वरील कलमात लिहिलेला प्रकार शोचनीय खरा, तथापि तो समाजातल्या समाजात तूर्त बेबंदपादशाहीचा प्रकार झाल्यामुळे होतो, तेथे निरुपाय आहे. ही शोचनीयता आपसांतीलच असते, यामुळे कालान्तराने उभयपक्षांची समजूत पडली असता तिचा जोर कमी होऊ शकेल; व तिचे दुष्परिणामही त्या मानाने कमी कमी होत जातील. आज स्थितीला व्यक्तिविशेषाकडे दृष्टी गेल्याने वरकुलाची वर्ज्यावर्ज्यता होते, तो प्रकार पुढेमागे नाहीसा होऊन जाण्याची आशा आहे. अशा व्यर्थ होयअसे जरी म्हटले, व ते खरे असले, तरीदेखील स्त्रीजातीचा विवाहसंबंध एकदाच काय तो व्हावयाचा असतो; सबब तो कोणाशी ना कोणाशी तरी एक वेळ होऊन गेला म्हणजे स्त्रीविशेषाच्या दृष्टीने तिचे जन्माचे काम होऊन जाते; व पुढे कोणतीही स्थिती स्त्रीजातीस प्राप्त झाली, तरी ती जगातील नेहमी अनुभवास येणार्या व्यवहारांपैकीच असल्यामुळे तिचे कोणास फ़ारसे अवघड वाटत नाही. परंतु जगात केव्हा केव्हा निव्वळ लबाडीचे प्रकार घडतात, व त्यांचे घातक परिणाम मात्र स्त्रीजातीस विनाकारण जन्मभर सोशीत राहण्याची पाळी येते.
जगात अनेक प्रकारचे ढोंगी लोक असतात, व त्यांमध्ये केव्हा केव्हा परधर्मी अगर धर्मान्तर केलेले लोक, किंवा इतर प्रकाराने दोषी झालेले लोक केवळ ढोंगाच्या आश्रयाने बिचार्या स्त्रीजातीस नाडणारे असेही आढळतात. एखाद्या विशेष स्त्रीचा अभिलाष धरून, अथवा इतर कोणत्या तरी हेतूच्या साधनार्थ, परधर्मी अगर धर्मान्तर पावलेले लोक आपला वेश बदलतात, व आपण त्या स्त्रीच्याच जातीचे आहोत अशी तिच्या पालकांची व दात्यांची समजूत घालून आपला कार्यभाग साधितात. केव्हा केव्हा असेही घडते की, समाजांच्या अथवा राजाच्या नियमांचा अतिक्रमण केलेले लोक निराळ्याच रूपाचा आश्रय करून समाजात आपला पुन: प्रवेश करून घेतात. ही ढोंगे केव्हा केव्हा इतकी बेमालूम वठतात, की नुसत्या लग्नव्यवहारातच नव्हे, तर जगातील इतर व्यवहारातही ती अखेरपर्यंत टिकतात; व ती तशी वराची जीवमान असेतोपर्यंत टिकली तर मात्र वधूचे म्हणण्यासारखे नुकसान होऊ शकत नाही. परंतु स्त्रीजातीच्या दुर्दैवाने जर का ती अगोदर उघडकीस आली, तर मात्र स्त्रीच्या दु:खस्थितीस पारावार नाहीसा होतो.
काळ्या पाण्याची शिक्षा पावलेला एक कैदी संभावित वेशाने प्रत्यक्ष सरकारी कामदारांच्या देखत राजरोसपणे नांदत असता ओळखला जाऊन पुन्हा पकडला गेल्याचे उदाहरण मद्रासप्रांती नुकतेच झाल्याचे प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे शिक्षा पावलेल्या कैद्याने वेषान्तरानंतर एखाद्या स्त्रीजातीय प्राण्याशी विवाहसंबंध केला असेल, तर त्या बिचार्या स्त्रीने अशा प्रसंगी काय करावे बरे ? अशा तर्हेच्या गोष्टी होत असता त्यांचा शोध व पत्ता लागणे हे अवघड व केव्हा केव्हा अशक्यही असते हे खरे, तथापि विवाहसंबंध पत्करताना त्याबद्दलचा अगाऊ शोध करणे हे पालकांचे कर्तव्य आहे एवढे सुचविण्याचाच काय तो या लेखाचा उद्देश आहे. दूर ठिकाणच्या अपरिचित वरशी संबंध जोडिताना मनुष्याचे मन कचरते याचे एक कारण तरी हेच होय. असे पातित्यादी दोष वराचे अंगी असून ते वेळी उमगले नाहीत, व मागाहून उमगले, तर त्या बिचार्या स्त्रीचे जन्माचे नुकसान झाले ते झालेच.
नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ ।
पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥
हे वचन पराशरस्मृतीत असून ती स्मृतीशी सांप्रतच्या कलियुगाकरिताच मुद्दाम लिहिली आहे, ही गोष्ट जुन्या व नव्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांस सारखीच मान्य आहे. नवर्याचा फ़ार दिवस पत्ता नाहीसा झाला, किंवा तो मेला, किंवा त्याने संन्यासग्रहण केले, किंवा तो नपुंसक निघाला, किंवा तो धर्मभ्रष्ट झालेला असला, तर या पाच आपत्तींच्या प्रसंगी स्त्रियांस दुसरा पती करिता येतो, अर्थात तिचा शास्त्रत: पुनर्विवाह होण्यास परवानगी आहे. असे या स्मृतिवचनात स्पष्टपणे सांगितले असताही, केवळ रूढीस वश झालेला आमचा समाज ही शास्त्रानुज्ञा मानीत नाही. यामुळे आता वर्णिलेल्याप्रमाणे पतित पुरुषाशी विवाहसंबंध घडलेली स्त्री जन्मास आचवली असाच दुर्धर प्रसंग तिजवर येतो. पुनर्विवाहाने स्त्री पुनर्भू होते असे मागे क. १८ येथे सांगितलेच आहे. या पुनर्भूंची संख्या सात असून त्यांपैकी पहिल्या तीन पुनर्भूंसच काय ती पुन: पती करून घेण्याची सवड रूढीने व निबंधग्रंथांनी ठेविली आहे. अर्थात या कलमात दर्शविलेली स्थिती अगाऊ ओळखण्याचा प्रत्यत्न करणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून स्पष्ट होईल.