श्रीविधिजृंभेपासुनि अत्यद्भुत पुरुष जन्मला रक्त,
आंगीं सुगंध ऐसा कीं, त्याचे सर्व गंध ते भक्त. १
गंधांहीं स्वसुगंधें, घडिला वर्णें जपाप्रसूनांहीं,
कोणी झाली जृंभेसम, करुनि तपा, जपा, प्रसू नाहीं. २
पुत्रस्रेहें त्रिजगज्जनकें, देवासुरादिवरदानें,
‘ सिंदूर ’ असें ठेउनि नाम, बहु दिलीं तयासि वरदानें. ३
‘ होइल भस्म तुझा रिपु, तूं ज्यांतें विष्टिसील बाहूंनीं, ’
हा अत्युग्र वर दिला, बहु कुरवाळुनि, समीप बाहूनी. ४
स्ववरपरीक्षार्थ, कुमति बाहूंनीं त्याचि विधिसि वेष्टाया
पाहे, फ़िरोनि येउनि; जेंवि वृकाच्या तशाचि चेष्टा या. ५
‘ मी पावलोंचि, सुनयत्यागाच्या हाहि खळ फ़ळा लाहो. ’
ऐसें म्हणतचि, देउनि पाठि कृतघ्नासि, विधि पळाला हो ! ६
ब्रह्मयाच्या पाठीला लागे तो बहु कृतघ्न सिंदूर;
त्या तापेंचि करपलें, काळें दिसतें म्हणून इंदूर. ७
विधि विष्णुकडे गेला, व्हाया वित्रास, तें निवेदून;
कीं, त्या सर्वशरण्यप्रवरासि स्मरुनिही, निवे दून. ८
वंदुनि, पुसतां, सांगे ब्रह्मा प्रभुला स्वखेदहेतूतें,
प्रार्थुनि म्हणे, ‘ म्हणति बा ! सदय गुरु शरण्य वेद हे तूतें. ’ ९
विष्णु म्हणे, ‘ लोकेशा ! तूं मर्त्य स्पष्ट काय ? हा यम रे !
हें व्यक्त, कृतघ्नजन व्यसनांत पडोनि, म्हणुनि ‘ हाय ! ’ मरे. ’ १०
तो सिंदूरासुरही वैकुंठामाजि विष्णुला पाहे;
बाहूंनीं वेष्टाया त्यातें, विधितेंहि, दुष्ट तो बाहे. ११
देव म्हणेम, ‘ मी सात्विक, विधिनें प्रथमचि तुला दिली पाठ,
वेदाची मात्र असे या वृद्धपितामहा किली पाठ. १२
तव युद्धोत्साहाला समुचित आहे महेश कैलासीं.
करणेंचि तरि करावी स्पर्धा विंध्यें सुमेरुशैलासीं. ’ १३
ऐसें ऐकुनि, जाउनि कैलासीं, सर्वसाधुवित्तातें,
पाहे तो सिंदूर, स्वसमाधिमुखीं निमग्रचित्तातें. १४
प्रभुच्या अंकीं होती श्रीगौरी, परम सुंदरी, तीतें
घेउनि निघे, धरी निजनाशा सुंदोपसुंद - रीतीतें. १५
ध्यानसुखीं न समजला जगदीशाला अनर्थ हा कांहीं,
सर्व प्रथमगणांहीं जाणविला मग अशेष हाकांहीं. १६
वृषभीं बैसुनि जातां अवलोकुनि सव्यथा पिनाकीतें,
‘ गौरीमोचन दुर्घट ’ म्हणती, ज्ञाते, तथापि नाकी तें. १७
गांठुनि रुद्र, क्षुद्रप्रकृतिस धिक्कार करुनि बहु दापी,
तों धांवे, भुज उभवुनि वेष्टाया ईश्वरासि तो पापी. १८
इतुक्यांतचि अति सदय प्रकटे नारायण प्रभु क्षिप्र,
मोही त्या खळमतितें होउनि अद्भुतविचित्रवाक् विप्र. १९
तो विप्र पुसोनि म्हणे, ‘ सिंदूरा ! युद्ध शंभुसीं कर गा !
ज्यातें वरिल जयश्री, होइल गौरी स्वयेंचि तत्करगा. २०
मध्यस्थ बुध असावा, सांगे जें काय सार साक्षी तें;
मी वर्तविन हरातें नयमार्गीं, याहि सारसाक्षीतें. ’ २१
हितवचन मना आलें; दारुण आरंभिला समर यांहीं;
हस्तींहीं सिंहांहीं, कीं शरभांहीं जसा समरयांहीं. २२
आज्ञापिला परेशें रक्षाया गुप्त परशु नीतीतें;
कीं जी सिंही, लंघूं पाहे नीचाहि परशुनी तीतें. २३
केले विनायकें त्या नकळत परशुप्रहार सिंदूरीं,
तेव्हां शोभति मुक्ताहार मुनीच्या सबाष्पबिंदूरीं. २४
खळ बळहीन परशुच्या चिरकाळेंकरुनि होय आघातें,
रोधाया छळ केला अरितें, पंजर जसाचि वाघातें. २५
त्यासि म्हणे विप्र, ‘ तुझा झाला भंग त्रिनेत्रशूळानें;
मारिल; वृथा मरसि कां अभिमानानें विनाशमूळानें ?’ २६
विफ़ळश्रम होउनि तो सिदूरासुर, उमेसि सोडून
गेला स्वस्थानातें, तेथुनि विप्रासि हात जोडून. २७
गौरी विप्रासि म्हणे, ‘ तुजहुनि हित अधिक काय गा तात ?
तूं कोण ? तुजहि गाउत, जेंवि शिवा बापमाय गातात. ’ २८
द्विजरूपातें सोडुनि, निजरूप प्रकट करुनियां दावी;
कीं गौरीमति, तैसी साधुसभा, निजपदींच नांदावी. २९
सायुध, चतुर्भुज, परमरम्याकृति, सिद्धिभुद्धि तत्सहित,
हरिरथ विनायक, करी जो श्रितहित जेंवि माय वत्सहित. ३०
तो श्रीविनायक प्रभु, जो या आधार सर्व विश्वास;
निश्वास वेद ज्याचे, ज्याचा साधूंसि पूर्ण विश्वास. ३१
देव म्हणे, ‘ जीस घडे, सर्वव्रतमुख्य जें, महासति ! तें.
व्यसन निवारुनि, दे तें अपरिमिता इछिल्या महास तितें. ३२
जेणें तुज दु:ख दिलें, त्या दुष्टातें वधावया युद्धीं,
उदरीं उपजेन तुझ्या, चंद्र जसा क्षीरसागरीं शुद्धीं. ३३
होउनि पुत्र तुझा मी भक्तमनोरथ अशेष पुरवीन;
नुरवीन विघ्न, परमप्रबळहि लावूनि आधि झुरवीन. ’ ३४
गुप्त विनायक झाला, निववुनि गौरीस अमृतवर्षानें
कैलासातें गेला मग शिव सस्त्रीक परमहर्षांनें. ३५