मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
रामस्तव

रामस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( अनुष्ठुभ् वृत्त )

श्रीरामा ! नीरदश्यामा ! सुखधामा ! रघूत्तमा !
त्वत्पादनखचंद्राची ज्योत्स्रा माज्या हरू तमा.     १
यास्तव स्मरतों नित्य स्वामी ! तुज दयाकरा !
तापापासूनि हा दीन मुक्त होय असें करा.     २
सेवा करावया लावा देवा ! हा योग्य चाकर
या तप्ताच्या शिरीं आतपत्र हो तुमचा कर.     ३
शरणागतसंत्राणीं रामा ! तूं बहु सादर
ऐसें असोनियां, दीन पावतो हा कसा दर ?     ४
मायानदींत श्रीरामा ! तुजे चरण सांगडी
बहु आवडले हेचि साधूंच्या मानसां गडी.     ५
मीनाचें जीवन जळ, दीनाचें तूंचि केवळ
मी नाथा ! तापलों. यत्नहीनाचें मुख्य तूं बळ.     ६
आलों शरण्या ! तुजला शरणागत पातकी
न होसि तूं दीनबंधो ! शरणागतघातकी.     ७
विश्वास विश्वास तुझा कीं तूं दीनासि रक्षिसी
कशाही संकटीं ‘ धांव ’ म्हणतां न उपेक्षिसी.     ८
तुज्या प्रतापें आम्हांतें या काळीं जरि पाळिलें,
तरि सांभाळिलें सर्व; यश नातरि वाळिलें.     ९
तरि पंकांत रुतली राय तो तीस उद्धरी     
पाय दीनासि रक्षीना काय श्रेष्ठत्व तें तरी ?     १०
राम रघूत्तम कामरिपुप्रिय लोकशोकहर यापरि भावें
दाशरथे ! तुज होउनियां पदिं लीन दीनजनबंधुसि गावें;
आमरण स्मृति हेच असो, वय या च साच सुपथांत सरावें,
दे वरदा ! वर या शरणाप्रति पापतापजलधीस तरावें.     ११

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP