( गीतिवृत्त )
श्रीगजवदना ! देवा ! दे वात्सल्येंकरून दास्यवर,
त्वद्दासाचेंचि सदा होतें विद्वत्सभेंत आस्य वर. १
विघ्न निवारुनि, करिसी संपूर्ण मनोरथ स्वदासांचे,
तव कारुण्य नतीं, जळ जैसें निम्राकडे सदा सांचे. २
वा ! पावली अपर्णा भजुनि जशे देवकी, बरें तूतें,
त्वच्चरितें अमृतफ़ळें अतितृप्तिकरें वरें; परें पूतें. ३
धन्य करिसि सुज्ञानें, तव चरणीं वाहती असु ज्ञानी,
सामान्य मानिलासि प्रभुवर तूं सर्वथा असुज्ञांनीं. ४
कृतकृत्य जीव होतो दूर्वांकुर तव पदीं निवेदून,
मग सर्वस्व समर्पुनि भावें कां न प्रभो ! निवे दून ? ५
होसी तृप्त शिवेच्या तूं श्रुतिचा अति महा जनक थानीं,
झालासि शिशु गजवदन, वरिति तुझ्या गति महाजन कथांनीं. ६
भजन बळद सांगति तव वचन असें तत्व जाणते दशमी,
न शमीपत्र म्हणसि लघु ‘ होतों तेणेंचि पूजका वश मीं. ७
इटुनि प्रत्यूहातें, देसी पुरुषार्थसिद्दि नम्रातें
ती सोडी त्या न कधी देवा ! जशि कामुकी न कम्रातें. ८
जो करितो कार्याच्या, त्वत्पद हृदयीं धरूनि, आरंभा;
रंजवि सिद्धि तया, जशि फ़क्रा नाचुनि करूनि आ रंभा. ९
जरि गजवदन ! बृहदुदर, न दिससि तूं लोकनायक विपारा,
भवजलनिधिच्या जडसे पावति, चिंतूनि पाय, कवि पारा. १०
तव रूपें, पांडित्यें, व्रुयें गानें सदार शिव हर्षे
तुजवरि दिव्य सुमनिकर सस्त्रीक सुरर्षिसिद्धगण वर्षे. ११
तुझिया नृत्यें, गानें पावति गंधर्व अप्सरा लजा
किति हे ? श्रीविष्णु म्हणति, ‘ या अमृताब्धींत दृष्टी हो ! मज्जा ’. १२
अमितांडाश्रय अवयव तव नवल दिसति उगेचि आखुड वा !
सर्व म्हणति खर्व, तदपि सुगुणमणींचाचि होय आखु डबा. १३
देवा ! देवारि म्हणति, ‘ रुद्र, वृष जसा, तसाचि आखुप तो
नयनांत आमुच्या बहु कणसा पणसाधिता सदा खुपतो ’. १४
विदूत्सभेंत उत्तर देतो स्वप्नींहि होय न विकळ तो
गणनाथा ! भक्त तुझा होउनि लोकत्रयांत कवि कळतो. १५
गानकवित्वादि कळा, ज्यांत सुधेची तशीच चव दात्या !
देशी देवा ! विद्या सर्वा पुरुषार्थहेतु चवदा त्या. १६
मंगळमूर्ते ! करिती तुज पूजुनि मंगळक्रियारंभा,
त्यांच्या सिद्धि करितसे सुरनाथाच्या जशी प्रिया रंभा. १७
जे तापवूनि म्हणती सुदृढाही काळिजा ‘ उल ’ गडी ते
होती विघ्न स्मरतां तुज शतश: संकटें उलगडीते. १८
वदनांत नाम गवसो; संहरिता सर्व गद नसो पारा;
अमृतहि न लगे, तूंचि प्रिय देता आत्मसदन सोपारा. १९
वाहति गृहभर, न भजुनि तुज, जेंवि वृष व्रणार्त कंठळा
पावसि गेंचिणपांसह न म्हणवतां बाष्परुद्धकंठा ळा. (??) २०
तव चरणधूलिस, जशी स्वर्गींच्या गाइला सवे दानीं
‘ कवि-कवि ’ यापरि देवा ! गणनाथा ! गाइलास वेदांनीं. २१
स्तन्याद्यर्पुनि करिती न म्हणे प्रिय तोक हाय तें माय
न यशें त्रिजगीं पावुनि दिधलें त्यां भाग्य आयतें माय. २२
दूर्वा समर्पिल्या श्रीगणपतिला एकवीस आर्यांहीं;
ज्यां ऐकोनि म्हणावें, ‘ वा ! आशी घे ’ कवीस आर्यांहीं. २३