मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
श्रीभगवद्गीतास्तुति

श्रीभगवद्गीतास्तुति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीमद्भगवद्गीते ! वर्णावें आदरें तुला नमुनीं.
सर्वोपनिषत्सारे !  माते ! तुज पाहती तुला न मुनी.     १
तुज सोडुनि तरि तरते अन्याचे जीव जरि उपासक ते,
त्यजुनि अमृत, लंघाया मृतितें, सेवूनि जरि तुपा, सकते.     २
भगवद्गीते ! ज्ञात्या अधिका तुजहुनि सुधानदी नाहीं.
त्वद्भक्ता तापाहीं भय जेंवि बुधा न दीनाहीं.     ३
तुज भजत्या, संसारीं वसतां, गतिलाभ होय जो गीते !
त्यासि न पात्र भ्रमति, श्रमति, व्यर्थचि तपोनि, जोगी ते.     ४
सेवुनि सुधाहि, तापति कामक्रोधार्त सतत रोगी ते.
संसारीं प्राशुनि तुज, हा रामतनूज नत तरो गीते !      ५
जय मोहमहिषमर्दिनि ! जय भगवति ! गेयगुरुगुणे ! गीते !
जरि झाली नसतीस प्रकटा तूं, यतिहि बहु भवा भीते.     ६
तव सचिव द्वैपायनशंकरमधुसूदनादि योगी ते.
ज्ञानेश प्रतिनिधि हें वर्णन तुझिया मनास यो गीते !     ७
युवराज तुझा वामन वाम न मानू, तुवांचि मानावें.
गुरु लघु कविनीं प्रभुतें नित्य यथामति विशंक वानावें.     ८
भगवति ! शुचिकीर्ति तुझी सुमति ज्ञानेश्वरी प्रिया आली.
झाली विश्वख्याता, हे कार्या बहु जनाचिया आली.     ९
नेती तिकडे जासी भगवति ! बहुमत इचें तुला उक्त.
ज्ञानेश्वरीस जन जे अनुसरले, त्यांसि करिसि तूं मुक्त.     १०
श्रीमद्भगवद्गीते ! नियमें ज  करितसे तुझा पाठ,
तारिसि तया, तयाच्या घेवुनि कामादिशत्रुची पाठ.     ११
त्यातें मुक्ति वरि, तुझे गीते ! अध्याय पाठ अठरा ज्या.
लोकपति त्यजुनि जसी ती दमयंती, करूनि हठ, राज्या.     १२
एकचि अध्याय पुरे, किंबहुना श्लोक एक, हा नियम.
गीते ! त्वदाश्रितजनीं तिळहि करिल न बहुमानहानि यम.     १३
पटु, अघ हरुनि, जलधिचे असुर मथुनि, शंभुचे सुदार; पण
हृतभवभीते ! गीते ! अत्यंताद्भुत तुझें उदारपण.     १४
साधनसंपत्तिपरा झाल्या तुज नम्रकंधरा आर्या.
भावें समर्पिल्या या तव चरणीं नमुनि पंधरा आर्या.     १५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP