वरील कलमात लिहिलेले वचन मनुस्मृतीच्या हस्तलिखित पोथ्यांतून आढळते, तथापि या स्मृतीवरील उपलब्ध असलेल्या सात टीकाकारांपैकी एकाचीही टीका त्यावर दृष्टीस पडत नाही, यावरून कदाचित ते प्रक्षिप्त म्हणजे ग्रंथांत मागाहून घुसडलेले असावे, असे मानण्याची पाळी येईल; सबब ते वचन तूर्त बाजूस ठेविले, तरी त्याच्याऐवजी मनूचे ( अ. ९ श्लोक ९४ ) पुढील वचन स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयाचे अंतर दाखविणास प्रमाणभूत मानण्यास अडचण नाही :
त्रिंशद्वर्षोद्वहेत्कन्यां हृद्याम द्वादशवार्षिकीम् ।
त्र्यष्टवर्षोष्टवर्षो वा धर्मे सीदति सत्वर: ॥
या वचनात तीस वर्षांच्या पुरुषाने बारा वर्षांची, व चोवीस वर्षांच्या पुरुषाने आठ वर्षांची, कन्या करावी, असे दोन प्रकार वर्णिले आहेत. पहिल्या प्रकारात स्त्रीपुरुषांच्या वयाचे अंतर १८ वर्षांचे, व दुसर्यात १६ वर्षांचे आहे. दोन्ही अंतरे जवळजवळ सारखीच आहेत, तथापि लौकिक व्यवहार व वैद्यकशास्त्र या दोहोंच्या दृष्टीने एकंदर ही अंतरे फ़ार आहेत असे कोणासही वाटल्यावाचून राहणार नाही. एवढी मोठी अंतरे स्मृतिशास्त्रकारांच्या मनांत कशी आली नाहीत याचे कदाचित कोणी आश्चर्य मानील, परंतु तसे होण्याचे कारण नाही. का की ही लिहिलेली वये सांप्रतच्या बालविवाहपद्धतीतील वयास सोडून नाहीत, व ती स्त्रीजातीचा मुंजीचा हक्क काढून घेतल्याची दर्शक आहेत; व मौंजीबंधनाचा व तदुत्तर गुरुगृही ब्रह्मचर्य आचरण करण्यासंबंधाने कालयापनाचा अधिकार पुरुषांचा तेवढा कायमचा ठेविला आहे, हे पुरुषांच्या वयच्या आकड्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. विवाहकाली स्त्रीपुरुषांची वये हीच असली पाहिजेत किंवा त्या वयाच्या मधील अंतराचे मान हेच मानिले पाहिजे असा स्मृतिकारांचा हेतू नाही, व प्रत्यक्ष व्यवहारातही नुसते आकडेच कायम राखू असे म्हणून चालावयाचे नाही. वरील वचनात वरांची दोन वये व वधूंचीही दोन वये लिहिली आहेत, ती लिहिण्यात स्मृतिकारांचे विशेष हेतू गर्भित आहेत. ज्या वराला ब्रह्मचर्याचा लाभ अधिक काळपावेतो घडेल, त्याने वधू पाहावयाची तीही स्वाभाविकच पुर्या वयाची, म्हणजे रजोदर्शन होण्यास पात्र झालेली, अशा योग्यतेची पहावी; परंतु घरातील प्रपंचाचा मनाला ओढा लागून, अगर घरचे अग्निहोत्र चालविण्यास कोणी तरी पाहिजे, नाही तर ‘ धर्मे सीदति ’ म्हणजे गृहस्थधर्माचे आचर्ण होण्यास अडचण होते, अशा प्रकारचा काही तरी विचार मनात येऊन ज्याला ब्रह्मचर्य स्थितीतून लवकर निघून जाण्याची ‘ त्वरा ’ होईल; त्याने लहान आठ वर्षांची पोरसुद्धा घरात आणून ठेविण्यास तयार व्हावे, - अशा दोन निरनिराळ्या प्रसंगांचे चित्त या वचनात उमटले आहे यात संशय नाही. कालान्तराने घरसंसारात मन घालू लागण्याचे प्रसंग लोकसमाजात अधिकधिक येऊ लागल्याने गुरुगृहवासाची कल्पना सुटत चालली, व त्यायोगाने पुरुषवर्गाचे विवाहही तितके अगोदरच्या वयात होऊ लागून स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर कमी कमी होत गेले. हा प्रकार अर्थातच प्रथम विवाहापुरताच लागू होईल; कारण समाजाच्या एकतर्फ़ी नियामंनी त्याला इच्छेस वाटेल तेव्हा एकामागून एक पाहिजे तितके विवाह करीत राहण्याची मोकळीक ठेविली आहे. यामुळे स्त्रीपुरुषांच्या वयामम्धील अंतर प्रसंगविशेषी कमीजास्त होऊ शकेल हे स्पष्ट आहे. वैद्यकशास्त्राच्या व एकंदरीत भौतिकशास्त्रांच्या नियमांस अनुसरूनच विचार करू गेल्यास पुरुषाच्या तारुण्याचा जोम पुरा होऊन जाऊन त्याच्या शक्तीस क्षीणता येऊ लागणे व स्त्रीजातीचेही तारुण्य संपून तिचा विटाळ जाणे, या दोन गोष्टींची गाठ पडण्याची संधी कोणती याचा विचार होऊन त्या धोरणाने स्त्रीपुरुषांच्या वयाचे अंतर ठरविणे हाच काय तो एक खरा मार्ग आहे. आमच्या पूर्वजांसही ह्या मार्गाचे ज्ञान झाले होते हेव नि:संशय आहे व म्हणूनच स्त्रीपुरुषांचे विवाह व्हावयाचे त्यात वराचे वय वधूवयापेक्षा पाच वर्षे अगर तितक्या सुमाराचे अधिक असले पाहिजे ही समजूत साधारण प्रतीच्या अडाणी लोकांच्याही माहितीची होऊन बसली आहे ! अर्थात प्रस्तुत काळी अत्याचार म्हणून बालावृद्धविवाह अगर अशक्त पुरुषांशी स्त्रीविवाह ह्या गोष्टी होतात, परंतु त्या सर्वथा निंद्यच समजणे अगत्याचे आहे हे निराळे सांगणे नकोच.