पांडुरंगा ! पार्थसूता ! वत्सला ! देवकीसुता !
करिती प्रिय बाहूनी, आलिंगूं देसि बाहुंनीं. ३१
ब्रह्मांडभांड न पुरे तुझ्या सदगुणसागरा.
पुरेल काय मोजाया पर माप रमावरा ? ३२
न तूं म्हणसि, ‘ जीवांचें किती मी चांगलें करूं ? ’
माताहि विटती धूतां, जें भरी आंग लेंकरूं. ३३
भक्तगेहीं जरि स्वर्द्रु रुजला, तुजला तरी
स्मरेल काय, त्या त्याची परवा वर वा परी ? ३४
त्वद्भक्ताच्या, दुर्लभा जी मुक्ति, ये चत्वरास ती.
जसी प्रिया स्वप्रियाच्या भजना सत्वरा सती. ३५
तुझ्या नामजपें प्राणी निवतो शिवतोखदें.
आरोग्य जेंवि पीयूषें, न तसें होय ओखदें. ३६
सेविली सर्वदा ज्यांही त्वत्कीर्ति सुरसा धुनी,
मानिले बाळचि सुधासक्त ते सुर साधुंनीं. ३७
यथेष्ट भोळ्या भक्तांनीं विठ्ठला ! लुटिलास. हा -
तुझा स्वभाव म्हणतो, ‘ यातना कुटिला सहा. ’ ३८
अशुद्धरीतितेंही जी उद्धरी शुद्धरीतितें,
त्वत्कीर्ति भव्या, वारीना सुरभी सुरभीतितें. ३९
शुद्धि देवूनि मलिना परिसापारि साजवी.
शास्त्रज्ञाहि तव पदीं जडला जड लाजवी. ४०
सद्दास्यलोभा पाहोनि बहुक्षीणा, बळा, वया,
लागलासि जनीला तूं देवदेवा ! दळावया. ४१
लागलासि, जनीला तूं, न चोखामेळा महार-सा.
भुललासि प्रभो ! त्याच्या बहुप्रेममहारसा. ४२
बा ! माजी जीभ वर्णील दामाजीच्या यशा कसी ?
झालासि राबता त्याचा. संत गाती कथा असी. ४३
झालासि एकोबाचा तूं विश्वाब्जरवि चाकर.
लिहितां या यशा कैसा चालेल कविचा कर ? ४४
राबसी दासगेहीं तूं जसे सेवक राबती.
त्वत्कीर्तिच सुधा देवा ! जी सुधा, होय रान ती. ४५
विणिले त्वां, कबीराच्या मागीं बैसोनियां, पट;
भक्ताधीन असावें हे वा ! तुला लागली चट. ४६
प्राणी तरे यथाबुद्धि त्वत्कीर्ति-वदता रसें;
कीं तुझीं प्रणतीं प्रोद्यत्करुणें पदसारसें. ४७
म्हण मद्भक्तियोगें न तुकोबातें शिवेतर.
भवीं व्यसन मन्नमें चुको बा ! तें, शिवे तर. ४८
प्राकृताहि म्हणे येत्ये येतां वत्स दया सये !
निववाया पहातांचि म्हणो सत्सद यास ये. ४९
जे तुझे भक्त, दीनांचें करिती संत ते हित.
निववावे तप्त हेंचि तयांचें संततेहित. ५०
सदाश्रिताच्या न दिला वियोग भवना महें;
दार्द्र सच्चक्षु तुझें, कीं नाशी भव नाम हें. ५१
विठ्ठला ! करुणाक्रीडाभवना ! भवनाशना !
हृदयस्था ! प्रकट हो, मम षड्वैरिशासना. ५२
सर्व दीनजनीं देवा ! तुझी दृष्टी सुकोमळा;
धणी लावूनि न म्हणे, ‘ नसो वृष्टि, सुको मळा. ’ ५३
चकोर-पद्म तर्पाया निघे इंदु, निघे इन.
न म्हणे, ‘ स्वाश्रितत्यागें ’ कोणी ‘ निंदुनि घेइन. ’ ५४
प्यालासि, गोप रक्षया, दयासिंधो ! दवानळा.
पुण्यश्लोका ! त्वन्महत्त्व न ये धर्मा न वा नळा. ५५
केलें त्वां, क्षिप्र मारूनी सुसरा, करिपावन.
बा ! चरित्र असें कोण दुसरा करि पावन ? ५६
नामोच्चारें तशा त्वां त्या दिली मुक्ति अजामिळा;
वदतें यश, ‘ हे चित्तीं धरा युक्ति, अजा मिळा. ’ ५७
भक्तें ध्यावीं तव पदें, नलिनें अलिनें जसीं,
बा ! अंतर न पाडावें मलिनें कलिनें रसीं. ५८
आम्हां जडांवरि करीं विठ्ठला ! बा ! अनुग्रहा;
येवूं देवू मुखीं काळ न होवुनि अनुग्र ‘ हा. ’ ५९
वराकचि प्रभुवरा ! अघादि न वराकसा.
त्वत्प्रसादाविना होता मुक्तिचा नवरा कसा ? ६०
अनताहि तुवां मोक्ष दिला, द्यावा नता तसा.
साक्षात्तातचि तूं बापा ! पांडुरंगा ! न तातसा. ६१
तारीं जड. जडोद्धारापासूनि यश जन्मतें.
यशाहूनि त्रिभुवनीं नाहीं अधिक सन्मतें. ६२
हृष्ट केला तो यशें, जो ‘ दे ’ वदे वानर ‘ क्षण ’
सत्प्रेमाचें करिसि कां देवदेवा ! न रक्षण ? ६३
दीनावनें होय साधुवाद, या लोक लागती.
मातेसीं बाळ करितो बा ! दयालो ! कलागती. ६४
शुकसा मोरहि तुझें लागला यश गावया,
जाणोनि दुर्लभतरा या काळवशगा वया. ६५
यथामति तुला गावें याचि दे अमळा वरा.
नाशीं भक्तमयूराच्या शमळा कमळावरा ! ६६
तूं चंद्र, चंद्रिका कीर्ति, होय भक्त चकोर हा.
म्हणेल विठ्ठला ! कोण पुरे, प्राशूं नको, रहा ? ६७