( गीतिवृत्त )
श्रीतुलसि ! त्वद्दर्शन दिव्य दिगंतासि दुष्कृतें दवडी.
हरिदयिते ! कीर्ति तुझे मुक्ता, सुरवल्लिची जशी कवडी. १
स्पर्श तुझा प्राण्यातें देतो परमेश्वरप्रिये ! शुचिता.
रुचि ताप शीतरुचिची हरि; तव उपमेसि परि नव्हे उचिता. २
प्रणति तुला केली, ती भगवति ! होती सुधा सरोगातें.
‘ जें अज्ञान क्लेशद ’ म्हणतीस जडा बुधा ‘ सरो गा ! तें ’. ३
श्रीसखि ! तुज घालावें, व्हाया तव दयित बाळ, तोयातें.
अमरहि जयास भीती, भीतो ऐसाहि काळ तो यातें. ४
वृंदावन करुनि, तुला देवि ! तुळसि ! अंगणांत जो लावी,
बोलावी, त्याची गति कैसी ? ती मुक्तिसींच तोलावी. ५
तुलसि ! श्रीकृष्णाच्या चरणावरि भक्त जो तुला वाहे,
लाहे तो मोक्ष, असा त्वन्महिमा अतुळ वर्णिला आहे. ६
श्रीतुलसि ! देवि ! लावी जो जन त अव मूळमृत्तिका भाळीं,
प्रेम तुझें त्यावरि बहु, मातेचें सर्वदा जसें बाळीं. ७
श्रीविष्णुशंभुनामीं अद्भुत सामर्थ्य; तें तुझ्या पर्णीं;
श्रीतुलसि ! मुक्त होतो प्राणी, जें स्पर्शिंतां मुखीं कर्णीं. ८
श्रीहरिचा सत्कार श्रीसुरसे ! तुजविना घडेनाच;
सति ! अतिकुशळाचाही जेंवि, सुवाद्याविना, अडे नाच. ९
सुरसे ! सुरसेव्यगुणे ! धरितां त्वत्काष्ठनिर्मिता माळा,
बाळा साधुत्व वरी, त्याचा त्यजि वचक नच कधीं काळा. १०
तुलसि ! तव नमस्कारें ज्यांचें सरजस्क होय भाळ, तसे
पाहुनि, वराप्सरा त्या किति ? मुक्ति चतुर्विधाहि भाळतसे. ११
श्रीरमणासीं तुजसीं जो जन सप्रेम लावितो लग्न,
तूं मुक्तिसीं तयासीं लाविसि; करिसी महामुखीं मग्न. १२
अमितब्रह्मांडाश्रय भगवान् तुजजवळि सर्वदा साचा.
तुझिया प्रदक्षिणेनें तुलसि ! समुद्धार सर्वदासाचा. १३
भजुनि तुला नर जोडी जैसें, तैसेंच मोक्षपद नारी.
होताति सुप्रसन्न त्वद्भजनें श्रीमुकुंदमदनारी. १४
तुजवरि उष्णीं करितां गळती, तींतून तोय जों गळतें,
तों गळतें षड्रिपुबळ, जें संचित सर्व कर्म ओंगळ तें. १५
सुरसे ! घडिभरि लावुनि, होउं न देतां लहान, दीपातें,
न कधीं भ्रमति, श्रमति, प्रानी संसृतिमहानदीपातें. १६
जे जन करिति तुजपुढें प्रेमें, लावुनि सदा दिवे, गानें,
नृत्यें करिति, तयांतें उद्धरविति नारदादि वेगानें. १७
झाडुनि, सारवुनि, सुखें घालाव्या तुजसमीप रांगोळ्या.
जातो भवही; खातो जन मग भगवति ! उग्याचि कां गोळ्या ? १८
जपतां हरिनाम, न तव माळेचे कष्ट देति मणि कांहीं.
अणिकांहीं सिद्धि न हे; न धनें, जें कार्य अमृतकणिकांहीं. १९
धरिती महासभाग्य त्वन्मणिकृत भव्य कुंडलें कानीं.
तत्पितर म्हणति, ‘ केलें विजित मुखें अमृतकुंड लेंकानीं. ’ २०
बुध भजिति तव मणींच्या, मोत्यांच्या जपति बाळ कंठीतें.
ईतें धरित्याचें जें कुळ, वैकुंठींच काळ कंठी तें. २१
तुलसि ! त्वन्मणिरचिता जी भूषा, तीच हरिजना उक्ता.
युक्त्का आख्या लोकीं सत्त्यक्ता, म्हणुनि म्हणति कवि मुक्ता. २२
जैसी रुद्राक्षांची माळा कथिली अनंतफ़ळदात्री.
तैसीच तव मणींची जपती, बाळास जेंवि बहु धात्री. २३
सर्वार्थपूरकत्वें तूं भगवति ! विष्णुमूर्तिसीं तुळसी.
लक्ष्मीसखि ! अखिलसतीसाधुनुते ! पूतपूजने ! तुळसी ! २४
कवि म्हणति, ‘ सुरभि वत्सा बहुसुरसा, भक्तवत्स भाखर गा !
बहुमत नारदमुनिसा, हा हरिस हराहि सत्सभाखरगा. ’ २५
यश गायिलें जरि तुझें मज - ऐशाही जडें असुस्वर, तें
अमृतचि गणिलें श्रीशें, कीं, त्या तुज मानिलें असु स्वरतें. २६
निजगुणगान भलतसें रुचतें, न म्हणेचि देव ‘ सुखर गा. ’
करितो प्रसाद, दीनें प्रार्थुनि म्हणतांचि ‘ दे वसु स्वरगा ! ’ २७
श्रीतुलसि ! तुझें रुचलें. प्रभुचें तैसेंचि, सज्जना शील.
मग मम भवभय कां तव चक्षु न, होऊनि सज्ज, नाशील ? २८
तूं तसिच, अर्पिली हे तुलसि ! तव स्तुतिहि, नमुनि, हरिचरणीं.
या रामसुतमयूरा तारा, लावूनि सतत परिचरणीं. २९