( गीतिवृत्त )
श्रीकंठा ! जगदीशा ! सकरूण तूं देवदेव, मैराळा !
त्वां प्रणतपापपर्वत केला, लीलेंकरून, कै राळा. १
प्रभुवर तूं परमपुरुष वरदेश्वर दीनबंधु खंडोबा,
तुझिया कृपाकटाक्षें हा दु:सह मोहपाश खंडो बा ! २
रुचली गंगा गौरी तसि तुज भक्तप्रिया धणगरीण,
‘ मालूखान ’ हि म्हणता लावितसे तुजकडे भणग रीण. ३
‘ उधळिन भंडार ’ म्हणे तुज ‘ भाकर-भरित ’ जो ‘निवेदीन, ’
होउनि सफ़ळमनोरथ तो करुणासागरा ! निवे दीन. ४
जळपत्रमात्र वाहो, तुज भोळा भक्त फ़ार आवडतो,
ऐसा न अभाविक जो गंगेची वाहणार कावड तो. ५
तोहि तुज प्रभुसि रुचे जड, वरितो रीति जो कुतरियाची,
भक्त तव प्रीतिसुतरि मागे, नच तदितरा कुतरि याची. ६
‘ मालो मालो ’ म्हणतो, भाविक मागोनि भीक जो खातो,
सद्रतिपात्राचि होतो, भक्तासीं उतरतोचि जोखा तो. ७
जी मुरळी स्त्री, पुरुषाहि जो भजनाचा धरुनि पथ वाघ्या,
शंभो ! म्हणसि तयां, ‘घ्या वैभव, कैलासवास अथवा घ्या. ’ ८
कांचनपुष्पांजळिनें जें देसी उधळितां हरिद्रा तें,
परमोदार सदय तूं धन्य करिसि सेवका दरिद्रातें. ९
मार्तंड भैरव असें मल्लारि असेसं जया मुखीं नाम,
शंभो ! दंभोलिधर प्रार्थुनि दे त्यासि आपुलें धाम. १०
सधन अभक्त न बरवे, खंडेराया ! बरे अधन वाघे,
नामें तव भक्त तरे, पर नित्य विकत बळें वध नवा घे. ११
घेती पितर प्रेमें, रंक करी म्हाळ साव राजा या,
तेंवि मयूरकृत स्तव योग्य मनीं म्हाळसावरा जाया. १२