बोलुनि, पळांत भिजवी जो, प्रेमजळें, अशेषविंदूर,
तो नारदमुनि गेला, जेथें होता सुरारि सिंदूर. १
सिंदूरें सर्कारुनि, बैसविला आपुल्या पदीं, नमुनी,
सर्वत्र पूज्य ज्यासम कोणीहि न, जो कधीं न दीन मुनी. २
लावी, स्वप्रिय, सुरहित, कविरंजन व्हावयासि, कळहातें,
ज्यासि बहुप्रिय हरिहरयशसें, व्यसनार्त म्हणति खळ ‘ हा ! ’ तें. ३
तो मुनि असुरासि म्हणे, ‘ तुजसम कोणी न देखिला अन्य.
तूं मात्र एक राजा, सिंदूरा ! भूमिमंडळीं धन्य. ४
श्रेम तिळहि न करितां, अतिदुर्लभ विधिनें तुला दिले वर ते,
ज्यांहीं स्वर्गीं सुरवर, नृप केले भग्न या इलेवरते. ५
वदवे न तुझ्या महिमा, माझ्या या आनना, कपाळाचा,
तुजवांचूनि न झाला मदहर्ता आन नाकपाळाचा. ६
मेळविलें तेज तपें शक्रयमवरुणकुबेरतपनाहीं,
तूं तदधिक तेजस्वी, पदरीं तों एक तिळहि तप नाहीं. ’ ७
विस्पष्टही जडहृदय नुमजे, कीं स्तवन तेंचि अस्तवन,
क्षण पावुनि तेज, म्हणे, ‘ सर्वाधिक आपणासि अस्तवन. ’ ८
खळ त्यासि म्हणे, ‘ प्रथम स्वेछित, मग साम्ग तोषदा वार्ता. ’
जो मुनि अमृतमुदिरसा निववी तत्काळ दोषदावार्ता. ९
नारद म्हणे, ‘ तुझें तें माझें; हा बंधु अन्य कां गमला ?
ऐक विचित्रा वार्ता, जैसी म्हणतोसि काय सांग मला १०
सौभाग्यें, खौदार्यें, सुयशें, जी हांसती उमा रतिला,
बा ! छिन्नमस्तक, परमरुचिराकृति, जाहला कुमार तिला. ११
तो अत्यद्भुत, केवळ सच्चित्सुख मूर्त, काय सांगावें ?
त्या त्यजुनि परां, जैसें हंसा सोडूनि वायसां गावें. १२
मुख नसतां, वदला; ते आयकिले म्यांचि बोल कानाहीं,
मज वाटे, तैसा तों कोणी विश्वांत बोलका नाहीं. १३
शिवभक्त म्हणुनि पूनित होता, तें हस्तिशिर तया जडलें,
घडलें, न घडावें, तें. विश्व परम विस्मयार्णवीं पडलें. १४
दुर्गेचें तोक जसें, तैसें नाहींच चांगलें काहीं,
पाहोनि अश्विनीच्या गणिलें स्वकुरूप आंग लेंकांहीं. १५
जी भव्या तपनद्युति, लाजतिल निकट कसे न दीप तितें ?
त्या लोपलेचि पावुनि तेजस्वी, नद जसे नदीपतितें. १६
या रूपें परमेश्वर धर्मप्रतिपालनार्थ अवतरला,
तरलेंचि विश्व, केवळ न शचीचा मात्र एक धव तरला. ’ १७
ऐसा प्रताप कानीं जैसा देवर्षिच्या मुखें पडला,
त्रासें तोही, जाणों पविपातें पात पर्वता घडला ! १८
परिजन घालिति, सहसा धावुनि हाके, शवासि वारा हो !
मुनिहि म्हणे, ‘ समरसुरस सेविन, हा केशवा ! शिवा ! राहो ! ’ १९
तो खळ उठोनि कोपें मुनिस म्हणे, ‘ चाल बाळ दावाया,
नाहींतरि, आजि शलभ तूं सांपडलासि काळदावा या. ’ २०
हांसुनि त्यासि मुनि म्हणे, ‘ उचितचि तुज दुर्जनासि चेष्टा या;
वांछित होतासि वर्स्दविधिसि भुजांनीं वधार्थ वेष्टाया. ’ २१
ऐसें म्हणोनि, झाला गुप्त मुनि; धरील हरिस काय ससा ?
देवर्षि हंससा, तो सिंदूर कुबुद्धि पाप वायससा. २२
सांपडतो यासि कसा ? व्यसनीं बाळादि साधु तारितसे,
जो कामाद्यरिषट्का त्रिभुवनकाळा दिसा धुतारितसे. २३
मुनि कैलासीं जाउनि दुर्गेसि म्हणे, ‘ यशें उभे ! रुचिर
क्षीरधिहुनि कुक्षि तुझा, गाइल तव कीर्तितें सुमेरु चिर. २४
स्नेहास्तव मन भीतें जरिहि तुझा शंभुकल्प हा तनय,
तो खळ निर्दय, निर्भय, निस्त्रप अत्यंत, अल्प, हातनय. २५
आला सिंदूर शिवे ! शीळ तयाचें तुला सकळ कळतें.
अळिमन, गजें उचलितां पद तुडवाया फ़ुलास, कळकळतें. ’ २६
ऐसें मुनि सांगे, तो दीपाप्रति करुनियां पतंग जवा
येतो जैसा, यावा भ्रमुनि मृगाधिषतिवरि मतंगज वा. २७
सिंदूरासुर तैसा आला दाटुनि गजाननावरि तो,
आवरितो अगतायु स्वांतासि, तिळहि गतायु नावरितो. २८
घनसम गर्जोनि म्हणे, ‘ सत्वर बाहिर अरे अरे ! निघ, रे !
छायेंत कठिन असतें, येतां नवनीत आतपीं विघरे. ’ २९
ये प्याया दुर्गोदरकुंभज, सिंदूर विहिर यातें हो.
त्याच्या पाहोनि, निजा मारुत निंदू, रविहि, रयातें हो ! ३०
बाळ म्हणुनि धिक्कारी वीर्यमदें तो इभानना शतदा,
त्रासें प्रथमगणांचा झाला देहादिभाननाश तदा. ३१
भगवान् विनायक प्रभु सिंदूरातें म्हणे, ‘ अरे मंदा !
मंदारा मज बब्बुळ निंदिसि तूं कपटविषलताकंदा ! ३२
तत्काळ बसोनि गळां, प्रबळाचाही विनाश चीप करी,
स्वल्पाहि अंकुशा मद अतिमत्तहि दाविना शचीपकरी. ३३
बहु शतयोजनविपुळाकारां सकळां नगांहि कांपवितो
मंदा ! एकें अचळें न गणावा, लघु म्हणोने, कां पवि तो ? ’ ३४
नाशी प्रबळा मोहा चतुरक्षरमात्र सुगुरुकृतबोध,
आकार असो लघु, गुरु; तेजस्वी साधितो विजय योध, ३५
लघु बाल बालिशा ! मज म्हनसी तरि नीट मजकडे पाहें,
ज्यांचें शिर हरिलें त्वां, तो गौरीपुत्र मी कसा आहें ? ’ ३६
ऐसें वदोनि, भगवान् गजमुख निज विश्वरूप दावी तें,
जें ब्रह्मपदप्रमुखा सर्वा लीलालवें पदा वीतें. ३७
देता अभय प्रभुवर, जरि, होउनि गर्वहीन, हा लवता,
होता शाश्वत; हरितां काळानें सर्वही न हालवता. ३८
सामें दानेंहि म्हणे प्रथम शिवा ‘ बा ! लहा कशाला हो ? ’
न वळेचि तरि, मग बहि:कोपलवें ‘ बाल हा कशा लाहो. ’ ३९
सिंदूर विश्वरूप प्रभुवरिहि करी प्रहार उत्साहें;
साधूंत पावलें जरि, तरि न सुवीरांत कर्म कुत्सा हें. ४०
हुंकारें मद हरिला; धरिला अरि लाजवावया हरिला,
परि लवकग्रहें बहु संकोच खगेश्वरें तसा वरिला. ४१
परिपक्व शोण रसफ़ळ जेंवि करतळांत, तेंवि तो चिरडे,
साफ़ल्य नुमजलें ज्या, तत्संश्रित असुरवर्ग तोचि रडे. ४२
प्रभुनें रगडुनि त्यातें, निजमस्तक, भरुनि हात, सारविला,
नच शोभला उदयनग, या रंगा धरुनि हा, तस रविला. ४३
स्ववुनि, नमुनि, कुसुमांची करिति सुर श्रीविनायकीं वृष्टि,
सृष्टि तसीच निवे, जसि विजयिसुतविलोकनें शिवादृष्टि. ४४
कनककशिपुच्या भ्याले बहु पाहुनि घातका, परि समोर
प्रह्रार न भी; हर्षें फ़ार घनें चातकापरिस मोर. ४५