ओम कारेश्वर देवा ! वरदप्रवरा ! तुला असो नमन.
त्वच्चरणातें सोडुनि, अंतीं माझें गृहीं वसो न मन. १
सदय त्रिलोचनेश्वर तूं देवा ! प्रार्थितों तुला भावें.
द्यावें काशींत मरण, दीनातें दीनबांधवा ! पावें. २
दे अभय महादेवा ! सेवावी सेवटीं सदा काशी.
राशि द्रव्याचा हित न करी तो, कायशांति जो नाशी. ३
दासांसि कृत्तिवासा ! ईश्वर तूं तारितोसि हें कळलें.
शुद्ध करिसि निजनामें मानस, जें विषयसेवनें मळलें. ४
रत्नेश्वरा ! तुज नमुनि, न मुनिजनाहूनि जड उणा होय.
तो यश पावे निरुपम, जो भावें वाहतो तुला तोय. ५
चंद्रेश्वरा ! नमुनि तुज, मी दीन प्रार्थितों, करीं श्रवण.
कामातें भस्म करीं, या पापें गांजिला नसेस कवण ? ६
मज संतप्त करावें श्रीकेदारेश्वरा ! न कोपानें.
घात पुन:पुनरपि या विषयविषरसाचिया नको पानें. ७
समजुनि धर्म अधर्म न केला; केला वदों कसें लटिकें ?
धर्मेश्वरा ! म्हणावें त्वां, ‘ मछरणागतीं भया ! न टिकें. ’ ८
या कामाद्यहितांतें देवा ! वीरेश्वरा ! दुजा निवटी
ऐसा कोण त्रिजगीं ? द्युमणिद्युति तम हरील कीं दिवटी ? ९
‘ व्हावें मुक्त ’ मम मनीं, द्यावें कामेश्वरा ! दयालो ! हें
साध्य सुवर्णत्व जया, प्रार्थावा स्पर्शमणि तया लोहें ? १०
प्रख्यात विश्वकर्मेश्वर ! तूं भगवान् करूनियां युक्ती.
मुक्ति प्रणता द्यावी. दीनाची नायकों न ये उक्ती ? ११
तूं गरुड भवा-सापा, सदया ! मणिकर्णिकेश्वरा ! बापा !
या पाव नता, पापा सारीं, वारीं अबोधजा पापा. १२
या दीनाचा पाहों बा ! अविमुक्तेश्वरा ! नको अंत.
संतप्ता निववावें, प्रेमें गावुत न वा यशा संत. १३
कर जोडुनि, तुज म्हणतो, ‘ श्रीमद्विश्वेश्वरा ! नमो ’ हा. या
शरणागता शकावी तव माया सर्वथा न मोहाया. १४
अमृतेश्वरा ! न म्हणतिल तव चरणा वेद कां महोदार ?
म्हणसि, ‘ स्वजनाचेंहि पूरितसर्वार्थिकाम हो दार. ’ १५
श्रीतारकेश्वरा ! मज पात्र करीं तारकोपदेशाला.
कीं काश्याख्या हे तव मायेतें फ़ार कोप दे शाला. १६
ज्ञानेश्वरा ! कराव शरणागत सर्व धन्य सुज्ञानें.
ज्याड्यांतुनि उद्धरिला त्वां, न असा जीव अन्य सुज्ञानें. १७
विश्वेश्वरासि माझें प्रार्थित वरुणेश्वरा ! स्वयें कळिव.
पळिव त्रास भवाचा, कामप्रमुखाहिताननें मळिव. १८
करुणावरुणागारा ! मोक्षद्वारेश्वरा ! तुवां सुघडें
केलें मोक्षद्वार, प्राणी तारावया सदा उघडें. १९
दे भक्ति, मुक्ति, अथवा स्वर्गद्वारेश्वरा ! नको स्वर्ग.
सुखलेश नसे नाकीं बा ! कीं तेथें वसे द्विषद्वर्ग. २०
भ्याला भहु हा दीन ब्राह्मण; बा ! म्हण, ‘ भिवों नको, वस रे ! ’
पसरे सुयश त्रिजनीं, जें बा ! ब्रह्मेश्वरा ! कधीं न सरे. २१
बा ! लांगलेश्वरा ! तूं करिता झालासि सूपकारातें.
वर्णिति तुज बहु, जैसे भक्षूनि सदन्न सूपकारातें. २२
वात्सल्य ऐकिलें जें, मजही दाखीव वृद्धकाळा ! तें.
जपतोसि जसा, ऐसा बा ! काय जपेल तात, बाळातें ? २३
नमितों तुज; या नमनें जें दुरित वृषेश्वरा ! न राहो तें.
अतिदुर्लभ कैवल्य प्राप्त तुला वंदितां, नरा होतें. २४
प्रणताच्या भवबंधा खंडी चंडीश्वरा ! तुझी दृष्टी
अमृतें संतर्पितसे भक्तजना, वासुरा जसी गृष्टी. २५
नमुनि तुज म्हणतसे जो जन ‘ जय जय नंदिकेश्वर ! स्वामी ! ’
त्यांतें स्थापिसि परम प्रेमें तूं नित्य आपुल्या धामीं. २६
आत्मा देसी त्या, जो वाहे तुज बा ! महेश्वरा ! बेल.
मग मोक्ष चतुर्विध कां त्याच्या सदनीं सदा न राबेल ? २७
तुज हृदयांतील तम ज्योतीरूपेश्वरा ! हरायास,
नमितां, घेतां नाम, स्मरतां, ध्यातां, नको परायास. २८
दे अभय दीनबंधो ! देवा ! शैलेश्वरा ! शिवा ! याला.
हा तप्त तव पदाब्जछायेतें वांछितो निवायाला. २९
श्रीसंगमेश्वरा ! तूं प्रिय भक्ता जेंवि अर्क राजीवा.
तव कीर्तिसुधा मिळतां, अन्या ती होय शर्करा जीवा. ३०
नमितां अमितां तारिसि बा ! तूं सलिलेश्वरा ! बुधाधारा !
भेटि भवार्तासि तुझी सुहिता, रुग्णा जशी सुधाधारा. ३१
हो मध्यमेश्वरा ! तूं या दुस्तरतर भवार्णवीं सेतु.
श्रीकाशींत वसाया आम्हांसि तव प्रसाद हा हेतु. ३२
दे काशीमरण, दुजा हिरण्यगर्भेश्वरा ! नकोच वर.
छत्रपरा निववाया तेंहि जरि शकेल, तरि शको चवर. ३३
" जाऊं ? " म्हणतां, वांचो पळ ईशानेश्वरा ! न हा काय.
म्हणवी, करितां पालन-लालन, हाल न करून, ‘ हा ’ काय ? ३४
साधुनि पशुहि अधिक पद बा ! गोप्रेक्षेश्वरा ! नराहुनि घे.
न निघो काशींतुनि हा सुरपंक्तींतुनि जसा न राहु निघे. ३५
वृषभध्वजेश्वरा ! म्यां नमुनि तुज दयानदा ! न कांपावें.
त्यां द्यावें अभयाचें, जो दीन तया न दान कां ? पावें. ३६
विद्याधनदेहाची मज उपशांतेश्वरा ! नसे शक्ती.
परि म्हणतों तारावें. नाहीं, माने तुला असी भक्ती. ३७
तव चरणीं अर्पावे प्राण ज्येष्ठेश्वरा ! उपायनसे
तारो तव प्रसादचि, दुसरा भवसागरीं उपाय नसे. ३८
वंदुनि भक्तसुरतरुस, ‘ न रुस, निवासेश्वरा ! शिवा ! समज. ’
ऐसें मी अपराधी तुज म्हणतों, ‘ दे पदीं निवास मज. ’ ३९
संसारीम सर्व चुके जड जीव, शुकेश्वरा ! परंतु सुके
न मुख, न सद्रतिस मुके;तुजसीं तुज वंदितां न कोण तुके ? ४०
कामवृक हृदयविवरीं शिरला व्याघ्रेश्वरा ! न राखावा.
हें उवित तुज वसाया; दुष्ट स्दा पुष्ट हा वरा खावा. ४१
क्षुद्रा चपळा माझ्या चित्तशशा जंबुकेश्वरा ! वंचीं.
तूंवि प्रसन्न हो; मज ठावीं प्रभुयोग्य भाषणें कंचीं ? ४२
भावें अशी द्विचत्वारिंशल्लिंगस्तवत्मिका यात्रा.
केली भक्तमयूरें; हे भवरोगांतकारिणी मात्रा. ४३