क्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमात लिहिल्याप्रमाणे वेध पाच शलाकांचा किंवा सात शलाकांचा कसाही घेतला असला, तरी क्रूर ग्रहाच्या संबंधाने नक्षत्रांचे ( १ ) भुक्त ( भोगिलेले ), ( २ ) भोज्य ( भोगण्याजोगे ), आणि ( ३ ) आक्रान्त ( आक्रमण केलेले, स्पर्शिलेले ), असे तीन प्रकार ग्रंथकारांनी वर्णिले आहेत; व तिन्हीही प्रकार दोषाने युक्त असेच प्राय: त्यांनी मानिले असून, अशी नक्षत्रे विवाहास सर्वथा वर्ज्य समजावी असाच त्यांचा आशय आहे. हा जो दोष सांगितला त्याची पारिभाषिक संज्ञा ‘ क्रूराक्रान्तादी दोष ’ अशी आहे.
या दोषाचे फ़ळ तीन वर्षांनी दृष्टीस पडणार असते असे शर्ङ्गधर नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. केशवार्क नावाच्या ग्रंथात या दोषास चंद्राच्या आक्रमणाचा अपवाद सांगितला आहे; व त्याच्या मते नक्षत्रे उत्पाताची, किंवा ग्रहणाची, किंवा क्रूर ग्रहाकान्त कशीही असली, तथापि त्यांचा दोष त्या ठिकाणी चंद्र येईपर्यंतच काय तो असतो, व त्या ठिकाणी चंद्र एक वेळ येऊन पोचला की त्या दोषाचा परिहार होऊन तेच नक्षत्र विवाहास योग्य होते; तथापि होताहोईतो ते नक्षत्र अगर त्याचे चरण टाळावे हे चांगले.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP