वरील कलमातील लेखाचे तात्पर्य वराची प्रवृती वाईट मार्गाकडे नसावी हे पाहण्याविषयीचे आहे हे स्पष्टच आहे. वरपरीक्षेत त्याच्या अंगच्या वाईट गोष्टी टाळावयाच्या असे सांगितले, अगत्याचे आहे हे विशेष सांगावयाचे आहे. वाईट गोष्टी टाळाव्या म्हणून सांगणे हे केव्हाही झाले तरी योग्यच आहे. परंतु चांगल्या गोष्टींचीही तीच वाट करावयाची असे म्हणणे हे प्रथम दर्शनी विरोधात्मक भासेल यात संशय नाही. परंतु जगात अशी विरोधस्थळेही केव्हा केव्हा मानून चालण्याची पाळी येते. कन्येकरिता वरयोजना करावयाची ती काही एखादे मोठे पुण्य प्राप्त होते म्हणून करावयाची असे मुळीच नाही. ती करण्याचा उद्देश तिजपासून कन्येचा संसार चांगला होऊन तिला सुख मिळावे हा होय.
वराच्या अंगच्या चांगल्या गोष्टी जर कन्येच्या संसारात बिघाड आणणार्या असल्या, तर त्या टाळण्याचा प्रयत्न करणे हे जगातील व्यवहाराच्या दृष्टीने क्षम्य नव्हे असे कोण म्हणू शकेल ? जगात आधिभौतिक, आधिदैविक, व आध्यात्मिक अशी तीन प्रकारची शास्त्रे आहेत. प्रस्तुत स्थळी या तीन प्रकारांपैकी तिसर्या प्रकाराविषयी थोडेसे लिहिणे अगत्याचे आहे. आध्यात्मिक शास्त्रात ‘ वेदान्त ’ असेही निराळे नाव आहे. या शास्त्रात जीवात्मा आणि परमात्मा यांचा परस्परांशी संबंध काय हे सांगितले असते, व त्याचे पर्यवसान मनुष्यप्राण्याने आपल्या पाठीमागे लागलेल्या पुनर्जन्मादिक आपत्ते नाहीशा करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी हे सांगण्यामध्ये होत असते. वेदान्तशास्त्राची मते ज्यांस मान्य असतात ते लोक हे संपूर्ण जग खोटे, मायिक व तुच्छ आहे, व एकटे ब्रह्मच काय ते खरे, असे प्रतिपादन करितात, व स्वत: आपण या जगात आहोत हादेखील नुसता मायेचा खेळ अथवा निव्वळ भास आहे अशा प्रकारचे त्यांचे कोटिक्रम चालत असतात. हे कोटिक्रम नुसते शाब्दिक उच्चारणापुरतेच राहणारे असल्यास त्यांची फ़ारशी भीती मानावयास नको. परंतु केव्हा केव्हा या शाब्दिक उच्चरणांस कृतीचे रूप येते, व त्याचे परिणाम मात्र फ़ार भयंकर होतात.
जग हे नश्वर आहे, यासाठी आपण ज्या घरात राहतो ते जळून गेले तरी त्यात मोठेसे काय आहे ? हा तात्त्विक प्रश्न अत्यंत योग्य आहे, परंतु लौकित व्यवहारात त्याचा साक्षात अनुभव मात्र कोणासच इष्ट नसतो. स्त्रीपुरुषांचे नातेहे तरी काय आहे ? ते व्यर्थ होय असे म्हणणारी एखादी शुक्राचार्याची मूर्ती जगात अवतरली व प्रत्यक्ष आपल्य विवाहित पत्नीसच ‘ माता ’ म्हणू लागली, तर त्या योगाने त्या बिचारीचे समाधान ते काय होऊ शकेल ? जगात सर्वत्र एकच ब्रह्म पसरलेले आहे, त्यात आप व पर असे काहीच नाही, असे म्हणून पती आपला सर्व संसार उचलून दुसर्यास देऊन टाकील तर तुकोबारायापुढे बायकोने आपले डोके फ़ोडून घेण्याशिवाय दुसरे काय बरे करावे ?
असो; लिहिण्याचे तात्पर्य मिळून इतकेच की, धर्मदृष्टीने मोक्षाची प्राप्ती अत्यंत श्रेष्ठ आहे, तो मोक्ष संपादन करण्यास प्रवृत्तिमार्गापेक्षा निवृत्तिमार्गाचीच अपेक्षा अधिक आहे, व नुसत्या कर्मापेक्षा ज्ञानाची योग्यता फ़ार मोठी आहे, इत्यादी सर्व गोष्टी कितीही खर्या व चांवल्या असल्या, तरी जगातील व्यवहाराच्या दृष्टीने त्यांचा कोणासही तादृश उपयोग होत नाही; एवढेच नव्हे, तर उलट नुकसानही होते; व एवढ्यासाठी या मतांच्या प्रत्यक्ष आचारात उपयोग करणारा जर कोणी वर असेल तर तो निदान त्याच्या वधूच्या दृष्टीने अगदी कुचकामाचा आहे, आणि अशा वरास आपली कन्या न देणे हेच प्रत्येक कन्यापित्याचे अवश्य कर्तव्य म्हटले पाहिजे.