आता सांगितलेल्या ह्या पुरुषलक्षणांशिवाय आणखीही पुरुषलक्षणे पुष्कळ आहेत. एकंदरीत सर्व लक्षणे घेऊन शुभाशुभ फ़ळांच्या दृष्टीने ती निवडण्याचा यत्न संस्कृत ग्रंथांतून अनेक ठिकाणी केलेला दृष्टीस पडतो. या निवडानिवडीत कल्पनेचा भाग पुष्कळच मिसळला आहे यात संशय नाही; तथापि कित्येक प्रसंगी मानिलेली लक्षणे तात्त्विक दृष्टीनेही खात्रीने चांगली म्हणता येण्यासारखी आहेत. संस्कृत ग्रंथाकारांनी उत्तम लक्षणांचे वर्गीकरन केले असून गुणांची पूर्ण संख्या ३२ अगर ३६ ठरविली आहे. हे सर्वच गुण एकाच व्यक्तीच्या अंगी असणे दुर्घट आहे; तथापि असे गुण अंगी असलेल्या व्यक्तीच्या पाळतीवर दृष्ट लोक राहतात व त्यांचा नास करण्याचा यत्न करितात. अगर केव्हा केव्हा स्वत: तसल्या व्यक्तीही उत्कट धर्मश्रद्धेच्या अगर वेडाच्या भरात आपल्या जिवावर उदार होऊन देवतादिकांपुढे बळी जातात, अशा कथा अनेक ग्रंथांतून वर्णिल्या आहेत.
ज्याप्रमाणे उत्तम लक्षणी पुरुष, त्याप्रमाणे उत्तम लक्षणी स्त्रियाही असतात, व अशांचे बळी देवतादिकांस देणे हे मोठे पुण्य आहे, व या बलिदानाच्या योगाने मंत्रसिद्धी, तप:सिद्धी, अगर जपसिद्धी होते असे मानणारे कित्येक पंथ या देशात बर्याच प्राचीन काळी होते, हे विक्रमबत्तिशी, वेताळपंचविशी इत्यादी ग्रंथांवरून स्पष्ट अनुमान निघते. मालतीमाधव नाटकात अघोरघंट नावाच्या अघोरपंथी क्रूर योग्याने आपल्या मंत्रसिद्धीकरिता सुकल्षणी मालतीस स्मशानात बळी देण्यास आणिल्याचा प्रसंग वर्णिला आहे. जगन्नाथपुरीत जगन्नाथाच्या रथाखाली आपणास चिरडून घेणे हेच आपल्या जन्माचे सार्थक, अगर पाठीचे कातडे ओढून त्यातून ओविलेल्या लोखंडी आकड्यांच्या सह्याने आपणास बगाडी चढविणे ( झाडास लोंबकळणे ) हेच खरे पुण्य, असे मानून देह कष्टविणारे व प्रसंगी देहास अपाय करून घेणारे लोक नुकतेच थोड्या वर्षांपासून सरकारी कायद्यामुळे दिसेनासे झाले आहेत. अशा लोकांच्या अंगी अंधश्रद्धा अथवा वेड ह्यापेक्षा निराळे उदात्त तत्त्व बिलकुल नव्हते; परंतु राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी प्रत्यक्ष राजास आपला देह अर्पण करावा लागत आहे हे पाहून, त्याच्याऐवजी आपल्या स्वत:च्या सर्वगुणपरिणूर्ण देहाचा बळी देण्यासही तयार झालेल्या पुरुषांची उदात्त तत्त्वाने भरलेली अनेक कथानके प्राचीन ग्रंथांतून वर्णिली आहेत.
ही कथानके खरीखोटी कशीही असोत, परंतु राष्ट्राच्या किंवा जनपदाच्या हितसाधनाच्या कामी देहाचा व्यय करण्यास तयार होणे व स्वत:च्या देहाची ममता सोडणे या गोष्टी लहानसहान नव्हेत. ‘ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुल्या ममता, नाही देही ॥ ’ हा तुकारामाचा अभंग प्रसिद्ध आहे, व त्यातील तत्त्वाची प्रतिपादक शिबिराजा इत्यादिकांची आख्याने आमच्य अपुराणग्रंथात पदोपदी आढळतात. व आख्याननायकांची चरित्रे शेवटपर्यंत वर्णिण्याचे ज्या ठिकाणी प्रयोजन असते, त्या ठिकाणी प्रसंगी बहुधा त्यांच्या चरित्राचे समर्थन त्यांच्या सामुद्रिक लक्षणांवरून करण्यात येते. विशेष प्रसंगापुरतेच वर्णन कर्तव्य असताही नायकांचे महत्त्व लोकांस योग्य रीतीने कळावे या उद्देशाने आवश्यक तेवढ्या लक्षणांचा उल्लेख ग्रंथकारांकडून होतोच होतो. उत्तमरामचरित नाटकात भवभूती कवीने श्रीरामचंद्राचा ज्येष्ठ पुत्र कुश ह्याचे वर्णन :
दृष्टिस्तृणीकृतजगत्त्रयसत्त्वसारा
धीरोद्धता नमयतीव गतिर्धरिर्त्री ।
कौमारकेपि गिरिवद्गुरुता दधानो
वीरो रस: किमयमेत्युत दर्प एव ॥
ह्या श्लोकात केले आहे, त्यात कुशाची दृष्टी, चालण्याची ऐट, शरीराची ठेवन इत्यादिकांचे वर्णन सामुद्रिक शास्त्रात अनुसरून केले आहे हे स्पष्ट आहे. त्रिभुवनातील संपूर्ण सामर्थ्ये एकवटली तथापि त्यांस तृणवत तुच्छ मानते की काय अशी वाटणारी दृष्टी; खाली पृथ्वीस वाकवितेच आहे की काय, अशा प्रकारची गंभीर आणि उंच पल्ल्याची चालण्याची ढब; व वय पुष्कळच लहान असूनही अंगी पर्वतासारखी वजनदारी; या गोष्टींच्या योगाने कुश हा मूर्तिमंत वीररसच होय, किंवा तो केवळ दर्पाची मूर्तीच होय, अशा प्रकारचे वर्णन वाचून कोणास कौतुक वाटणार नाही ? प्रत्यक्ष रामचंद्रासंबंधाने वाल्मीकिरामायणात प्रारंभीच नारद आणि वाल्मीकी यांचा संवाद वर्णिला आहे. त्यावरून, त्या महापुरुषाचे अंगी जी उत्तम सामुद्रिक लक्षणे होती, त्या सर्वांचा उपयोग केवळ जगाच्या कल्याणसाधनाच्या कामी झाला असे सांगण्याचा ग्रंथकाराचा उद्देश आहे. वेदकालीन, भाषा लोकप्रचारातून गेल्यावर संस्कृत भाषेत निराळे स्वरूप येऊन जी नवी भाषा बनली, त्या भाषेत पहिला कवी झाला तोच हा वाल्मीकी ऋषी होय. वाल्मीकीच्या लेखात सामुद्रिक लक्षणे निराळी म्हणून लिहिली नाहीत, तथापि आपल्या कथानकाच्या वर्णनात अशा लक्षणांचा पर्यायाने जागोजागी उल्लेख त्याने केला आहे यात संशय नाही. अष्टादशपुराणांचे कर्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यासांच्या ब्रह्मपुराणात सामुद्रिकाचा विषय स्वतंत्रपणे वर्णिला आहे, त्याशी रामायनकथानायकाची लक्षणे जुळतात हे दोन्ही ग्रंथ ताडून पाहणारांस सहज कळून येईल. रामचंद्राच्या अंगच्या लक्षणांचे व त्याच्या लोकोपयोगित्वाचे स्वरूप वाचकांस कळावे यासाठी या वर्णनाचे श्लोक परिशिष्ट ( ई ) येथे भाशान्तरासुद्धा उतरून घेतले आहेत.