मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
अनंतव्रतकथा ३

अनंतव्रतकथा ३

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


तीहि तसेंच वदे, मग कौंदिन्य क्षोणिसुर म्हणे ‘ हाय !, ’
तों शाद्वलीं विलोकी गोवृष, त्यासहि पुसावया जाय.     ५१
पुसतां तो वृषहि म्हणे, ‘ स्वामी ! न अनंतदेव मीं जाणें.  
खाणेंमात्र मज कळे; शोधीत, पुसत, असेंच बा ! जाणें. ’     ५२
पुष्करिणीद्वय पाहे, ज्याच्या अन्योन्य मिसळल्या लाटा;
त्यांतें म्हणे, ‘ बहु हिता पांथातें मायमावसी वाटा. ’     ५३
प्रार्थी, ‘ पुष्करिणी हो ! विदित जरि अनंतदेव, सांगावा;
उपकार श्रेष्ठ न, तरि कविनीं होवूनि मुदित कां गावा ? ’     ५४
पुष्करिणी त्या वदल्या, ‘ आम्हांसि अनंत ठावका नाहीं;
आम्हीं आयकिलाही त्याचा न स्पष्ट ठाव कानाहीं. ’    ५५
त्याउपरि पुढें जातां, द्विज पाहे गर्दभास गा ! राया !
त्यातेंहि तसेंचि पुसे, त्या दु:खीं आपणासि ताराया.     ५६
प्रमुदित काय करिल हो ! तो करुनि अनंतकथन रासभ या ?
नेणे स्वयेंचि, कैसा दाविल भयरहित पथ नरा सभया ?     ५७
अवलोकिला तयावरि मोटा गज काननीं, अनंतर तें
पुसिलें, इतरांला जें, त्याप्रतिही त्या द्विजें अनंतरतें.     ५८
जो नित्य मदांध वनीं गुरुतरुवररम्यकुंज रगडीतो,
सांगुनि अनंत, होयिल विप्राचा काय कुंजर गडी तो ?     ५९
होवुनि निराश, दु:खित, निजला, भिजला निजाश्रुनीरानीं,
आला अनंत वृद्धद्विजरूपें द्रवुनियां मनीं रानीं.     ६०
उठवी कौंडिन्यातें करूणावरुणालय स्वयें बा ! गा !
‘ मागा वर ’ म्हणता जो शरणागतरक्षणीं सदा जागा.     ६१
बोले ‘ अनंत तुज , ये, दाखवितों; त्यजुनि कानना, चाल. ’
राजाजी ! साधु तुम्हीं ऐकुनि हें नवल, कां न नाचाल ?    ६२
दक्षिणकरीं धरुनि, तो वृद्धें नेला गुहेंत शीलेश;
श्रम, वाल्मीकिकृति जसी, शिरतां नुरवीच ती तशी लेश.     ६३
शिरतां गुहेंत, झाली सुपुरी निववावया मना दिसती;
सकळां पुरींत मुख्या जी, स्त्रीमध्यें जसी अनादिसती.     ६४
तींत मणिप्रासादीं विप्रासि अनंतदेव दाखविला
त्या वृद्धें, रुग्णातें जेंवि सुधार्णवतरंग चाखविला.     ६५
विप्र अनंतप्रभुस प्रेक्षी, जैसा मयूर वनदास;
नमुनि, स्तवुनि, समर्पी तच्चरणीं शिर, तसेंचि मन, दास.     ६६
‘ पोटीं घालावा त्वां, जोडा माझ्या नसेचि अपराधा;
त्वत्सम तूंचि प्रभु, बा ! त्वदितर अमृतें म्हणेल न परा धा.     ६७
शरणागतवत्सळ तूं शरणागत मीं, म्हणोन रक्ष मला;
जगदीश्वरा ! अनंता ! त्वदितर दीनावनास न क्षमला. ’     ६८
ऐसें कौंडिन्य वदे; स्मित करुनि, म्हणे अनंत विनतातें,
‘ प्रेम नतीं करितों मीं, तैसें करिजेल लेशहि न तातें.     ६९
भय न धरीं विप्रा ! तूं, जें तव हृदयीं असेल तें बोल;
हो लब्धेप्सित, बापा ! प्रणतीं मच्चित सर्वदा लोल. ’     ७०
विप्र म्हणे, ‘ म्यां दोरक तोडुनि दहनांत टाकिला रोषें,
मज सोडुनि गेली श्री, स्वजनांची प्रीतिही, तया दोषें.     ७१
त्या दोषाची शांति प्रभुवर्या ! सांग या, अवन तातें
सुजडाचेंहि करावें, उद्धरि ती कां गया अवनतातें ? ’     ७२
त्यासि अनंत म्हणे, ‘ जरि आम्हांसि, म्हणसि, ‘ उपाय हाच वदा, ’
तरि तूं करीं अनंतव्रत भक्तिकरूनि अब्द बा !  चवदा.     ७३
भोगिसिल संपदेतें, पुनरपि प्रेमें श्रीनारदादि संततितें,
नृप वर्णितिल, तसेचि प्रेमें श्रीनारदादि संत, तितें.     ७४
भोगूनि भोग पुष्कळ, माझी स्मृति पावसील तूं अंतीं,
परमगतिप्रति वरिसिल, मागावी मज भजोनि जी संतीं.     ७५


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP