मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
रेणुकास्तव

रेणुकास्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

भगवति ! सुखविसि विनता, जो म्हणतो, ‘ रक्षु रेणुका मातें. ’
पुरवितसे त्वन्महिमा, श्रीहरिचा जेंवि वेणु, कामातें. ॥१॥
भगवति ! असो कसें तरि पाळावें तोक रेणुके ! लागे.
मुक्त स्मरतांचि कसा श्रीहरिनें तो करेणु केला गे ? ॥२॥
नामप्रताप तारी तव दीन देवि ! नेणु केवळ तो.
श्रीहरि कसा स्वनामें पतितोद्धारार्थ रेणुके ! वळतो ? ॥३॥
जो तव रामजननि ! घे नाम, जन निधे श्रमांतुनि त्वरित.
अमृत प्राशुनि, सुटतो कष्टापासुनि, जसा अतिज्वरित. ॥४॥
श्रीरेणुके ! पहातो तुज, गात, ध्यात, भक्त माहुर तो.
स्वर्गीं वसतो म्हणसी, ‘ वत्स सुचिर दिव्य भोग लाहु, रतो. ’ ॥५॥
भास्करतेज उडवितें जेंवि करुनि अतितमा तमा दूर;
तेंवि दुरितदु:खांची उरवी भगवति ! न मात माहूर. ॥‍६॥
परमे! वर मेरु - असे देसि नता, म्हणसि, ‘ सत्तम नरा ! हो. ’
तरिच म्हणतसे, ‘ तुझिया क्षेत्रीं ’ योगींद्र दत्त ‘ मन राहो. ॥७॥
देवि ! महाशक्ति ! पळहि कवि विसरति न तुज राममातेतें.
देसी सुभाग्य जेणें नच होवुनि आप्तकाम, माते तें. ॥८॥
तो त्रिजगत्प्रख्यात त्वन्नंदन रेणुनृपसुते ! ज्यातें
‘ श्रीविष्णु ’ म्हणति कवि, रवि ज्याच्या बहु मानवे सुतेज्यातें. ॥९॥
श्रीरेणुके ! भवानी तूं, श्रीजमदग्नि रुद्र, अरिपाणी
तो राम पुत्र तुमचा, झाले पाहोनि ज्यासि अरि पाणी. ॥१०॥
तेज तुझें, त्वत्पतिचें, त्वत्पुत्राचेंहि, जेंवि अर्णव तें.
असतीं लक्ष मुखें जरि, तरिहि महासति ! मला न वर्णवतें. ॥११॥
भुक्तिहि, मुक्तिहि, पावे जन, तुज, कीं हरिस, शंकरास, भजो.
सुलभ भजन, परि न भजे केवळ नररूप रंक रसभ जो. ॥१२॥
तव कीर्ति गारि कीं, त्वां नतवाहन हरिकरेणु केला, हे.
मोक्शचि पावे सुरगज, कामी तो बरिक रेणुके ! लाहे. ॥१३॥
ज्या तव औदार्यकथा, वरदे ! परदेवते ! अगाधा त्या.
म्हणसी, ‘ शरणागत मम वत्सचि, रुसलासि कां ? अगा ! धात्या ! ’ ॥१४॥
देवांच्या वल्लीला, त्वल्लीला, सुरभिलाहि लाजविती.
साजविती न तुज अशा त्या त्वद्यश वेद - साधु गाजविती. ॥१५॥
तूं ब्रह्मपूर्वविद्या, मूर्तिमती निववितीस सुज्ञानें;
हें जाणावें मुक्तिप्रद तव सुत यावरूनि सुज्ञानें. ॥१६॥
सुरमुनिवरसत्कार्या, साधूंच्या धावतीस सत्कार्या,
तूं श्रितवरदा आर्या, म्हणुनि तुज मयूर वाहतो आर्या. ॥१७॥
माते ! त्वद्भक्त रसिक साधु तव स्तुति म्हणोनि गावूत;
परकृतसाहित्येंही समयीं करिती स्वकार्य रावूत. ॥१८॥
श्रीरेणुके ! करावें स्तवन यथामति असें मनीं सुचलें;
हें निर्विघ्नहि घडलें, तेव्हां नतवत्सले ! तुला रुचलें. ॥१९॥
वर्ण तुझे, शक्ति तुझी, प्रतिभाहि तुझीच, तूंचि अथवा हे
स्वस्तुति करिसी, किंवा ‘ पत्रं पुष्पं ’ असाहि पथ वाहे. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP