धर्मशीलता व धर्ममते
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वेदाध्ययनाकरिता बारा वर्षे गुरूच्या गृही बटू राहण्याची प्राचीन काळी पद्धती होती, त्या वेळी बटूने गुरुसेवा, अग्निशुश्रूषा, ब्रह्मचर्यव्रताचे परिपालन व वेदग्रहण या गोष्टी न घडते या गोष्टीवरून त्याच्या धर्मशीलतेविषयी अनुकूल अगर प्रतिकूल अनुमान साहजिक निघू शकत असे. अर्थात शिरोलेखात लिहिलेल्या दोन गोष्टीपैकी दुसर्या गोष्टीची चौकशी अगर शोध करण्याचे त्या वेळी कारण पडत नसे. यदाकदाचित पडलेच, तर वरस्थितीत शिरू पाहणार्या व्यक्तीपुरताच त्याचा संबंध असे व तो यज्ञादिकांच्या जागी गुरुसमागमे शिष्यवर्ग गेला असता त्या ठिकाणी प्रसंगाने निरनिराळ्या विषयांस उद्देशून होणार्या वादविवाहाच्या प्रसंगी आपोआपच प्रकट होत असे.
सांप्रतकाळची स्थिती पाहू जाता पूर्वीच्या स्थितीचा प्राय: मागमूसही लागेनासा झाला आहे; वराची धर्मशीलता व धर्ममते यांची चौकशी करण्याच्याऐवजी वराच्या पित्याची अगर पालकवर्गाची धर्मशीलता व धर्ममते यांचा शोध करावयाचा, असा विलक्षण प्रकार घडून आला आहे. पूर्वीच्या ब्रह्मचर्यव्रताचरणपद्धतीचा लोप होऊन सांप्रत गुरुगृहवासाच्या जागी पितृगृहवास येऊन बसला आहे; व पूर्वीच्या ब्रह्मचर्यव्रतालंबाच्या कारणाने विवाहेच्छू पुरुषाचे वय साहजिकच प्रौढ होत असे. ती स्थिती नाहीशी होऊन तिचे स्थान बालविवाह होण्याच्या पद्धतीने पटकाविले आहे. तशातून शाळा व कॉलेज यांतून विद्यार्थ्यांस मिळणार्या शिक्षणाची व धर्मशिक्षणाची प्राय: महत्त्व प्रस्तुत काळी आपोआप नाहीसे होऊन, त्यांच्याऐवजी कुलपरीक्षेच्या तत्त्वास अनुसरून वराच्या घरच्या कर्त्या पुरुषांच्या चालीरीतीबद्दल चौकशी करावयाची हा प्रकार क्रमप्राप्तच होय. आर्यमंडळात आधीच जातीभेदाचा जिकडे तिकडे असह्य सुळसुळाट होऊन गेला आहे व त्यातच पुन: ज्ञातिज्ञातीत ‘ सुधारक ’, ‘ असुधार ’ अथवा ‘दुर्धारक ’ इत्यादी प्रकारे फ़ूट पडू लागून जातिभेद कमी न होता उलट तो वाढत जाण्याचीही भीती उत्पन्न झाली आहे. तशातून प्रार्थनासमाज, आर्यसमाज, ब्राह्म अथवा प्रच्छन्न परमहंसमंडळी, इत्यादी नवीन संस्था अस्तित्वात आल्या असून व येत असून, त्या योगानेही एकंदर आर्थमंडळात जिकडे तिकडे अधिकाधिक विस्कळितपणा माजत चालला आहे.
वस्तुत: विचार करू गेल्यास या सर्व संस्था बहुधा नावापुरत्याच आहेत. म्हण्जे या संस्थांच्या चालकांडून स्वमताचे विचार जाहीर उच्चाररूपाने कितीही व केवढ्याही जोराने समाजापुढे येत असले, तरी ते आचार अगर साक्षात कृती या स्वरूपाने जगाच्या अनुभवास येत नाहीत; एवढेच नाही, तर जाहीरसभांतील बोलके वीर घरी गेल्यावर त्यांचे घरच्या बायकांपुढे अगर इतर मंडळीपुढे काही चालत नाहीसे होते; व घरात काही लग्न, मुंज इत्यादी कार्य व्हावयाचे असल्यास जाहीर रीतीने निषिद्ध ठरविलेली मूर्तिपूजादिक कृत्येही पण त्यांना मुकाट्याने नाक मुठीत धरून करावी लागतात. जगात नैतिकदृष्ट्या आचरण करावयाचे म्हटले म्हणजे साधुसंतांनी लिहिल्याप्रमाणे “ बोलणे फ़ोल झाले । डोलणे वाया गेले ” असे होता उपयोगी नाही. “ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ” ही रामदासाची उक्ती ध्यानात ठेवून प्रत्येक व्यक्तीने तदनुसार वर्तन केले पाहिजे, पण त्याचा प्राय: सर्वत्र अभाव आहे.
मानसिक धैर्याचा अभाव छपविण्याकरिता कोणी कोणे मुत्सद्दी अगर कागदीवीर केव्हा केव्हा लपंडावही करितात व देवदेवक इत्यादी कृत्ये आपल्या स्वत:च्या हाताने न करिता आपले बंधू वगैरे दुसर्या कोणास पुढे करोन त्यांच्या द्वारे उरकून घेऊन स्वत:चा डौल कायम ठेविण्याचा यत्न चालवितात ! परंतु हा यत्न लोकांच्या दृष्टीने अर्थातच फ़िक्का पडतो, व त्यामुळे अशा लोकांचे समाजावर कोणत्याही प्रकारे वजन पडत नाही. कसएही असो; अशा मंडळीचे महत्त्व लोकसमाजाने मानिले अगर न मानिले, तरीदेखील ‘ सुधारक ’, ‘ दुर्धरक ’ इत्यादी शुक्लकृष्णभेद प्रत्येकाच्या मनात वागत राहतो; व हा करावी अगर न करावी हा प्रत्येकाला विचार पडून, विवाह्य वराच्या गुणपरीक्षेच्याऐवजी त्याच्या वडील मंडळीच्या धर्ममतांच्या चौकशीस नसते आगंतुक महत्व येते !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP