जेंवि तुझ्या, संतांच्या कथिता झाला कथा परा व्यास.
कीं हे स्वीयास जसे, दाखविती हितपथा पराव्यास. ७६
झाले होते व्याप्त त्रिदश, नर, महर्षिही विषादानें’;
ते शरणागतनाथा ! त्वां हर्षविले महाविषादानें. ७७
एकेंचि शरें केलें भस्म पुरत्रय तुवां अगाध बळें.
स्वयशें लज्जा दिघली विधुला, तुहिनालया अगा, धवळें. ७८
करिता झालासि विभो ! दृक्पातलवेंचि कामदाहातें.
विधिशिर हरिलें; हरिशिल मग अन्याच्या न कां मदा हातें ? ७९
म्हणसि भवा, ‘ मद्भक्ता न शिव; करीं नमन; ऐक फ़टकाळा ! ’
भीतो मोह तुज, जसा गरुडासि महाहि, नैकफ़ट, काळा. ८०
वेद वदति ज्यातें प्रभु, बसला बांधुनि करांत कांकण तो.
तज्ञ म्हणति, ‘ जीवनिकर तापुनियां भवगरांत कां कणतो ? ’ ८१
स्मरतां तव चरणांबुजरजचि, करुनि सेवकां कणव धूतें.
वरकड असो, न देइल काय मनुजदेव कांकण वधूतें ? ८२
प्राप्तभय महाकाळा ! बा ! तुजपासुनि न होय काळ कसा ?
तूं सार्वभौमसा, तो कर देता दास देशपाळकसा. ८३
देतोसि मोक्ष, नेवुनि मोहासि अहो ! दयानदा ! विलया.
त्वदितर ऐशां दीनां जीवांसि महोदया न दाविल या. ८४
स्वांत:पात्यखिलांच्या जीचें सुसमर्थ तोय उद्धारा,
सुरसिंधु अधोधारा, शंभो ! त्वत्कीर्ति होय उद्धारा. ८५
दीनांसि तव पदांबुजयुग, करितां नवस, दावि काशीतें.
दुर्लभ जें सुख, देतो त्वन्महिमा नव सदा विकाशी तें. ८६
नियति तव मतासि, जशा श्वशुराच्या कुलवती सुना टपती.
प्रेमें समसंगोपन करिसी तूं ईश्वरा ! जुनाट पती. ८७
नेती दूर तृणादिक; दिळहि टिकायास बळ न दे वात्या.
तेंवि तव स्मृति उडवी जें दुष्कृत, करुनि चळन देवा ! त्या. ८८
देवा ! तूं शंकर हित, पंकरहित जीव निजयशें करिसी.
हरिसी भ्रम; श्रम क्रम न पहासी; दीन पोटोशीं धरिसी. ८९
त्वद्यश म्हणतें, " प्राण्या ! प्रभु रक्षितसे नता मुलावाणी;
म्हण ‘ शिव शिव ’ कर जोडुनि, सोडुनि भय; काय रे ! तुला वाणी ? " ९०
विश्वशरण्या ! करुणें तव दृक्पातें शरण्य शिबि केला.
त्वत्स्मृतिला तापत्रय सुखलंघ्य, जसें अरण्य शिबिकेला. ९१
प्रणतीं उमा प्रसन्ना, अन्नाछादन नता जना अर्पी.
अर्पी ज्ञान तव दया, त्यांत भजन पयसीं जसें सर्पी. ९२
श्रुति म्हणती, ‘ उद्धरितो प्रभु, काशीतें, त्यजूनि आळस, या. ’
भर्गाख्या ! जीव दशा न सहाति कदापि, जेंवि आल सया. ९३
काशींत दीनबंधो ! केलासि सदा अधीन दीनांहीं.
अमृतेछूसि तव पुरी न म्हणे, जैशी कधीं नदी, ‘ नाहीं. ’ ९४
बा ! त्वत्प्रणाम निवटी मोहातें, जेंवि कृष्ण कंसातें.
कळिकाळ तव यशातें कर जोडी, जेंवि काक हंसातें. ९५
मंदा मंदार रुचे, नच दे सुरपूज्यहि नग मोक्षमहा.
चिंतामणि म्हणति जया, प्रभुजी ! कोणासहि न गमो क्षमा हा. ९६
अन्यवदान्ययश शिवा ! लाजुनि बसलें धरुनि कोणातें.
कोणातें विश्राम न दे, न रुचे सत्कवींत कोणा तें. ९७
विश्वेशा ! तूं साक्षी; कर्म शुभाशुभ तुला सकळ कळतें.
तव मन, जेंवि पित्याचें दु:खित देखुनि मुलास, कळकळतें. ९८
प्रभु तूं प्रसन्न दीनत्राणाची कां न जाणसी सोय ?
जो बहु आंबा पिकतो, कां बा पिकतोषकर न तो होय ? ९९
झाला सुतृप्त वरदा ! देवा ! पावोनि तुज अगाधाला,
ऐसा सुर कोण ? तया सेवुनि कल्पाभिधा अगा धाला. १००
चिंतामणिकल्पद्रुमसुरभीसांबिध्य ज्या, सुरसदा त्या
करिसि यशें तृप्त; भजति तुज कवि, चातक जसे सुरसदात्या. १०१
त्वत्कीतींत बुडावें अपमानुनि शंकरा ! सुधासरसी.
कीं तूंचि पुढें, द्याया मुक्ति जडाही, जसी बुधा, सरसी. १०२
स्वर्गीं न सत्यलोकीं, प्राणी काशींत मात्र सुखवासी.
या वासार्थ तुजपुढें अमरसहित हरि विरंचि मुख वासी. १०३
जी विषयसमृद्धि जना देतो स्वर्गस्थ उत्तमाग, तितें,
त्वत्पादछायश्रित पावे, होवूनि, उत्तमा गतितें. १०४
त्वद्यशचि सेव्य, न तसें प्राज्यहि मिळतां सुधासरोवर तें.
जें म्हणतें, ‘ अमृत लघु, न राहो ’ तुळित्या बुधा ‘ सरो वरतें. ’ १०५
त्वन्नाम म्हणे; ‘ सुजतें वपु, तुज व्हावें कशास ? जें कुजतें;
बहु कर्म ज्यांत रुजतें, जीवा ! मद्धारका ! नसो तुज तें. ’ १०६
खळसंबंध त्यागुनि, भजली जें पद, भजे तदेव, सती.
त्वत्पादपद्म ऐशा निष्ठेवांचुनि मना न दे वसती. १०७
नाम महादेव तुझें, हें तुजचि प्रभुवरा ! सदा साजे.
ते काय ? न करितां छळ, अर्थहि देती कधीं न दासा जे. १०८
‘ त्वांहि छळ केला ’ हें साधु पुराणज्ञ वृद्ध वदतात.
परि तूं देसी दासा, सत्पुत्रा जेंवि आत्मपद तात. १०९
भावें भक्तमयूरें स्तवबिल्व समर्पिला तुला; सेवा
घे वात्सल्यें मानुनि सकृपा विश्वेश्वरा ! महादेवा ! ११०