स्वमुखें सिंदूर वदे, बैसुनि सिंहासनीं, स्वमहिम्यातें,
शोत्यां अप्रिय जें, कां वर्णावें पावुनि श्रमहि म्यां तें ? १
ऐकाल आदरें जरि, झाली जी तेधवा गगनवाणी,
तुमच्या सुखासि कांहीं, सुश्रोते हो ! जगीं मग न वाणी. २
‘ सिंदूरा ! स्वयशाचें स्वमुखें वर्णन सुमंद रचितो रे !
न वदे, करूनि दावी, अतिशुरसप्रद सुमंदरचि तोरे. ३
श्रुतिकटु गर्जसि, मूढा ! पापा ! तूं जंबुकांत जंबुकसा,
होईल पांचजन्यासम मत पाखंडपाणिकंबु कसा ? ४
वमनें श्वाना, मूढा रुचति तव वचें तसीं आसारेंच,
ऐक, कुबुद्धे ! जेणें बहुतांचा उतरिला असा रेंच; ५
नेलें लयासि, कामक्रोधादिक जे, यशांहि उदरीतें
आलें गौरीच्या, तव उतराया रेंच, तेज उदरीं तें. ’ ६
सिंदूर म्हणे, ‘ वदतें जें ऐसें वदन शत्रुचें कटु, तें
छेदुनि, भरा रजांनीं; वर्णू मज योग्य सत्कियापटुतें. ’ ७
केले प्रदीप्त डोळे, लोपाचवे ज्यांसमोर आवे शें;
तो खळ उदोनि आला त्या श्रीगौरीकडेचि आवेशें. ८
शिरळा जगदंबेच्या उदरीं तो कामरूप मायावी ,
त्या अतिरुक्षा द्याया न कविमनीं कां मरूपमा यावी ? ९
करुनि गर्भमस्तककर्तक नर्तन करीत, नोर पळे,
खळकर्म गरळहुगुरु, कीं ज्याच्या श्रवणेंहि हृदय होरपळे. १०
‘ धन्य ’ म्हणेल प्रभुला, कापुनि दे दावादक्ष मासा जो,
‘ शिरनेउं दे ’ म्हणे तो, अत्यद्भुत मानद क्षमा साजो. ११
शिबिरि म्हणे, ‘ हर्ष यशीं पाहें छिन्नी न कष्ट मीं मासीं, ’
प्रअभु मग काय वदावा ? हें झाले कर्म अष्टमीं मासीं. १२
विंध्याचळसि गेला खळ, जेथें नर्मदा नदी नांदे,
टाकी तें शिर तींत, स्मृतिहि जिची शर्मदान दीनां दे. १३
शिर ज्यांत टाकिलें हो ! म्हणतात ‘ गणेशकुंड ’ जनता तें,
त्यापासुनि करितातचि कृतकृत्य गणेश कुंडज नतातें. १४
नाहीं किमपि समजलें जौसें तें कायकर्म बळदेवा,
प्रभुसामर्थ्यें याही, सस्त्रीका हेंहि कर्मबळ देवा. १५
दोहद पुरवुनि, नेउनि पुनरपि जगदंबिकेसि, कैलासीं,
राहे शिव धर्मकथा कथित सनकनारदात्रिपैलांसी. १६
सुदिनीं शिवा तयातें, दीप करायासि अछवि, प्रसवे,
ज्याच्या पदीं वसाया लाविति चित्तासि अछ विप्र सवे. १७
त्या श्रीविनायकातें पूर्वीं जैसें, तसेंचि ती पाहे,
राहे चित्र तसी क्षण, प्रमानंदासि ती सती लाहे. १८
सिंही, रक्तांबरधर, त्र्जोनिधि, सिद्धिबुद्धिहृत्कांत,
सायुध, दिव्य चतुर्भुज, परमरुचिर, सुचिर देखिला शांत. १९
प्रेमें करुंचि लागे, अंजलि बांधोनि, नवनव स्तुतितें,
न क्षण परि स्फ़ुतों दे तें अद्भुतदेह भवनवस्तु तितें. २०
तीतें म्हणे विनायक, ‘ हें रूप ‘ प्रत्ययार्थ दाखविलें;
कीं तेंचि म्हणुनि समजे, वस्तु प्रथमानुभूत चाखविलें. २१
आलों तुझिया, व्हाया सकळहि हतगर्व मदरि, पोटा, कीं
नामचि म्हणेल माजें ‘ हो सावध, सर्व मद रिपो ! टाकीं. ’ २२
पुत्रत्वें करिन तुझें शुश्रूषण मीं, सुखें सहा सति ! तें,
प्रथम तव सुयश, मग सुर पिवुत, सुधा जी, मुखें सहास तितें. २३
माज्या यशोमृतातें, सिंदूरज-तापसिंधु आटो, पी. ’
ऐसें वदुनि विनायक दाखविलें तें स्वरूप आटोपी. २४
देहावरि येउनि, जों शंकरमहिषी शिवा पुढें पाहे,
तों सुरुचिरतनु, अनुपम, अनलप्रभ, शिशु, शिरोरहित आहे. २५
विशिरस्कतोकदर्शनजन्य शिवाशोक काय बोलावा ?
राहे तदालिगंगानयनसरोजांतही न ओलावा. २६
मेळविले देव सकळ जाउनि विधिनें स्वयें अरिष्टांत,
आणुनि सभेंत अद्भुत तो बाळ स्थापिला वरिष्ठांत. २७
त्यासि बृहस्पतिन्बारदविधिविष्णुप्रभृति सर्व पाहून,
साहून शोक, करिती सुविचार, क्षण तटस्थ राहून. २८
‘ जरि परमपुरुष नसता, बहु, होउनि हा परासु, ताप वित्ता,
साजे शोकनगाची, देवीच्या या परा सुता, पविता. २९
हा ज्ञानरूप, सेविति विध्यासहिता स्वयें कळा यास. ’
ऐसें म्हणोनि, विनविति सुर, तत्वें देव तो कळायास. ३०
तो शिशुरूप विनायक भगवान् विशिराहि परम शुद्ध वदे,
निजतत्व कथुनि, सर्वब्रह्मादिसुरांसि विपुल उद्धव दे. ३१
गुरु त्यासि म्हणे, ‘ प्रकटीं शारदशशिशुद्धवदनराजीवा,
हो सुरजना, अम्रुतघन जेंवि दवीं उद्धवद नरा, जीवा. ’ ३२
देव म्हणे, ‘ मदनुग्रह जो, सर्व सुरांसि तो कवच नाकीं,
लावा महेशगजशिर, बहुमानी तात तोकवचना कीं. ३३
नारद म्हणे, ‘ प्रभो ! वद; अत्यद्भुत हा तुझा अमळ काय.
अस्मन्नयनाभाग्यें झालें एकचि शिर:कमळ काय ? ’ ३४
तो अद्भुत बाळ म्हणे, ‘ कथितों खळवृत्त सर्व, परिसा हो !
म्यां साहिलें, सुदु:सह तरि, तुमचें मन तसेंचि परि साहो. ३५
अष्टम मासीं नेलें सिंदूरें, शिर करूनि खंडन हो !
गुरुदत्तवरगजासुरशिर आताम या तनूसि मंडन हो. ’ ३६
सुरमुनि म्हणे, ‘ गजासुरशिर सुरशिल्पें प्रभो ! कसें जडतें ?
तुज सुकर विश्वघटका, बहु पटुकोटींस कर्म जें जड, तें. ’ ३७
गजमुख दिसे विनायक या मुनिवचनाचियाचि अचसानीं,
करि परिपूर्ण मनोरथ, जे न फ़ळावेचि कोटिनवसानीं. ३८
तो आपणासि आपण तेजें देवांसही अलंकारी,
किंबहुना होय, यशें धवळुनि अमृतांशुला, कलंकारी. ३९
मुकुट, पदक, हार, कटक, नूपुर, केयूर, मुद्रिका ल्याला,
त्या दर्शना अतिरसा झड घालिति देव, जेंवि काल्याला. ४०
आलिंगी पुत्रातें प्रेमें श्रीशंभुची उमा रमणी,
श्रीकंठें, वैकुंठें, कंठीं आलिंगिला कुमारमणी. ४१
जयजयकार सुरांचे, झाले ध्वनि बहु सहस्त्रवाद्यांचे,
नतिनुतिकोटींचे करि देव स्वीकार अर्ध्यपाद्यांचे. ४२
गंधर्व गात होते, अवलंबुनि मधुर सुस्वर गतीतें,
पशुहि, अकर्णहि मोहो, हें यश दे भक्तसुस्वरग तीतें. ४३
नृत्य विलोकुनि, व्हाया जगदंबेचें सहर्ष तोक, थवे
स्वर्वेश्यांचे बहुशत नाचत होते; न हर्ष तो कथवे ४४
भाद्रपदचतुर्थींत श्रीगजवदनावतार हा झाला,
या भाळचंद्र म्हणती; कीं दे निजभाळचंद्र शिव याला. ४५