज्येष्ठ ’ या नावाचा एक महिना आहे. अशा प्रकारे ही संज्ञा तीन ठिकाणी लागू शकली, यावरून या तिन्ही ठिकाणांस मिळून ‘ त्रिज्येष्ठ ’ अशा पारिभाषिक संज्ञा देण्यात आली आहे, व या तिन्ही ज्येष्ठांची गाठ कधी पडू देऊ नये असा ज्योतिषशास्त्राने निर्बंध केला आहे. म्हणजे ज्येष्ठ वराचा, ज्येष्ठ वधूशी, ज्येष्ठ महिन्यात विवाहसंबंध निषिद्ध मानण्यात आला आहे. अर्थात ज्येष्ठ महिन्यात विवाहकर्तव्य झाल्यास वर आणि वधू यांपैकी कोणी तरी एकजण ज्येष्ठ असल्यास चालेल. कित्येक ग्रंथकार तर वधूवरे उभयता केव्हाच ज्येष्ठ नसावी असे सांगतात. व अशांनी एकमेकांस वरण्यापेक्षा खुशाल मरण पत्करावे असेही त्यांचे मत आहे. कोणी कोणी तर ज्येष्ठ महिन्यात अपत्याचे मांगलिक कार्य करू नये असे प्रतिपादन करितात. म्हणजे दोन ज्येष्ठ शब्दही एकत्र येऊ देणे प्रशस्त नाही हे त्यांच्या प्रतिपादनाचे तात्पर्य आहे. कोणाचे मते सूर्य कृत्तिका नक्षत्रावर असेल तर ज्येष्ठ महिन्यांतही ज्येष्ठाचा विवाह होण्यास अडचण नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP