मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
पुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे

पुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


सामुद्रिक ग्रंथांतून ही लक्षणे विस्ताराने लिहिली असून या विषयावर ग्रंथही अनेक आहेत. तथापि मागे कलम ३६ येथे लिहिल्याप्रमाणे वराहमिहिरकृत ‘ बृहत्संहिता ’ हा ग्रंथ सर्वमान्य असल्याने त्यातील अ. ६८ यातील प्रारंभीच्या ८२ पद्यांचा उतारा परिशिष्ट ( ड ) येथे घेतला आहे, व त्याचा तात्पर्यार्थ सरळ भाषेने सहज कळावा अशा तर्‍हेने येथे लिहिण्यात येत आहे. हा अध्याय याहूनही मोठा असून त्यात पुरुषाची उंची, वजन, चालण्याची रीती, बांधेसूदपणा, सामर्थ्य, अंगाचा वर्ण, स्रेह, स्वर, प्रकृती,  सत्त्व, उपजत स्वभाव, शरीराचे निरनिराळे भाग ( क्षेत्र ), व अंगकान्ती ( मृजा अ. छाया ) अशा अनेक स्वरूपांची शुभाशुभ लक्षणे विस्ताराने वर्णिली आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत सामुद्रिकशास्त्र पूर्वीइतके श्रद्धापात्र कोणी मानीत नसल्यामुळे सबंध विषय उतरून न घेता शरीराच्या बाह्य भागाच्या प्रत्येक अवयवाई शुभाशुभ लक्षणे मात्र येथे लिहिण्यात येत आहेत :
पाय : राजलक्ष्मी पुरुषाच्या पायांस घाम येत नाही. त्यांचे तळवे मृदू असतात. पायांचा वर्ण कमळाच्या गाभ्याप्रमाणे पिवळा, अंगुली मिळालेल्या, व नखे तेजस्वी, ताम्रवर्ण असतात. त्यांचे मागले भाग सुंदर, तसेच ते स्पर्शास उन्हून लागत असून त्यांवर शिरा उमटलेल्या नसतात, व पायांचे गुल्फ़ म्हणजे घोटेही गुप्त असून एकंदर पायाची ठेवण कासवाच्या पाठीसारखी उंच असते. ज्या कोणाचे पाय सुपासारखे रूक्ष, पांढर्‍या नखांचे, वाकडे अगर लांबलचक, शिरायुक्त, मांसरहित व विरळ बोटांचे असतात, ते लोक दु:खी व दरिद्री समजावेत. पायांस मध्येस पादुकांसारखा उंच भाग असेल तर पुरुषास नेहमी चालावे लागणार. काळ्या-तांबड्या रंगाचे पाय कुलनाश करणारे, भाजलेल्या मातीच्या वर्णाचे ब्रह्महत्या करणारे, व पिवळ्या वर्णाचे पाय अगम्य स्त्रीच्या ठायी आसक्ती सुचविणारे होत.
पोटर्‍या ( अ. पायांचे नळे ) : पोटर्‍या वाटोळ्या असून त्यांची रोमरंध्रे विरळ व बारीक असणे हे राजलक्षण होय. कुत्रा अगर कोल्हा यांच्यासारख्या पोटर्‍या असणारे लोक दरिद्री होतात.
रोमरंध्रे : राजलक्षणी पुरुषाच्या प्रत्येक रोमरंध्रातून एकेक केस उगवतो. पंडित अगर वेदवेत्ता अशा पुरुषाच्या रंध्रातून दोन दोन केस निघतात. याहून अधिक केस उगवणारे लोक निर्धन व दु:खी समजावे. मस्तकावरील केशांचे शुभाशुन लक्षणे याचप्रमाणे समजावे.
गुडघे अथवा ढोपर : मांसरहित, कृश, पसरट, खोल, मांसयुक्त व मोठे अशा गुडघ्यांची फ़ळे अनुक्रमे पुढीलप्रमाणे समजावी : प्रवासात मरण, सौभाग्यप्राप्ती, दारिद्र्य, बाइलबुद्धीपणा, राज्यप्राप्ती व आयुषवृद्धी. गुडघे पुष्ट व सारखे असणे हे राजत्वाचे लक्षण होय.
मांड्या : हत्तीच्या सोंडेसारख्या मांड्या असणे हे राजत्वाचे चिन्ह समजावे.
शिश्न, वृषण, आणि मूत्रधारा : यांची लक्षणे व शुभाशुभ फ़ळे परिशिष्टातील पद्य ७ - १६ येथे संस्कृत भाषेत लिहिली आहेत, ती ज्याची त्याने निराळी समजून घ्यावी. अश्लीलतेच्या कारणाने त्याचे भाषान्तर करण्यात अर्थ नाही.
कुल्ले : फ़ार मोठे कुल्ले असणे हे दारिद्य्राचे, व भरदार असणे हे सुखप्राप्तीचे लक्षण समजावे. तसेच दिडक्या कुल्ल्याच्या मनुष्यास वाघापासून मरणप्राप्ती, व बेडकांसारख्या कुल्ल्याच्या मनुष्यास राज्यप्राप्ती, याप्रमाणे फ़ळे जाणावी.
कंबर : सिंहासारखी कंबर असणारा मनुष्य राजा होतो. वानर अगर उंट यांच्यासारख्या कंबरेच्या मनुष्यास दारिद्र्य येते.
उदर अथवा पोट : उदर उंचसखल नसणे, हे सुखाचे लक्षण होय. तेच घागरीसारखे अगर तपेलीच्या घाटाचे असल्यास दारिद्र्याचे सूचक समजवे. ज्याचे उदर सर्पासारखे असते, ते लोक दरिद्री व अति खादाड होतात. उदराचा मध्यभाग सारखा असल्यास भोगप्राप्ती, खोल असता भोगहीनता, उंच असल्यास राज्यप्राप्ती, व उंचसखल असल्यास कपटी स्वभाव याप्रमाणे फ़ळे जाणावी.
कुशी अथवा कंबरेवरील ४ अंगुळांइतकी जागा : हा भाग पूर्ण भरदार असणे हे श्रीमंतीचे, व खोल आणि वाकडा असणे हे दु:खप्राप्तीचे लक्षण होय. हेच भाग पुष्ट आणि मृदू असून त्यांवरील केसांस उजवीकडचे वळण असले तर त्यापासून राज्यप्राप्ती होते; व तेच अपुष्ट, रूक्ष आणि डाव्या वळणाचे असल्यास त्यांपासून दारिद्र्य, दु:ख व परदास्य ही फ़ळे प्राप्त होतात.
बेंबी : वर्तुळ, उंच व विस्तीर्ण असता सुखाची प्राप्ती; लहान, खोल व अदृश्य असता दु:खप्राप्ती; वळ्यांच्या मध्यभागी उंचसखल असता शूलरोगापासून मृत्यू व दारिद्र्य; डाव्या अंगास वळली असल्यास कपटी स्वभाव; उजव्या अंगच्या वळणाची असल्यास बुद्धिमत्ता; बाजूस, वर अथवा खाली विस्तीर्ण असल्यास अनुक्रमे दीर्घायुष्य, संपत्तिमानपणा, व गुरांढोरांची मोठी प्राप्ती; व कमळाच्या मध्यभागाप्रमाणे मध्यभागी उंच असल्यास राजपदवी, याप्रमाणे फ़ळे समजावी.
पोटावरील वळ्या : ज्यच्या पोटावर एक वळी असते त्यास शस्त्रापासून मृत्यू येतो. दोन वळ्य़ा असल्यास तो पुरुष स्त्रीभोगी, व तीन असल्यास दुसर्‍यांस विद्या शिकविणारा होतो. चार वळ्या असणार्‍या मनुष्यास पुष्कळ संतती होते. वळी मुळीच नसेल तर तो मनुष्य राजपद पावणार असे समजावे. वळ्या सारख्या नसून उंच सखल असल्या, तर तो अगम्य स्त्रीशी गमन करणारा व पातकी होईल; व त्याच सरळ असतील, तर त्यांपासून त्यास सुखप्राप्ती होऊन तो परस्त्रियांकडे ढुंकूनही पाहणार नाही.
स्तनांची अग्रे : ज्यांची स्तनाग्रे फ़ार उंच नसतील तो संपत्तीवान होतो; व तीच ज्याची लहानमोठी व लांब असतात त्यास दारिद्र्य येते. कुचाग्रे कठीण, पुष्ट व खोल असणार्‍या पुरुषास राज्य व सुखही प्राप्त होते.
हृदय : ज्याचे हृदय उंच, विस्तीर्ण, न थरथरणारे, व पुष्ठ ( भरीव ) असेल तो राजा होतो. याच्याच उलट गुणाचे हृदय असून, त्याच्या वरील केस रूक्ष व वर शिरा उठलेल्या, अशी स्थिती असेल तर मनुष्य दरिद्री होतो.
छाती : सारखी, किंवा कठीण, अथवा कृश, अथवा उंचसखल असेल, तर तिची फ़ळे द्रव्यप्राप्ती, शौर्य, दारिद्र्य असून शिवाय शस्त्रापासून मृत्युप्राप्ती, याप्रमाणे अनुक्रमे समजावी.
जत्रु ( सरी अ० ऊर आणि कंठ यांचा संधी ) : ज्या पुरुषाचा हा भाग विषम असतो तो क्रूर होतो. त्याचा संबंध हाडांच्या सांध्याशी झाला असता पुरुषास दारिद्र्य येते; व तो भाग उंच, खोल अगर पुष्ट असेल तर त्याची फ़ळे अनुक्रमे उपभोग, दारिद्र्य द्रव्यप्राप्ती ही असतात.
मान : मान चपटी, शुष्क व शिरांनी युक्त असता निर्धनता; रेड्यासारखी अगर बैलासारखी असल्यास शत्रापासून मृत्यू; तीन वळ्या तिजवर असल्यार राज्यप्राप्ती व लांब असल्यास खादाडपणा, याप्रमाणे क्रमाने फ़ळे वर्णिली आहेत.
पाठ : ही अस्फ़ुटित ( म्ह० न फ़ुटलेली ) व केशरहित असल्यास धनप्राप्ती होते, व तशी नसल्यास अशुभ परिणाम घडतात.
कक्षा ( काख अ० बाहुमूल ) : धर्मरहित, पुष्ट, उंच, सुगंधी, सारखे व केशरयुक्त असल्यास द्रव्यप्राप्ती होते, व त अशी नसल्यास मनुष्य दरिद्री होतो.
खांदे : दरिद्री पुरुषांचे खांदे मंसरहित, केसांनी युक्त, फ़ुटीर ( स्फ़ुटित ) व अल्प आकाराचे असतात. तेच जर विस्तीर्ण, अस्फ़ुटित आणि संलग्न असतील, तर पुरुष सुखी व बलिष्ट होईल असे सुचवितात.
बाहू : राजाचे बाहू हत्तीच्या सोंडेसारखे, वाटोळे, गुडघ्यापावेतो लांब, सारखे व पुष्ट असतात. दरिद्री पुरुषांचे बाहू आखूड असून त्यांवर केस येतात.
हातांची बोटे : ही लांब असणे हे दीर्घायुष्याचे, सुस्पष्ट असणे हे मोठ्या भाग्याचे, व बारीक असणे हे ज्ञानी पुरुषाचे लक्षण होय. ज्याची बोटे चेपटलेली असतात, ते दुसर्‍याचे नोकर होतात; मोठी असल्यास दरिद्री होतात; व बाहेर लवली असल्यास शस्त्रापासून मृत्यू येतो; बोटे विरळ अथवा घट्ट असणारे लोक अनुक्रमे दरिद्री व द्रव्यसंचय करणारे होतात.
हात : वानरासारख्या अगर वाघासारख्या हातांचे पुरुष अनुक्रमे धनवान व पापी होतात.
मणगटे : ज्यांची मणगटे स्पष्ट न दिसणारी, बळकट, व सांधे बरोबर जमलेले अशा प्रकरची असतील, ते राजपदवीचे अधिकारी होतात. मणगट नसलेल्या मनुष्यांचा हस्तच्छेद होतो, व ज्यांचे मणगट शिथिल व खटखट वाजणारे असते ते दरिद्री नेपजतात.
हातांचे तळवे : हे ज्यांचे उंच नाहीत, त्यांच्या वाट्यास वडिलोपार्जित द्रव्य येत नाही. तळवे समर्वतुळ व खोल असतात ते धनवान होतात; व आणि उंच असल्यास दानशूर होतात. दोन्ही हातांचे तळवे सारखे नसणारे लोक क्रूर व दरिद्री होतात. तळवे तांबडे अगर पिवळे असणे ही अनुक्रमे राजत्वाची आणि अगम्य स्त्रीसमागमाची चिन्हे होत. रखरखेत तळव्यांपासून दारिद्र्याची प्राप्ती होते.
नखे : नखे कोंड्यासारखी असलेले पुरुष नपुंसक होतात. ती ज्याची चेपटलेली किंवा फ़ुटलेली असतात त्यांस दारिद्र्य येते. कुत्सित व विवर्ण नखांच्या लोकांस स्वत:ला सुखप्राप्ती न होता दुसर्‍यांची सुखे पाहण्याची पाळी येते. नखांचा रंग तांबडा असणारे लोक सेनेतील अधिकारी होतात.
आंगठ्यावरील यवचिन्ह : यव म्हणजे जव या  नावाचे धान्य होय. ज्यांच्या आंगठ्याच्या मध्यभागी हे जवाचे चिन्ह असते, ते द्रव्यवान होतात, व तेच आंगठ्याच्या मुळाशी असेल तर त्यापासून पूत्रप्राप्ती होते.
पर्वे ( अ. बोटाची पेरी ) : ही लांब असली तर ती सौभाग्याची व दीर्घायुष्याची दर्शक होत.
हातावरील रेषा : या रेषा स्निग्ध व खोल असता श्रीमंतपणाच्या व तशा नसल्यास दारिद्र्याच्या दर्शक समजाव्या, असा सामान्य नियम आहे. विशेष प्रकारच्या रेषांची फ़ळे खाली दर्शविल्याप्रमाणे समजावी :
हनुवटी : फ़ार कृश व दीर्घ असणे हे दारिद्र्याचे लक्षण होय. तीच पुष्ठ असल्यास द्रव्यप्राप्तीची सूचक होते.
ओठ  : पिकलेल्या तोंडल्यासारखे तांबडे व सरळ ओठ असणे, अगर ते कृश असणे, ही अनुक्रमे राजत्वाची व दारिद्र्याची लक्षणे समजावीत. वरचे ओठ फ़ुटीर, तुटलेले, कान्तिहीन व रूक्ष असल्यास ते दारिद्र्याची प्राप्ती सुचवितात.
दात : निर्मळ, दाट व सारखे, आणि दाढा अत्यंत तीक्ष्ण असणे, हे शुभदर्शक होय.
जीभ : तांबडी, दीर्घ, पातळ व सारखी असल्यास सुखप्राप्ती होते. पांढरी अगर काळी व कठोर असल्यास दारिद्र्य येते.
टाळा ( तालु ) : जिभेची लक्षणे टाळ्यासही लागू समजावी.
तोंड : सौम्य, वाटोळे, स्वच्छ व अति फ़ुगीर नव्हे असे तोंड असणे हे राजत्वाचे चिन्ह होय. याहून निराळ्या प्रकारचे तोंड दु:खाचे सूचक समजावे. दुर्भाग्य पुरुषांचे मुख अति विस्तीर्ण असते. ज्यांस अपत्य नाही त्यांचे मुख स्त्रियांच्या मुखाप्रमाणे दिसते. वाटोळ्या तोंडाचे लोक परकार्याविषयी विमुख असतात. लांब मुखाचे लोक दरिद्री, व भ्याल्यासारख्या मुखाचे लोक पाप्री जाणावे. मुख चतुष्कोण, खोलगट अगर फ़ार आखूड असल्यास त्यावरून अनुक्रमे वंचकपणा, पुत्राभाव व कृपणपणा ओळखावा. सुखी पुरुषांचे मुख पुष्ट व तेजस्वी असते. हसण्याच्या आवाजात जर कंपितपणा नसेल, तर ते हास्य शुभ समजावे. पुष्कळ हास्य हे आनंदाचे, व राहून राहून पुन: पुन: होणारे हास्य हे उन्मत्त स्थितीचे दर्शक होय. पातकी लोक हसताना डोळे मिटीत असतात ही खूण समजावी.
दाढीमिशांचे केश : या केशांची अग्रे फ़ाटलेली नसावीत, व केश तुळतुळीत, मऊ व उभे न राहणारे असावे. असे केश कल्याणकारक होतात. ज्यांच्या दाढीमिशांचे केश तांबडे, रखरखीत व थोडे अगर खुरटे असतात ते चोर निपजतात.
कान : कानावर मास नसलेल्या पुरुषास पापकर्माने मृत्यू येतो. ज्याचे कान पसरट असतील तो सुखी व धनवान होतो. आखूड कानांचे लोक कृपण निघतात. कानांची टोके तीक्ष्ण असल्यास राज्यप्राप्ती होते. कानांवर केश असणे हे दीर्घायुष्यप्राप्तीचे दर्शक होय. तेच शिरायुक्त असले तर मनुष्य क्रूर होतो, व लांब आणि पुष्ट असल्यास सुखकारक होतात.
गाल : उंच असल्यास उपभोगांची प्राप्ती, व मांसल म्हणजे पुष्ट असल्यास प्रधानपदवीची प्राप्ती, ही फ़ळे होतात.
नाक : पोपटाच्या चोचीसारखे नाक सुखाचे द्योतक, व शुष्क नाक दीर्घकाळ जगण्याचे दर्शक समजावे. तुटल्यासारखे नाक असणारा मनुष्य अगम्यगमन करणारा होतो. नाक लांब, आखूड अगर चेपटलेले असल्यास त्याची सौभाग्यप्राप्ती, चोरटेपणा व स्त्रीपासून मृत्यू ही फ़ळे अनुक्रमे समजावी. नाकाचे अग्र वाकडे असल्यास धनप्राप्ती होते. उजव्या अंगास नाक वाकडे असणारा मनुष्य खादाड व क्रूर होतो. ज्याचे नाक सरळ, त्याची भोके बारीक, नाकपुड्या सुंदर, तो मनुष्य भाग्यवान समजावा. एक शिंक येऊन न थांबणे हे धनवान पुरुषाचे लक्षण होय. ज्यांना लागोपाठ दोन अगर तीन शिंका येतात व त्या आनंदकारक असून घुमतात, तसेच ज्यांच्या शिंकेचा शब्द अति दीर्घ व जोडलेला असतो, ते लोक दीर्घायू होत.
डोळे : निरनिराळ्या प्रकारच्या डोळ्यांची फ़ळे पुध्र दर्शविल्याप्रमाणे वर्णिली आहेत :
भिवया : उंच असणे हे अल्पायुष्याचे लक्षण असून, त्याच विस्तीर्ण व उंच असता सुखाची प्राप्ती होते. दोन्ही भिवया लहान मोठ्या असणारा मनुष्य दरिद्री होतो, व बालचंद्राप्रमाणे नत भिवयाच्या मनुष्यास धनप्राप्ती होते. दीर्घ व असंलग्न भिवया धनप्राप्तीच्या दर्शक, तुटलेल्या दारिद्र्याच्या दर्शक, व मध्यभागी नमलेल्या अगम्यगमनाच्या दर्शक होत.
कंठावरील शंख : उंच व विस्तीर्ण असता मनुष्य धनवान होतो, व खोल गेला असता पुत्रहून व द्रव्यहीन होतो.
कपाळ : सारखे नसणे हे निर्धनपणाचे, व अर्धचंद्रासारखे असणे हे धनप्राप्तीचे दर्शक आहे. शिंपल्यासारखे विस्तीर्ण कपाळ असता आचार्यत्व, शिरांनी व्याप्त असता अधर्मप्राप्ती, उंच व स्वस्तिकासारख्या शिरांचे असल्यास धनप्राप्ती, ही फ़ळे प्राप्त होतात. ज्यांचे कपाळ खोलगट असते,  त्यांस वधाची अगर कारागृहाची प्राप्ती होते, व ते पातकाचरणी असतात. राजांचे कपाळ उंच असते, व कृपण पुरुषांचे अल्प व आकुंचित असते.
कपाळावरील रेषा : ह्या मुख्यत्वे आयुर्मार्यादेच्या दर्शक होत. पुढील वर्णनावरून या मर्यादा स्पष्टपणे कळून येतील :
येथे कोष्टक आहे. पान नं. ९० व ९१
मस्तक : पुढील प्रकारच्या मस्तकांची फ़ळे कंसात दाखविल्याप्रमाणे समजावी : वाटोळे ( गाईंची प्राप्ती ), छत्राकार ( राज्यलाभ ), चपटे ( आईबापाचा नाश ), टोपीच्या आकाराचे ( दीर्घायुष्य ), कुंभासारखे ( प्रवासाची हौस ), दोन मस्तकांच्या आकाराचे ( पातकाचरण व निर्धनता ), खोलगट (श्रेष्ठता ), व फ़ार खोलगट ( दु:खप्राप्ती ).


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP