मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
विश्वेशस्तुति १

विश्वेशस्तुति १

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


श्रीकंठा ! विश्वेशा ! बा ! तूं निरवधि दयासुधासिंधु.
ऐसें करीं, न माझ्या हृदयातें विषमशर शरें विंधू.     १
बा ! घालिता न झाला कोणीही तुजसमान सत्रास.
संसृति पासुनि पावे कोणाचेंही न मानस त्रास.     २
ज्प सुव्रत साधु, तया भजतां वेदान्त देतसे मुक्ती.
पापिजनेंहि तुझी बा ! ‘ नाहीं ’ ऐसी न ऐकिली उक्ती.     ३
जी मुक्ति दुर्लभा, तूं देसी, तनु सोडितांचि, उरगा ती.
तुरगा ती, नागा ती, कीटा ती, हे सुकीर्ति सुर गाती.     ४
सर्वांसि समचि देसी अमृत; प्रभु तूं वदान्यवर साचा.
नरसा चाळविसिल कां ? उचितज्ञा ! त्यासि भेद न रसाचा.     ५     
तेंहि अमृत ओगरितां, करि सुज्ञहि विष्णु पंक्तिभेदातें.
परि तें हरितें हरिचें कर्म, कविमनासि, हरुनि खेदातें.     ६
सर्वस्व समर्पिसे बा ! मरणावसरीं द्रवोनि अनतातें
धन तातेंहि न द्यावें, जाणतसे सुप्रसिद्ध जनता तें.     ७
क्षीरसमुद्र दिला त्वां त्या उपमन्युद्विजासि. या दानें
भरिलें विश्व सुकविनीं संतत सर्वत्र साधुवादानें.     ८
मरणावसरीं सर्व प्राण्यांचा होय दक्ष कान वरी.
उपदेश करिसि ज्या, तो मुक्तीस विचारदक्ष कां न वरी ?     ९
शंभो ! अंभोधर तूं काशीगत सर्व जीव चातक हा.
पाजिसि सदमृत. म्हणवी अज्ञात, ज्ञातही न पातक ‘ हा.’     १०
त्वां केलें जीवांच्या पूर्ण न आशींत काय विश्वेशें ?
धन्यच तो, जरि खाती तोडुनि काशींत काय वि-श्वे शें.     ११
सत्त्व किमपि न विसरसी. कीं पळहि न बाप लाडकें विसरे.
भिवुनि व्याकुळ झालें, तें सोडुनि बा ! पलाड केंवि सरे ?     १२
ध्याया वितान, जो दे तव शीर्षीं मूढ दस्युजन पाय,
तोहि समुद्धरिला त्वां विश्वेशा ! त्वत्प्रसाद अनपाय.     १३
ज्याचें एक शुभ, अशुभ विश्वे, शत-शासनास नादरिता,
होवूं न देसि बा ! तूं विश्वेश तशास ना सनाद रिता.     १४
जो मूढ व्याध तुज्या, वदनींचें तोय, मस्तकीं थुकला,
मुकला न गतिस. वाटे तुज कीं अभिशेकविधि न तो चुकला.     १५
तूं बंधु, दीन मीं, हें जाणें; येतें असेंचि वदनातें.
ठावें असेल दुसरें तरि सर्वज्ञा ! स्वयेंचि वद नातें.     १६
वाल्मीकिव्यासादि श्रेष्ठ कवि, तसेचि वेद, हे तूतें
पुसतां तातहि म्हणती सर्वज्ञा ! मुख्य विश्वहेतूतें.     १७
तुज साधु ‘ पतितपावन ’ ऐसें म्हणतात. पतितपावनता
हे प्रत्ययास येवू. मज, जाणुनि पादपतित, पाव नता.     १८
सर्वजडोद्धरव्रत वरुनि, विभो ! सोडिसी न टेंकेला.
त्वां पण सिद्धिस नेला शंभो ! इतरें जसा नटें केला.     १९
भाटपण प्रभुवर्या ! कोणा दिधलें नसे तुबां कविला ?
वांकविलें जग; एकचि सद्धर्माचा न सेतु वांकविला.     २०
त्वदगुण न रुचति कोणा ? बहु रुचले नायका कवीला जे.
त्यजुनि सुधा, सुज्ञ रसिक सेवूनि न काय काकवी लाजे ?      २१
मज दीना अर्थिजना स्वभजन सप्रेम या महा दे, वा
काशींत मरण वरदप्रवरा ! विश्वेश्वरा ! महादेवा !     २२
तुज ‘ भोळानाथ ’ असें म्हणती; कीं मुक्त करिसि अमितांतें.
जें शत अपराधांचें, घालिसि पोटांत, पाय नमितां, तें.     २३
बहु तव यशासि लाजे, यश, शिबिमुख जे, तयां उदारांचें.
फ़ार अगत्य नतांचें बा ! तुज, सुपतिस जसें सुदारांचें.    २४
करिती मुक्त, मग करिल काय न पटु तव उपासना कवनीं ?     
दीक्षित अमृत प्राशी. पावेल न कां तुपास नाकवनीं ?     २५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP