दूर ठिकाणच्या वराचा निषेध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
हा निषेध प्राचीनकाळच्या स्थितीच्या मानाने असणे अगदी स्वाभाविक होते. त्या वेळी हल्लीप्रमाणे प्रवासाची, पत्रे पाठविण्याची, अगर विद्युत्साहाय्याने बातमी आणविण्याची त्वरेची साधने नव्हती, यामुळे मातापितरास आपली कन्या दूर ठिकाणी पाठविण्याचा प्रसंग कबूल करणे साहजिकच जिवावर येत असे यात नवल नाही. तशातून वर दूर ठिकाणचा असला तर त्याचे कूल, गोत्र, त्याची गृहस्थिती, इत्यादी गोष्टी खात्रीने समजून येणे अवघड असते, व राहण्याचे ठिकाण दूरचे असल्याने प्रसंगी प्रत्यक्ष राजापराधी लोकांसही आपले रूप पालटून राहण्यास सापडते. प्राचीन काळी गुरूच्या सन्निध शिष्य दिर्घकाळपावेतो राहात, व गुरूही प्रसंगी आपली कन्या आपल्या एखाद्या आवडत्या पट्टशिष्यास देत, अशा गोष्टी प्राचीन संस्कृत ग्रंथांतून लिहिलेल्या आढळतात परंतु अशा प्रसंगी वरयोजना करताना ते दूर ठिकाणी राहणार्या वरास आपली कन्या सहसा देत नसावेत असे अनुमान करण्यास हरकत नाही. कसेही असो; सांप्रतच्या स्थितीच्या मानाने विचार करू गेल्यास आता या निषेधाचे विशेषसे महत्त्व मानण्याचे कारण नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP