( गीतिवृत्त )
श्रीवैकुंठी देसी पितरां सह तूं गदाधरा ! वास
नमुनि, स्तवुनि, प्रेमें पूजुनि, हृदयीं सदा धरावास. १
व्हावें परम शुचि तुझ्या नामस्मरणें गदाधरा ! पतितें
त्यजुनि तुतें, न भजावें, देतांही निज पदा, धरापतितें. २
त्वां प्रभुनें वैकुंठचि केलें वसवूनि फ़ल्गुतीर सदा
तुज सिंधु हे जसी श्री; जी बोले बोल वल्गु, ती रसदा. ३
म्हणती गतताप-मुदित ऋणभारें सर्व मोडकळला हो.
प्रभुजी ! भवत्प्रसादें भवतरुचा संग-मोड कळला हो. ४
पाप्यासहि मुक्तिप्रद तूं, जेंवि गदाधरा ! पवित्रास
वा ! त्वत्प्रणाम देतो संसारगदा धरा पवित्रास. ५
आणुनि तुज भेटविती, तारिति जीवांस जे गयावळ, ते
त्वदूपचि हे नसते, तरि करुनि कसे नतीं दया वळते ? ६
प्रह्रादा तेंवि दिला त्वां यांला कीर्तिसाज वरदानें
बहुतांसि देत आले हे सद्रतिचींच आजवर दानें. ७
देवा ! गदाधरा ! त्वां प्रभु केले बंधमुक्ति ओपाया
सर्वांस म्हणति जन, ‘ हो याचि पथें सुगति, हाचि सोपा, या ’. ८
केले स्वसमचि वरदा ! देवा ! त्वां विप्र हे गयावासी
यांतें बद्धकर - सकळमुख, यांची व्हावया दया, वासी. ९
छळिला बळि, लागे हा शब्द दहांचा प्रभो ! तुलाहि तसा
बहुधा गयावळाही; हितही न गमे, पिता मुला हितसा. १०
देवा ! गदाधरा ! तूं स्वविभूतिद्विजसमाज हा वळिव
मळिव न यश ; करुणास्पद निज भक्त मयूर, हेंचि या कळिव. ११
पाव गदाधरदेवा ! नांव तुझें मम मुखीं सदा राहो.
भाव तव पदींच वसो, नाव भवाब्धींत तूं सदारा हो. १२
वाहे विपत्प्रवाहीं, त्या आप्तहि भुज न दे, वदे ‘ वाहें ’
तैसा न दीनबंधो ! तूं गाती सुजन देवदेवा ! हें. १३
प्रभुचीं नामें, चिन्हें, सप्रेम मुखें वदा, धरा देहें
यश गा वशगा होइल मुक्ति कवि म्हणति गदाधरा ! दे हें. १४
पळही गदाधरा ! तुज ऋणभाराकुळ न लक्षवे दास
आढळलें त्वद्यशसें यश न त्रिजगीं वलक्ष वेदास. १५
नमुनि गदाधरदेवा ! हे वाणी वाहिली तुझ्या चरणीं
दुसरी न घडे सेवा दे वात्सल्यें मना रुचि स्मरणीं. १६
उडवी, पितरांचें जें ऋण, तें तृण तेंवि. पूर्वी काम
हे श्रीगदाधारस्तुति. ऋणतृणवात्या असें इचें नाम. १७