( गीतिवृत्त )
श्रीकरवीरनिवासिनि ! देवि ! महालक्ष्मि ! तूंचि सर्वाद्या;
तव चरण म्हणति, ‘ सुरतरुचिंतामणि हो ! निरोप गर्वा द्या. ’ १
भगवति ! जगदुत्पत्तिस्थितिसंहृतिहेतु तूं महालक्ष्मी;
त्वत्पदनखमणिरुचिनें चलन सुरांच्या न राहिलें पक्ष्मीं. २
आद्यसति ! महालक्ष्मि ! त्वत्पुण्यक्षेत्रराज करवीर.
परिभवुनि बळें दुर्विधि, कळि यांकरवीं सदैव करवी र. ३
जी दुर्लिपि भाळींची तव चरणरजेंचि होय सल्लिपि ती,
या तव यशोमृतातें जगदीश्वरि ! सुरभि कल्पवल्लि पिती. ४
विधि-हरि-हर तुज भजती, भक्तांतें फ़ार गौरवीतीस.
देवि ! महालक्ष्मि ! यश क्षीरधिकर्पूरगौर वीतीस. ५
‘ हा हा ’ अशा करि, धरुनि बहु धाक, रवी रवासि; नुजनमाना-
चुकतां, जपतां, सुखविसि बहुधा करवीरवासिनि ! जनमना. ६
अघ सारिसि, भय वारिसि, नत तारिसि, तूंचि जननि ! जगदाद्या.
जे नेणति वैद्यांतें, म्हणति ‘ अगद ’ तेचि जन ‘ निजगदा द्या. ’ ७
भक्त महालक्ष्मि ! तुझा सुपदीं पोषूनि धर्म-नय नांदे,
विष्णु तसा देवाच्या देवींच्या विपुल शर्म नयनां दे. ८
कोण तुज महालक्ष्मि ! स्तविना ? कवि नारदादि यश गाती,
ब्रह्मसभा, विष्णुसभा, शंभुसभा, त्वत्सुभक्तिवशगा ती. ९
मार्कंडेय मुनि करी देवि ! तव रहस्यतत्ववर्णन तें.
प्राशन केलें भुक्तिद, मुक्तिद, सदमृत भरूनि कर्ण नतें. १०
हे जननि ! महालक्ष्मि ! स्तवन तव न ये, तथापि हें कांहीं
केलें, कीं रसनेंद्रिय-हृदयें करितात फ़ार हेंका हीं. ११
या रामसुतमयूरा वर दे; परदेवते ! करीं मुक्त;
प्रणत सकळ तारावा होय महालक्ष्मि ! हें तुला युक्त. १२