जन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
पुरुष अगर स्त्री यांचा जन्म ज्या नक्षत्रावर, ज्या महिन्यात व ज्या तिथीस झाला असेल, त्या नक्षत्रावर, त्या महिन्यात व त्या तिथीस त्यांचे कोणतेही मांगलिक होऊ नये. असा ज्योतिषग्रंथांचा सामान्यत: आशय आहे. तथापि हा निषेध केवळ ज्येष्ठ अपत्य - मग ते पुत्र असो अगर कन्या असो, तेवढ्यापुरताच समजला जातो. अर्थात एक ज्येष्ठ अपत्याखेरीजकरून बाकीच्या संततीचे विवाहकार्य त्या संततीच्या जन्मनक्षत्रावर, जन्ममासात किंवा जन्मतिथीस झाले असता काही दोष नाही; व च्यवन, चंडेश्वर इत्यादी ग्रंथकारांच्या मते जन्मनक्षत्रादिकांवर अशा अपत्यांचा विवाह झाला असता स्त्रीस पुत्रसंतती होते, तिच्यावर पती प्रीती करितो, व तिला संतती आणि सौख्य यांचा उपभोग दीर्घकाळपावेतो घडतो. जन्मदिवस अगर जन्मतिथी इत्यादिकांसंबंधाने जगन्मोहननामक ग्रंथात पुढील निषेध लिहिला आहे :
जातं दिनं दूषयते वसिष्ठ: पंचैव गर्गस्त्रिदिनं तथात्रि: ।
तज्जन्मपक्षं किल भागुरिश्च ग्रते विवाहे गमने क्षुरे च ॥
अर्थ : वसिष्ठाच्या मते नुसता जन्मदिवसच, गर्गाच्या मते त्या तिथीपासून पाच दिवस, अत्रीच्या मते जन्मस्थितीपासून तीन दिवस, व भागुरीच्या मते तो संबंध पंधरवडा, याप्रमाणे मुदतीत व्रत, विवाह, प्रवासारंभ आणि श्मश्रू ही कर्मे करू नयेत. जन्माचा महिना म्हणजे चैत्र, वैशाख इत्यादी प्रकारे कोणी समजतात, व कोनी कोणी जन्मतिथी पासून तीस दिवसांचा महिना मोजतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP