मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
बिंदुमाधवस्तुति

बिंदुमाधवस्तुति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतवृत्त )

श्रीबिंदुमाधवा ! तूं सदय सदा मज पदानता पावें
शरणागतें तुझ्या बा ! लक्ष्मीरमणा ! कदा न तापावें.     १
दीनोद्धार - महाव्रत विश्वेशप्रभुवरें जसें काय
स्वीकारिलें, तुवांही, स्वीकारुनियां दयारसें काय ?     २
दिसतां भिन्न, परि तुम्ही एकचि पाहे तुम्हांत जो भेद,
वेद स्पष्ट म्हणतसे, ‘ प्राप्त तया होय भय, महा खेद ’.     ३
उद्धरिले बहु पापी तुझिया श्रीबिंदुमाधवा ! नांवें
विश्वेश्वरयशसेंचि, त्वद्यशही अत्युदार वानावें.     ४
ताप हरुनि, सुख देतें तुमचें सत्कीर्तिगायनव्यजन
वर्णी असें पुराणीं श्रीव्यास, न हाचि गाय नव्य जन.     ५
आराधुनि स्वयें त्वां ईशा ! विश्वेश्वरा ! सदाराध्या,
उपदेशिलें त्रिजग कीं, या श्रितकल्पद्रुमा सदारा ध्या.     ६
त्वां शिवपदपद्मावरि नियमें, प्रेमेंहि दृढतरें अमळें,
उच्चारुनि शिवनामे, तितुकींच सहस्त्र वाहिलीं कमळें.     ७
निववावया बहु, भरुनि साधूंचे निजयशोगुणें कान,
करिल सहस्त्रांत कमल एक प्रभु - कौतुकी उणें कां न ?     ८
तूंहि महाशैव, प्रभुचरणावरि नेत्रपद्म वाहूनी,
सत्यप्रतिज्ञ विष्णो ! झालासि, शिवप्रसाद लाहूनी.     ९
संरक्षिला करींद्र, प्राणव्यसनीं, वधूनि नक्रातें;
शक्रातें, असुर मथुनि, सुखवी,  त्या गाति साधु चक्रातें.     १०
तूं हरि भजसि शिवातें, भजतो तुज मुक्तिदायका पुरहा
युष्मद्यशोजित विधुहि म्हणतो, न म्हणेल काय कापुर हा ?     ११
भजतो शिव आराध्या तुज, तूंहि भजसि शिवाचि आराध्या
म्हणती मुमुक्षु जे त्यां अस्मदभेदाचि वेदसारा ध्या.     १२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP