सर्वत्र व्याप तुझा, आळस करिसी न घेवदेवातें.
धनदीं जें काय असे भांडवल तुझेंचि देवदेवा ! तें. ३६
तुज किमपि अर्पितो जो वेंकोबा ! तो न जरि तुला धुंडी,
होय अनंतगुणें त्या परलोकीं सिद्ध दर्शनी हुंडी. ३७
श्रीकांता ! बैरागी जो हत्तीराम, तो तुवां महित
स्वसमचि केला, अक्षक्रीडाहि करूनियां तयासहित. ३८
जो लंघित बहुयोजन भोजन शेषाख्यपर्वता पावे,
तरतो नर तो, न रतो अन्यत्र, तदन्य सर्व तापावे. ३९
करितो यात्राचि तुझी जो जन, बा धातया ! उपरतो न;
पाहे भाग्यचि, लाहे भोजन, बाधा तयाउपर तो न. ४०
लक्ष्मीकांता ! क्षांता, शांता, दांता जना जसी मुक्ती,
यात्राकरा तसीच स्पष्टा सत्या तुझीच हे उक्ती. ४१
वदलासि, ‘ न मे भक्त: प्रनश्यति ’ असें स्वयेंचि तूं देवा !
तारिसि दीनासि; तुझी देताहे भुक्ति-मुक्ति ही सेवा. ४२
करिसी तूं पापक्षय; बा ! पक्षयशस्कर त्वदन्य नसे;
भुक्तिहि मुक्तिहि देसी; त्या तुज विसरतिल सुज्ञ भक्त कसे ? ४३
त्वद्भक्त शूर आढ्याहि, अतिदाता तो कविहि, तया त्रास
कल्पांत न दे देवा ! मानिसि तूं तोक विहितयात्रास. ४४
करुणा तुझी मुकुंदा ! जेंवि सकामीं तसीच निष्कामीं;
त्वच्चरणभुक्तमाल्याचि मिरविन हर्षें, तसा न निष्का मीं. ४५
श्रीचरणरेणु देवा ! दे, वात्सल्येंकरूनि अर्चीन;
चर्चीन खललाटीं; यापरि अघभस्म अरिल अर्ची न. ४६
दे मज मनोहरांतिल कण; संरक्षिल भवार्णवीं कण तो,
अम्रुतलव खल्प म्हणुनि, वदन न वासील काय जो कणतो ? ४७
त्वद्भक्ताच्या भक्तें कीं देवुनि भेटि तरि मला जावें,
म्यां पूजनाद्यशक्तें नमन करायासि परि न लाजावें. ४८
तव उत्सव अनुभविला, भक्तें, करुणा करूनि, सांगावा.
आंगा वायु तयाचा लागावा; म्यां न तोहि कां गावा ? ४९
श्रीरमणा ! वेंकोबा ! करुणावरुणालया ! नता पावें.
म्यां दीनें संसारीं जन्मुनि, पावुनि भया न तापावें. ५०
स्पर्शमणि जडहि देवा ! स्पर्शुनि करितो सुवर्ण लोहाचें.
मग चिन्मय गुरू तूं कां भस्म न करिसील दासमोहाचें ? ५१
देवा ! वेंकटराया ! वारावी त्वां दुरत्यया माया !
बा ! माया दीनावरि सांग कराया स्वयें स्वनामा या. ५२
हे दरवरचक्रगदापद्मधरा ! शक्रनील ! घननीला !
मननीं लाव मज; गमे प्राणाधिक जडहि बाळ जननीला. ५३
सुत होवुनि उद्धरिला; मानी जो खळ न वेन वेदास.
नामें अजामिळहि; कीं तुज आवडती नवे नवे दास. ५४
जीव अविद्यामोहित, न पहासी यांत सदय तूं दोष,
उद्धरिसि; स्वल्पहि गुण घेवुनि, देसी प्रभूत्तमा ! तोष. ५५
गुणलवही पर्वतसा मानिसि, अपराधपर्वतहि लवसा,
लक्षाचें कार्य करिसि, मानूनि शताचियाहि बहु नवसा. ५६
उद्धरिले, उद्धरिसी, उद्धरिशिल दीन; तूं दयालु बरा,
स्तवितो, हा दास; तुजचि पाहे सर्वत्र; म्हण न या लुबरा. ५७
ज्या दीनोद्धारकथा गात असे सर्वकाळ सत्सद या,
इछिल काय पराची तृप्त्यर्थी कामधेनुवत्स दया ? ५८
शरणागतरक्षण हें व्रतचि तुझें, भक्तसुरनगा ! तिमया !
तुज तेंवि विश्वकर्म्या, कीं कुशल म्हणोनि कवि न गाति मया. ५९
आलासि दीन रक्षित, म्हणुनचि तुज दीनबंधु वदतात.
देतोसि आपुलें तूं भक्ता, पुत्रासि जेंवि पद तात. ६०
लाविति तुजहूनि इतर ते उद्धारा न हात पाप्याला.
परि बहु पुण्य यश मिळे देवा ! ज्या शुक महातपा प्याला. ६१
देवा ! रमानिवासा ! गडबडती ते न, जे सविश्वास
गानें, पानें, मानें, त्वद्यश तारील कां न विश्वास ? ६२
अभिधान शुक्रासि तुझें पढवुनियां, मोक्ष पिंगळा लाहे.
दुरितानळौषधाचे गिरि किति तव नामविंगळाला हे ? ६३
बा ! तूं शरण्य़, शरणागत मीं; तूं दीनबंधु, मीं दीन.
तूं माय बाप, देवा ! मीं जड शिशु समुचितक्रियाहीन. ६४
भवपूरीं रक्ष मला, अक्षम लागावयास तीरा मीं
उद्धरितां, पुण्य यश स्थापी बा ! गावया सती रामीं. ६५
पापच्छेदक म्हणुनि; ख्याता तव वेंकटेश हे आह्रा.
श्रीचरणांस म्हणावें कीं, भक्तांस प्रसन्न हूं या व्हा. ६६
‘ हा जन अयोग्य ’ ऐसें न म्हणावें त्वां अगा ! रमानिलया !
म्हणसिल मम, तरि, समुचित जो गुणगण, तो अगार मानिल या. ६७
जे तव भक्त ख्यात, त्वत्करुणेनेंचि धन्य ते लोकीं.
तोकीं श्रीशा ! प्रकटे, जो पितृपुण्यप्रसादगुण तो कीं. ६८
श्रीकांता ! भक्तधना ! जड, धिक्कृतिपात्र, पाप रासभ जो,
तो भुक्तिमुक्तिदा त्यजु तुज न, धरुनि बा ! त्रपा परास भजो. ६९
भ्रष्टा अजामिळ, गजवर पशु, बाळ ध्रुवहि, पिंगळा गणिका,
हें किति ? शिळेसि तारी श्रीशा ! तव पादधूळिची कणिका. ७०
घन जेंवि मयूराचें, देवुनि तूं प्रेम सुरस दासाचें !
मन निवविसि लक्ष्मीशा ! यश गाती भूमिसुर सदा साचें. ७१
श्रीवेंकटेशचरणीं रामसुतें या समर्पिल्या आर्या;
कार्या प्रभुभक्तांच्या साधितिल, जशा धरेंदिरा भार्या. ७२