श्रीनामदेव, तुकया, तदभंग प्रभुसि गोड घांस तसे;
गहिंवरतसे परिसतां, नाचतसे पांडुरंग, हांसतसे. ३१
भक्तकवीरप्रमुखप्रिय परम तदुक्ति सुरस दानरता
म्हणतो प्रभु ‘ या प्याया, मागति मज तरिच सुर सदा नरता ’. ३२
शरणागतभयहर्ता, भक्तजनातें क्षणक्षणीं स्मर्ता
सफ़ळमनोरथकर्ता सदय प्रभुवर्य रुक्मिणीभर्ता. ३३
भक्तवश त्यक्तप्रभुभाव नव्ह पांडुरंग देव कसा ?
बारा वर्षें वसला एकोबाच्या गृहांत सेवकसा. ३४
नामें चोखामेळा जो प्रभुभक्ति प्रिया महारा ज्या
श्रीविठ्ठल बहु मानी त्या, जेंवि युधिष्ठिरा महाराजा. ३५
बाळाच्या सर्कारें माता अतिवत्सळा जसी हर्षे,
भक्तांच्या पूजेनें प्रभु आनंदाश्रु हा तसा वर्षे. ३६
श्रुतसेव, विदुर, अर्जुन, उद्धव, अक्रूर हे जसे भक्त,
व्यक्त प्रभुसि तसेचि प्रिय यवनहि, दास जे पदीं सक्त. ३७
आवडि कळतां, एकोपंताचें रूप घेउनि, स्वामी
हा चोखामेळ्याच्या आपण जावूनि जेवला धामीं. ३८
साधुमुखें आयकिलें हें, कीं जो भक्त सांवता माळी,
त्या लागे खुरपाया, हा भक्ता शिशुसि तातसा पाळी. ३९
जो अर्पिला, मुखांतुनि काढुनि, तो या सुधासम ग्रास
याहुनि शबरी न बरी कां भासावी बुधां समग्रांस ? ४०
विठ्ठल भक्तीं जैसा तैसा वित्तीं न लोल, कीनाश-
मातेचीही पावे, याची न कधीं अलोलकी नाशे. ४१
जो भक्त पडों देइल त्याचा हा तात कासया विसर ?
त्या बहु करुणा जैसी निववाया चातकास यावि सर. ४२
पुत्रमिषें नारायण म्हणतां, पावे अजामिळाला हो !
परम प्रसाद सहसा, जैसा त्याही गजा मिळाला हो ! ४३
कैसें तरिही ज्याच्या वदनीं निजनाम भव्यपद येतें
विठ्ठल म्हणतो, ‘ योग्यचि हा, यावरि कां करीन न दयेतें ? ’ ४४
तुळसीच्या माळेनें विठ्ठल होतो प्रसन्न, पिष्टातें
देतो भलत्यालाही, जें द्यावें नारदादिशिष्टातें. ४५
झाले धन्य पहातां प्रासादाच्या दुरूनिही शिखरा;
‘ विखरा यांगरि पुष्पें सुर हो ! ’ म्हणतो, दयाब्धि हाचि खरा. ४६
साहे प्रभु, वागवितां अर्जुनवाजी, महाकसाल्याला;
सुयशोभूषा, दासां देउनि ताजीम, हा कसा ल्याला. ४७
बहु मानितसे गातां सुरमुनितें, तेंवि हरि लहानातें
बुध दीनबंधु म्हणती, तें लटिकें काय करिल हा नातें ? ४८
भक्तकथेंत प्रभुची जी ती वर्णीन काय निष्ठा मी ?
वदला, ‘ देवर्षेsहं भक्ता गायन्ति तत्र तिष्ठामि. ’ ४९
दासें समर्पिलें जें, भक्तिरसें, पत्र फ़ळ तोय,
या पुंडरीकवरदा तें परमप्रीतिकर सदा होय. ५०
वदला सुदामदेवा, ‘ लागति बा ! फ़ार गोड मज पोहे. ’
वहिनीच्या नामातें मद्रसना कां सदैव न जपो हे ? ५१
खाय न खीर खळाची, प्रभु विदुराच्याहि जेविलाचि कण्या
आवडतिच्या सुपार्या होती दगड्या - जुन्या, नव्या - चिकण्या. ५२
भक्ताचा अभिमानी करितो दीनाहि मानवा स्तव्य
प्रभुचें भोळ्या भक्तीं, इतरीं चतुरीं, तसें न वास्तव्य. ५३
जो शैव वैष्णवारी; ज्ञाता वैष्णव तसाचि शैवारी;
त्याहुनि इतरां सर्वां भक्तांचा पांडुरंग कैवारी. ५४
न म्हणेचि रुक्मिणीचा पति अधिक, उणे, जुने, नवे दास;
भक्तांसि तसेंचि, जसें तिळहि पडों दे उणें न वेदास. ५५
‘ बा ! पाव पांडुरंगा ! ’ म्हणतां सहसा म्हणोनि ‘ ओ ’ पावे
प्रभु वर देतो जैसे तातें अर्थ द्रवोनि ओपावे. ५६
जो प्राणी ‘ हरि विठ्ठल, हरि हरि विठ्ठल, ’ असे वदे, वदवी,
त्याला प्रभु दाखवितो, जी आत्मप्राप्तिची बरी पदवी. ५७
बहु आपणासि भक्त प्रिय, हें सर्वा जनांसि उमगाया,
शंभु वसविला स्वशिरीं, स्वप्राप्त्यर्थ स्वकीर्ति-धुम गाया. ५८
धांवुनि भक्तांचें भय हरितो, देतोचि हाक हाकेला;
प्रभु, भक्षुनि पत्र, म्हणे, ‘ द्रौपदि ! मुनि हटिक, पाक हा केला ’. ५९
दूर असो, दीन असो, दासाची विठ्ठलासि आठवण
नामचि पुरे, न घ्यावे अष्टांगीं, नमन करुनि, आठ वण. ६०