सिंदूरासुर मग जग बहु, मर्यादेसि मानिना, गांजी;
त्यापासुनि होय जनां, गरुडापासूनि हानि नागां जी. १
पीडी म्हणे, ‘ मदर्थचि रचिले हे देव, विप्र, मत्तातें. ’
जाणों दुर्विधि अभय प्रभुकरवीं देववि प्रमत्तातें. २
तेव्हां सुरवर, मुनिवर, गेले बहुसंकटीं तया शरण,
सुखहेतु सेतु ज्याचे दुस्तरसंसारसागरीं चरण. ३
दर्शन दे प्रभु, करिता तोचि प्रणतीं तया- असी माया;
आली धांवत, घेउनि जगदवनास्तव दया असीमा या. ४
तो श्रीविनायक म्हणे ‘ सुरमुनि हो ! मी हरीन आधींतें,
जें आत्मदान देवूं केलें, देतों शिवेसि आधीं ते. ५
गौरीचा सुत होतों, तेथें वरिजेल म्यां गजाननाता,
व्यसनीं उपेक्षिलें पळमात्रहि नक्राकुळा गजा न नता. ’ ६
ऐसें सांगुनि, झाला गुप्त प्रभु, हर्षवूनियां जगती
नग तीर्थंरूप जीचा, परमसती होय गर्भिणी मग ती. ७
तों तों सुरांत उत्सव, जों जों होती सतीस डोहाळे,
जगदंबेचे एकानन कवि वर्णील काय सोहाळे ? ८
‘ रम्यवनीं क्रीडावें ’ हा सांगें प्रभुसि दोहद मनाचा,
तेव्हांचा वर्णावा किति उत्सव दासमोहदमनाचा ? ९
प्रभु पर्णळी वनांत क्रीडे येऊनियां शिवासहित;
कैलासनिवासाहुनि वाटे गौरीस तो निवास हित. १०
होता महेश, ज्याचें सदळिप्रिय राज्य अनघ राजीव,
त्याच्या आला, परिसुनि यश, निववायासि मन, घरा जीव. ११
विनयें सुरगुरुचरणीं सुचिर महेशें समर्पिला माथा,
परम प्रसन्न होउनि, त्यासि बृहस्पति म्हणे, ‘ धरानाथा ! - १२
पुण्यश्लोका ! बा ! हें त्वन्मस्तक विश्ववंद्य हो; राज्या !
होतिल आधीं प्राप्ता पूजा त्या यासि, फ़ार थोरा ज्या. १३
देइल मुक्ति महेश्वर तुज, जन्म घडेल एक आणीक;
न ज्ञान गर्भवासीं नाशेल, शिखींत जेंवि माणीक. ’ १४
मग नारदासि न नमी, भाविबळें तो महेश अवमानी;
कीं दैववश असावें परमांनींही, जसेंचि अवमांनीं. १५
देवर्षि म्हणे, ‘ लाविल, तुज पाहुनि, कोण बोल वेनातें ?
कीं त्याचें लाजविलें त्वां जें मत्तत्व, बोलवेना तें. १६
प्राप्त असो तुज गजशिर, कीं न, क्ष्त होय, तरि लवे गा ! तें.
हें द्याया, हा माझा शाप महोदार करिल वेगातें. १७
लोक ‘ गजासुर ’ ऐसें म्हणतिल तुज, परमभाग्यमत्तातें. ’
पावे महेशराजा या शापातें, सुरर्षिदत्तातें. १८
मग मरणानंतर, तो करिणीपासूनि जन्मला भूप,
वदनीं मात्र गजाचें, मानुष सर्वत्र अवयवीं, रूप. १९
ऐसा झाला होता तो त्याच वनांत फ़ार बळकट, कीं
देवांच्या, असुरांच्या, नव्हतें तद्भंगहेतु बळ, कटकीं. २०
तेथें तो द्विरदासुर, जातिस्म्र, निजमनांत युक्तीतें
योजुनि, आला श्रीहरहस्तें पावावयासि मुक्तीतें. २१
प्रमथगणांतें पळवी, रक्षित होते बळी निवासा जे;
तो त्याहि मंडपातें भंगी, ज्यामाजि ती शिवा साजे. २२
देवी प्रभुसि म्हणे, ‘ हो ! शीघ्र करा जीवितान्तदंड; पहा,
दारुण गजवदनासुर मोडितसे कीं समक्ष मंडप हा. ’ २३
सोडुनि समाधि, शर्वें सुरशत्रुप्रशमसद्यशोमूळें
केला प्रहार अंधकमथनकरें त्या गजासुरीं शूळें. २४
जेंवि नखें कमळ, तसें शूळें शिर शंभु जेधवां तोडी,
सोडी, ‘ नम: शिवाय ’ व्यक्त म्हणुनि, देह, करहि तो जोडी. २५
स्वकरें स्वभक्त वधिला, यास्तव चित्तांत फ़ार तळमळला,
तो भक्तवत्सल प्रभु जाणो जोडुनि अकीर्तिमळ मळला. २६
मुक्तिहि देउनि त्यातें, अनृणत्वास्त्व रदीय चर्मातें
शिव पांघुरे, शिरातें पूजी, द्याया श्रितांसि शर्मातें. २७