मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
अनंतव्रतकथा १

अनंतव्रतकथा १

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

‘ श्रीमदनंतप्रभुची गावी प्रेमेंकरूनि पुण्यकथा, ’
भाग्यें संदेश असा आला हरिजनमुखें स्वकर्णपथा.     १
भगवन्महिमा गातां होताहे कायवाड्मन: शुद्धि,
यास्तव भगवद्भक्तप्रेरित मीं गातसें यथाबुद्धि.     २
धर्म म्हणे ‘ श्रीकृष्णा ! मीं द्यूतें जाहलों पदभ्रष्ट,
स्पष्ट नरक निर्धरता; माझे सरतील हे कसे कष्ट ? ’     ३
श्रीकृष्ण म्हणे, ‘ धर्मा ! ताप अनंतव्रतें अखिल सरतो,
करुनि चतुर्दश वर्षें, जीव विपत्सागरीं सकळ तरतो. ’     ४
धर्म म्हणे, ‘ व्रत ज्याचें, तो क्कोण अनंत देव ? कळिव मला;
त्वद्वचन सेव्य दासा; पद्में मधु पाजिलें न अळि वमला. ’     ५
कृष्ण स्मित करुनि म्हणे, ‘ कथितों तुज धरमनंदना ! सत्य,
बापा ! मींच अनंत स्वाश्रितभवरोगकंदनासत्य. ’     ६
कुरुपति म्हणे, ‘ मुकुंदा ! कोणीं केलें, कधीं कसें, व्रत ? ती
सांग कथा; त्वद्रसना तर्पू, जसि नंदनीं रसें व्रतती. ’     ७
यदुपति म्हणे, " कुरुपते ! कथितों सद्भतकथा, परिस राया !
राज्यपदच्युतिरूपा जरिहि दुरंत व्यथा, परि सराया.     ८
होता विप्र कृतयुगीं सुतपा, ज्ञानी, ‘ सुमंत ’ या नावें;
वानावें यश ज्याचें, साधूंनीं ज्यास फ़ार मानावें.     ९
तद्भार्या भृगुकन्या, साध्वी ‘ दीक्षा ’ असें तिचें नाम;
बा ! मर्त्येशा ! शोभे स्त्रीनें श्रीनें, तसेंचि तें, धाम.     १०
तीच्या पोटीं झाली कन्या, नामें धरावरा ! ‘ शीला; ’
जैसी सुगुणमणींच्या ती पात्र, तसी परा न, राशीला.     ११
पावे पंचत्वातें दैवें दीक्षा, सुमंत तो विप्र
दुसरी स्त्री संपादी, धर्मातें चालवावया क्षिप्र.     १२
स्त्रीकेली दुसरी जी, तीचें अन्वर्थ ‘ कर्कशा ’ नाम;
तापें सुमंतदेह स्वेदार्द्र, जलार्द्र घट जसा आम.     १३
पितृगृहभित्तिवरि बरीं नाना चित्रें लिही सदा शीला,
त्या शिल्पें वृद्धांच्या होय नृपा ! पात्र ती सदाशीला.     १४
देहीं यैवन दिसतां, तातें शीलाभिधा निजा कन्या
सुमुहूर्तीं सुविधानें कौंडिन्याख्य द्विजा दिली धन्या.     १५
शीलेसह कौंडिन्य स्वगृहाप्रति जावया निघे, धर्मा !
स्त्रीस सुमंत म्हणे, ‘ दे आंदण पाथेय कन्यकाशर्मा. ’     १६
सांगे ऐसें घ्याया, द्यायासि सुमंत हा यश स्त्रीतें,
परि कर्कशा करी, जें करि म्हणवायासि ‘ हाय ’ शस्त्री तें.     १७
धर्मा ! दु:खगृहाचा संसारीं सुदृढ कर्कशा पाया.
तेजस्वीही तापे, लागे छायेसि अर्क शापाया.     १८
भिंतीवरिल्या काडी चित्रांच्या खरवडूनि ती खपल्या,
मंजूषेंत भरुनि दे आंदण; ऐशा न कुस्त्रिया खपल्या !      १९
पेटारींत भरूनि ती बा ! पाथेयार्थ अन्न दे उष्टें.
दुष्टें अशा कळत्रें लज्जा सुकुळासि बहु, जसी कुष्टें.     २०
भोजनसमयीं उतरे मध्यह्रीं ती नदीतटीं शीला,
लीला जेंवि शिवाची, छद्म किमपि ठावुकें नसे जीला.     २१
तीथें देवार्वनसक्ता, भक्ता, बहु स्त्रिया पाहे;
त्यांसि पुसे, ‘ आर्या ! हो ! सांगा कोण प्रसंग हा आहे ? ’     २२
वदल्या स्त्रिया, ‘ सुशीले ! शीले ! लीलेंकरूनि विश्वास
जो प्रभु अनंत रचितो, त्या पूजितसों धरूनि विश्वास.     २३
व्रत, शुक्ला भाद्रपदीं मासीं येतां चरुर्दशी, भावें
घ्यावें; भव्य अनंतव्रत हें पूजूनि, विष्णुतें ध्यावें.     २४
ग्रंथि चतुर्दश देवुनि, पूजुनि दोरक, करांत बांधावा;
प्रभुला अर्पायास्तव घृतपाचित सत्पदार्थ रांधावा.     २५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP