( गीतवृत्त )
श्रीकंठें जें द्यावें, देती करुणा करूनि तुळजा तें,
ईच्या भक्तजनाचें, शुचि होवुनि, सद्रतीस कुळ जातें. १
निजभक्तांसि म्हणावें जैसें ‘ मजसीं सुखें तुका ’ ईशें,
ऐसींच सुवरदानें देती सुस्मितमुखें तुकाई शें. २
मुनि म्हणति ‘ ब्रह्मांडप्रभवस्थितिनाशहेतुका ’ ईतें.
जें जननीवात्सल्य, व्रीडित करि तीच हे तुकाई तें. ३
मथिती झाली सुररिपुमहिषादि महोग्र किति भवानी, कीं
हेचि प्रतापले शें नुरवि अणुहि तेज दितिभवानीकीं. ४
विधिलिखित जें अमंगळ, ईच्या श्रीमत्पदांसि नमितां, तें
होय सुमंगळ, सत्य प्रत्यय आला जगांत अमितांतें. ५
हे जगदंबा म्हणती, ‘ भ्यालां जनहो ! भवांत का ? गा रे ! -
मद्गुण, अमृतरस; इतर वैद्य कशाला ? कशास आंगारे ? ६
रंका वासव करिसी लीलेनें, रंक वासवा, तुळजे !
सेव्य प्रसाद तव ते, रोगार्ता मानवास वातुळ जे. ७
स्मरतो तुज समयीं जो, सुमति कुमति विसरतोहि तुळजे ! , त्या -
भीरुसि म्हणसी, ‘ जेता हो समरीं; भीरुसींच तुळ जेत्या. ’ ८
तूं योग्या, शुभमतिदा, गतिदा, अति दासवत्सला; गाया
संकोचावा न, तुझ्या कांसेला भक्तवत्स लागया. ९
या लोकीं, परलोकीं, वांछिति नांदावया सुखें कुळ जे,
ते तुज भजती प्रेमें, जन्मुनि, सन्मुनिशतस्तुते ! तुळजे ! १०
तुज जगदंबे ! भगवति ! बुध ‘ रामवरप्रदा ’ असें म्हणती.
करितो यथामति स्तुति रामसुत मयूर विरचितप्रणती. ११