ऐकेल हे कथा जो, हें सद्भत जो करील, तोहि तमीं
न बुडेल, तुला वर घे देतों हा भक्तशीलमोहित मीं; ७६
जा राज्य करीं, विप्रा ! कौंडिन्या ! पावसील तूं मजला;
सजला वैकुंठा तो जाया, जो भक्तिनें मला भजला. ’ ७७
वंदुनि कौंडिन्य पुसे, ‘ चूतद्रुम कोण ? कोण ती गाय ?
वृष, पुष्करिणीद्वय, खर, गजवर, जे मार्गदृष्ट, ते काय ? ’ ७८
देव म्हणे, ‘ पूर्वभवीं विद्याधन असुनि बहु, न दे कवडी;
झाला असेव;य चूत, प्राप्त सुगतितें अनादरें दवडी. ७९
मग गाय देखिली त्वां, ती वसुधा बीज पेरिलें भक्षी,
प्रसवुनि विविधें सस्यें, त्या स्वरसें न प्रजांसि जी रक्षी. ८०
जो गोवृष, तो दांभिकधर्म, असें त्यां यथार्थ जाणावें;
मत्प्राप्ति तशा धर्में नाहीं, हें त्वन्मनांत बाणावें. ८१
पुष्करिणी त्या भगिनी, अन्योन्यचि देत घेत होत्या गा !
मत्पर जो जन त्याचें वश तैशा त्या न चेत हो त्यागा. ८२
खर जो, तो क्रोध समज; बा ! मद तो मूर्त जाण, जो गज, गा !
ज्यांच्या योगें होतो नानाविधनरकभोग रोग जगा. ८३
कौंडिन्या ! जो वृद्धब्राह्मण, तो मीं अनंत बा ! समज;
मदनुग्रहेंचि पावे मच्चिंतनरत विभक्त दास मज. ८४
जी पाहिली गुहा त्वां, ती संसृति, तत्व हें तुला समजो.
तो मत्प्रिय, मातेसम मज मानी, आपणा मुलासम जो. ८५
जा स्वगृहातें, व्रत घे चवदा वर्षें, करीं सदाचरण;
मज पावसिल सुखें; हे माझे, हृदयीं धरीं सदा, चरण. ८६
सांग व्रत उद्यापनविधिनें; न करीं कदापि आळस त्या;
येवूं द्यावी न चुकी, स्पर्शों देती तशी न आळ सत्या. ’ ८७
‘ ब्राह्मण आधीं चुकला, परि आला शरण, मुक्तिपद लाहो, ’
यापरि मनांत आणुनि भेटुनि, ऐसें अनंत वदला हो ! ८८
मग अंतर्हित झाला, स्वप्न क्षणभरि मनांत वाटविला;
प्रभुच्या प्रसादघटजें शरणागतशोकसिंधु आटविला. ८९
कौंडिन्य द्विज आला, होवुनि अत्यंत हृष्ट, सदनातें.
समजे प्रसाद शीला पतिच्या अवलोकितांचि वदनातें. ९०
शीलेतें कौंडइन्य प्रभुदर्शनवृत्त सर्व आयकवी;
सांगे, ‘ विलोकिला म्यां तो, ज्याचे चिंतितात पाय कवी. ९१
शीले ! धन्ये ! सुव्रत वरिलें त्वां माझियाचि उद्धरा;
शुद्धा रामा तुजसम तूंचि; तुझी शीलरीति मुद्धारा. ९२
सत्य ‘ अनंतप्रभुतें ’ कवि ‘ चिंतुनि ’ म्हणति जें ‘ निवे दून ’
शीले ! प्रसादभाजन झालों, अपराध मीं निवेदून. ९३
शक्य जगज्जन्मस्थितिलयकल्पनगात देववेदा न.
प्रभुचरणरेणु दे जें, तें कल्पनगा न देववे दान. ’ " ९४
श्रीकृष्ण म्हणे, ‘ राज्या ! आयकिली कीं कथा मुखें माज्या ?
पावसिल व्रत करितां त्या भव्या, वांछितोसि तूं बा ! ज्या. ९५
दोरक बांधोनि करीं म्हणति ‘ गुरुजनीं ’ महाकवि ‘ नटावें. ’
श्रीमदनंतपदाब्जीं, संतीं देतां न हाक, विनटावें. ९६
धर्मा ! या व्रतराजें अगणित तरले, पुढेंहि तरतील;
सरतील श्रम सारे, प्राणी जन्मुनि पुन्हा न मरतील. ’ ९७
क्षुधिता जसेसं म्हणावें, ताटीं वाढूनियां सुपायस, ‘ खा; ’
तेंवि विपत्तींत कथी धर्मा हा जिष्णुचा उपाय सखा. ९८
सांगे स्वयें अनंतप्रभुसत्तम कृष्ण असि कथा राया.
श्रीरामसुतमयूरें लिहिली हरिभक्त, रसिक थाराया. ९९
श्रीमदनंतकथा हे श्रीमदनंताघ्रिपंकजीं भावें
वाहिलि भक्तमयूरें, प्रभुचें यश नित्य आदरें गावें. १००
कवि म्हणति, ‘ कीर्तनें या कलिमाजि अनंतराय सव घडतो,
यश गारां, आयकितां, होतोचि अनंतराय सवघड तो.’ १०१
रसिक श्रीहरिभक्त श्रीहरिच, करुनि तयांसि मीं नमन,
मागतसें, ‘ हें व्हावें श्रीरामयशोर्णवांत मीन मन. ’ १०२
जो सुरसिक हरिजन, तो भगवच्चरितींच देखिला रमला,
म्हणतो ‘ हरिकीर्तन जें, सुरभीचें न दे खिलार मला. ’ १०३