मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
श्रीहनुमन्नुति

श्रीहनुमन्नुति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( अनुष्टुभ् वृत्त )

श्रीमज्जगत्प्राणपुत्रा ! आंजना ! भवनाशना !
श्रीच्या शोघें लाविला त्वां कंजनाभ वनाशना.     १
स्मरेषु द्याया रामोरीं संतापा परमा रुते.
न सौमित्रि तदुद्धारीं, तूं शक्रपर मारुते !     २
रामसुग्रीवसख्याचा हेतु तू वातनंदना !
उत्पत्तिभू गुणगणा जसा मलय चंदना.     ३
केली प्रहृष्टा, लंघूनी तुवां नदनदीपती,
मोही रक्ष:पतंगातें जीचा वदनदीप ती.     ४
जी त्वद्वळपरीक्षार्थ देवांनीं प्रेरिली जरी,
नागांची माय सुरसा अंतराय पथीं करी,     ५
तोंड शंभर गावें ती पसरुनि म्हणे तुतें,
‘ गिळीन; मन्मुखीं भूतें होति ब्रह्मवरें हुतें. ’     ६
देह अंगुष्ठसा केला त्वां, जो नवति योजन,
गेलास तन्मुखीं वांछी जी करायासि भोजन.     ७
सुरसेच्या मुखांतूनि तूं निघालासि सत्वर.
माघारा उसळे चेंडू जैसा सोडूनि चत्वर.     ८
सुरसेतें बोलिलासि, ‘ दाक्षायणि ! नमोsस्तुते. ’
तूं साधु निरहंकार बा ! गर्वें सर्वही उते.     ९
धाता विस्मित झाला, न मैनाकशिकरीशची
शुक-शक्र-स्तवीं, नोहे मैना कशि खरी शची ?     १०
दोरी धरूनि ओढावी नभ:स्था जेंवि वावडी,
तसी कवळुनी छाया, ओढी जी फ़ार वावडी.     ११
ती सिंहिका तुझी बापा ! सहसा सावली धरी.
करी आकर्षण तुझें, धैर्य वृत्रारिचें हरी.      १२
त्या सिंहिकेच्या उदरीं जेव्हां गेलासि घांससा,
भासलासि प्रेक्षित्यातें व्याघ्री ती, तूं न कां ससा ?     १३
भूदेवधीहि पावे, न त्वद्ग्रासीं अंजना भया;
भीताचि व्यसना तोही विरही कंजनाभ या.     १४
‘ मग काळिज तोडावें म्यां, आधीं आंतडीं तमीं ’.
वदलासि, ‘ कारूं काय ? कार्याच्या तांतडींत मीं ’.     १५
लंकेंत शोधितां सीता; बा ! झालासि  लहानसा.
राक्षसांतें पाठवाया अंतकाच्या महानसा.     १६
भली लंकादेवता त्वां भंगिली. बा ! कदापि ती
न देती वाट. मारूनि नाकदा हाक दापिती.     १७
रावनांत:पुर तुला वन भी तव तात ज्या
श्री देखिली धुंडितां त्वां अशोकवन वातजा !     १८
वृक्षीं बैसोनि, कामांध आला रावण पाहिला.
तद्दुरुक्तें उसळला क्रोधाचा वेग साहिला.      १९
स्तवें विश्वास देवूनि श्रीमुद्रा मग अर्पिली.
कुशलोदंतपीयूषें देवी त्वां फ़ार तर्पिली.     २०
द्रुमहानि चमूहानि त्वत्कृता अक्षमा रणीं.
सुधाधिका सुरा झाली सत्कृता अक्षमारणीं.      २१
ब्रह्मास्त्राचा रक्षिला त्वां बहुमान. पराभव
सभेंत रक्षोराज्याचा केला, हृष्ट बरा भव.     २२
बा ! मानूनि तुझें तुछ पुछ पेटविलें खळें.
‘जळें ’ म्हणे तें लंकेतें, प्रेरितां त्वां महाबळें.     २३
आंजनेया ! गमे व्योमीं वदले देव, ‘ धूर हा
पूरे. न राम प्रणतीं बदले, दे वधू, रहा ! ’     २४
खूण सांगोनि जेव्हां त्वां श्रीचूडामणि अर्पिला,
प्रभु आनंदला जैसा पीयूषें तप्त तर्पिला.     २५
प्रभ्य दे तुज आश्लेष - पारितोषिक तो भलें.
शोभलें यश हें विश्वीं, सर्व सन्मन लोभलें.     २६
अंगदें लक्ष्मण स्कंधीं, तुवां श्रीराम वाहिला.
पाहिला तार्क्ष्य देवाहीं साधि सव्रीड राहिला.     २७
केला बिभीषण भ्राता श्रीरामें तव सन्मतें.
कीं ज्ञानशक्तिसंपन्न विचारें यश जन्मतें,     २८
महौषधिनगाचें त्वां दोनदा शृंग आणिलें,
जे बळी विक्रमी त्यांच्या मदाचें मूळ खाणिलें.     २९
तें तें बा ! त्वां कर्म केलें, जें जें अन्या सुदुष्कर.
तूं प्रिय प्रभुच्या चित्ता, मधुपा जेंवि पुष्कर.     ३०
तूं पूजिलासि भरतें नतें परम हर्षितें.
तुतें सत्कृत जें प्राप्त, न तें पर महर्षितें.     ३१
त्वां ‘ कथा तों असावें ’ हे वरिली परमा गती.
बा ! प्रेमभक्तिज्ञ न जे, ते मोक्षवर मागती.     ३२
तुतें श्रीराम ‘ ऋणिनो वयम् ’ ऐसें सुखें वदे.
तूं एक धन्य त्रिजगीं तातसाचि सुखेंव दे.      ३३
रत्नहार स्वयें श्रीनें प्रेमांभें भरला दिला.
तुला वाटे ‘ महोक्षचा तर्णकीं भर लादिला ’.     ३४
प्रभु दे भूषणें अंकीं स्थापूनि तुज आपलीं.
बा जाणों तीं भाविसाधुविरहें बहु तापलीं !       ३५

( गीतिवृत्त )

जेव्हां स्वपदा गेला, पुसुनि तुतें राम महिवरेश तदा,
बा ! परम भक्तवत्सळ हृदयस्थ तथापि गहिवरे शतदा.     ३६
प्रभुसि वहातां, करितो जें असतें पाप भस्म, दवना तें.
स्तव तुज समर्पिला हा, करु, ताप हरुनि, अस्मदवनातें.     ३७
जेथें प्रभुचें कीर्तन, तेथें तूं वससि हस्त जोडून,
मोडून मत मनाचें अन्य व्यवहार सर्व सोडून.     ३८
सुसमर्थ श्रीरामप्रभुचें तूं भक्तरत्न कीं नाम.
तुमचाचि भरवसा मज आहे, बहु सफ़ळ करितसां काम.     ३९
कर्माकडे न माझ्या, प्रभुभक्ता ! आपणाकडेचि पहा
न क्षुधितबाल-कर्णीं मातेचा शब्द बा ! पडे ‘ चिप ’ हा.     ४०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP