मुक्तचि करि, शंभो ! जो नाचे, वाजवुनि गल्लवाद्या, या.
मग काय स्तवित्यातें जड मोक्ष तवांघ्रिपल्लवा द्याया ? ५१
जीवांचें कर्म तुझ्या दृष्टिपुढें प्रभुवरा ! कसें उरतें ?
झुरतें चिंतेनें बहु; मस्तक बडवूनि, ताडितें उत तें. ५२
काशींत मुक्ति देसी, हें यश सर्वांसि तडक हटकीतें.
जड भजति अविद्येतें. प्रभु तूं त्या मानिसी न बटकीतें. ५३
तव यश काशीमरणीं जीवाम्चें सर्व कर्म चट करितें.
अस्त्र तुझें, तेज हरुनि, पाडितसे जेंवि दैत्यकटक रितें. ५४
देवा ! वेदादि वदति, ‘ निजभक्ति प्रेमयुक्त नव दे; हा
न वदे ‘ हा ’ भक्त कधीं; पावे भजनार्थ मुक्त नव देहा. ५५
‘ प्रभुजी ! व्हाया पूर्णं स्वपथीं, जड, करुनि युक्ति, लाव रिते ’,
तुज तव कृपा न म्हणती, तरि कैसे जीव मुक्तिला वरिते ? ५६
तुज नत रुचे, प्रसूला जेंवि जरि न चरम तोक विनयज्ञ.
हें ज्या श्रुत, अविमुक्ताहूनि म्हणे परम तो कवि न यज्ञ. ५७
अज्ञान हरिसि, जेणें दु:खद जनि-मृत्यु हा उपद्रव, तें.
परदु:खें काशींत त्वन्मन, दहनें जसें तुप, द्रवतें. ५८
प्रतिभा देउनि, देवा ! त्वत्कीर्ति त्वत्प्रसाद वर्णवितो.
विद्यापति तूं तो, जो प्रणव स्वरसहित सर्व वर्ण वितो. ५९
म्हणसि जना, ‘ अविमुक्तीं, स्थिय निश्चय करुनि गाढ, वस, मान. ’
हें तव शासन न करी जो, तो नर सत्य गाढवसमान. ६०
‘ शिव ! शिव ! वद. कठिन नसे उच्चारा; हें सदैव हो शील; ’
गुरु म्हणति, ‘ पावुनि पदा उच्चा, राहें; सदैव होशील. ’ ६१
त्वन्नामीं सादर जो, तो मुक्ति, म्हणेल जरि नको, पावे.
षडरि सुदारूण, तरि तव नामाश्रित साधुवरि न कोपावे. ६२
तव नामहि उद्धरितें कुतुकें सर्वत्र सर्वदा सर्वा.
शर्वा ! देवा ! इतरा साधनसंपत्ति यापुढें खर्वा. ६३
लुब्धाचें जेंवि धनीं, तेंवि विटो हें तुझ्या न मन नामीं.
शंभो ! असें करीं कीं, जाणें श्रवणा दुज्या, न मनना मीं ६४
जेंवि सुवासें, सुरसें मधुपीतें हरुनि तामरस नेतें,
नेवू भुलवूनि तसें माझ्या, तव भव्य नाम, रसनेतें. ६५
दाता प्रभु तूं, कीं तव परम प्रिय भक्त विष्णु, मुक्तीचा.
जोंवरि सेवा, तोंवरि शतमखमुखलेख एकभुक्तीचा. ६६
न पहासि आशुतोषा ! दोषा. दोषाकरा वहासि शिरीं.
तव लीला सर्वजना, जेंवि रविद्युति सुखावहा शिशिरीं. ६७
सप्रेम गावया मज, तव सुखजनका यशा,कळावि कळा.
ज्यांत त्वच्चरित नसे, विरविति जन कायशा कळा-विकळा ? ६८
मन वश तव नामातें होय, विभो ! जेंवि हरि लगामातें.
तुजपासुनि पावाया तें संतचि भूमिवरिल गा ! मातें. ६९
दात्यातें अर्थिमुख, स्तवन करुनि, जेंवि शंकरा ! गातें,
तें अति धन्य, तुजपुढें गाय तसें जेण विशंक रागातें. ७०
दास तुजपुढें प्रेमें गाय; न समजोनि ताळ, आलापी.
तो अमृतातें, देवा ! स्तन्यातें जेंवि बाळ आला, पी. ७१
भक्तचि बहु आवडतो, तेंवि तुज न आवडे उमा रमणी.
तेही संश्रितरक्षक विद्यातेजोनिधी कुमारमणी. ७२
जो न त्वछरणागत, तो या लोकांत आपदा उकळी.
त्याला कां न नरकपथ, पदरीं बांधोनि पाप, दावु कळी ? ७३
नलगे नमनें घ्यावे, आठां अंगांत, करुनि आठ वण.
उद्धरिसी दीनांतें देवा ! करितां मनांत आठवण. ७४
हरिती संत तमातें. संतत मातें तदीय संगातें
दे देवा ! प्रिय करिती सत्संगति जें, करी न गंगा तें. ७५