ऐसें भक्त मयूर प्रार्थी तुजला, दयाघना ! दत्ता !
नमनेंहि कोप न शमे, तरि हाणीं या शिरावरी लत्ता. ७६
व्यसनीं दीन तुलाचि प्रार्थिति, देवूनि हाक, दादास;
रक्षिसि, धावुनि आंगें, सदया, तैसाचि हा कदा दास ? ७७
शरणागत पितृसखजमदग्निकुलज राख विप्र, तापाला
पावे, बा ! वेगानें स्वजनीं जन दाखवि प्रतापाला. ७८
आंगीं असोनि अद्भुत सामर्थ्य, प्रेमही यशीं मोटें,
प्रभुजि ! जिरविले असता अमितप्रणतापराधही पोटें, ७९
किंच सकृन्निजनामोच्चारश्रवनें जळे महापंक,
सर्वहि अवगत असतां, कां हो ! सदया ! न उद्धरा रंक ? ८०
व्यसनीं नत रक्षावे, निस्तुळ सर्वज्ञनायका ! यश तें.
इतरां विभूषणांचीं, प्रभुचा शोभविति काय, काय शतें ? ८१
माते ! अनसूये ! सति ! तूं तरि पुत्रासि आपुल्या बोधीं.
बुडतों मज कर नेदी, जवळि असोनिहि, भवाब्धिच्या रोधीं. ८२
हा पंकजपत्रेक्षण अत्रे ! क्षण न भरतांचि तारील,
भवदाज्ञा लंघीना, दीनांचें व्यसन सर्व वारील. ८३
काय उणा करुणार्णव होइल ? मज एक अर्पितां बिंदु.
जग तर्पी अमृतरसें, धन्य जडप्रकृति सक्षयहि इंदु. ८४
पुत्रासि विश्वहित उपदेश करायासि तूं महाबिंदु.
सर्वस्वामृदानें पुनरपि वृद्धीस पावतो इंदु. ८५
अत्रिस्वामी ! काय स्वमुखें स्वसुतासि पढविलें युक्त ?
नमुनि विनवितों भावें, न करी अद्यापि कां मला मुक्त ? ८६
ऐका, हो ! संत ! तुम्ही, सदय कसा हो नतासि होगलिता ?
अजि सांवरा, गुरुची गुर्वी बिरुदावली न हो गलिता. ८७
नित्य परोपकृतिव्रत संत तुम्हीं, म्हणुनि एकदा भागा,
कांहींच न मागा, परि उपकृतिधर्मार्थ एह्वडें मागा. ८८
तुमचें वचनोल्लंघन न करील प्रभु, पहा बरें, हटका.
वागवितो भीड सदा, संशय आणूं नका मनीं लटका. ८९
वेंचिति परोपकारीं सर्वस्व, अनित्य जीवितहि, संत.
वचनाची काय कथा ? जोडिति सद्यश अनंत मतिमंत. ९०
पहिलें, तों आम्हां जड जीवांसि तुम्हांचि संतरायांचें
चरणस्मरण सदोषध, बुधसंमत, संपदंतरायांचें. ९१
मीं केवळ मूढचि, कीं देव तुम्हांहूनि वेगळा म्हणणें,
तें हें तैसें, जैसें कूपातें सुरसरित्तटीं खणणे. ९२
‘ न ह्यम्मयानि ’ हा ये श्लोक, परि जसा खरासि पाटीर,
काळाचीही कांपे, तुमची होतां उणी कृपा, टीर. ९३
तुमचा वरप्रसाद ब्रह्मा, हरि, शंभु; देव यापरता
सृष्टिस्थितिलयकर्ता नाहीं; श्रद्धेय हें न पापरता. ९४
सत्पदरजीं जसा जन, गांगींहि न होय पट तसा धुवट,
या भवसिंधूंत तुम्हीं प्रभुचे आधारभूत साधु वट. ९५
क्षीरधि संतसमाधिहि शेषरुचि प्रभुपदासमीप रमा
कसि वाखाणूं तुमची कीर्ति अहो ! बाप ! दास मीं परमा ? ९६
करुणेचें वतन तुम्हीं, शांतीचें भाग्यवंत माहेर,
सुघन ज्ञामरसाचे. संत रवे मधुर आंत बाहेर. ९७
स्मरभूतभूतवैद्य, स्पर्शमणी सर्वपापिलोहाचे,
ब्रह्मग्रह संत तुम्हीं प्रणतजनाच्या अनादिमोहाचे. ९८
सुरभिस्वर्द्रुमचिंतामणि शिष्यांचे दयानिधी पंत;
निजबिंब प्रतिबिंबा अमृतकराचें, खरे तुम्हीं संत. ९९
साधुगुणग्राहकता, भूतीं सर्वत्र सर्वदा समता,
गुरुरीति वसे संतांपासीं, हे उक्ति सर्वदासमता. १००
विमळ सकळ गुण तुमचे कां न सुधाधिक म्हणों ? निवे दास
ज्यांच्या श्रवणेंचि; असे अद्भुत, रुचले म्हणोनि वेदास. १०१
श्रीदत्तात्रेयातें, तत्तुल्यांतें समस्त संतांतें,
साष्टांग नमन आहे, सांभाळा जी ! मयूरपंतांतें. १०२