लक्ष्मण काय विचक्षण नव्हता सत्पात्रही प्रसादास ?
त्याहि दुराराध्य मुनी; मग आराधील हा कसा दास ? ५१
ज्यांज्यांवरि सेवेनें झाला मुनि सुप्रसन्न, ते धन्य
तरले सिंधु भुजांहीं, दैवें संप्रति नसे तसा अन्य. ५२
तुमचें होतें, त्याचें दुर्लभ कळिमाजि दर्शनचि आधीं,
त्यांत दुराराध्य, तसें उग्रत्व नसे हरी, मृगव्याधीं. ५३
श्रीमन्नारदबावा तेही कळिमाजि भेटती न जना,
कलहप्रिय म्हनति म्हणुनि भी मन, परि पाय योग्य ते भजना. ५४
न टिके मुहूर्तभरिहि क्वचित् कथांचिदपि, तत्पद भ्रमती.
दर्शन घडतें, तरि ते करितेचि दया गुरु अदभ्रमती. ५५
बाल्मीकिव्यासशुकप्रल्हादधृवमुखांसि तो तारी,
हरिभक्तिज्ञानरसें वोती जो शिष्यमूर्ति बोतारी. ५६
कांटाळे मायहि बहु, हरितां शिशुचाहि बाह्य मळ हातें,
बाह्यांतर नतमळ तो गुरुवर हरि, करि शिवार्थ कळहातें. ५७
वाल्मीकिचें दुरित किति होतें हो ! तें, तरी न धरि वीट,
स्वकरें हरि; हरिहुनि मुनिसिंग प्रणताघकरिवधीं धीट. ५८
या गुरुराजें अगणित जीव भवदवानळांत वांचविले,
सोडविले बहुत, जिहीं ममतापाशीं स्वकंठ कांचविले. ५९
भवकारागृहमुक्त प्राणी करितो, हठेंचि हरि ताप,
बाप प्रेम खरें तें, बद्धविमोक्षीं सुखेंचि वरि शाप. ६०
कोठेंहि आढळेना मुनि तो, भ्याला असेल या कळिला,
कीं अद्भुत सच्छिष्यप्रेमगणांहीं बळेंचि आकळिला ! ६१
भ्याला म्हणतों, त्वद्यश जरि कीं त्याच्या सदा मनीं नसतें,
भवभयहर भवदंघ्रिध्यानहि न विशुद्ध मानसीं ठसतें. ६२
काय नृसिंहोपासक कीं शरभमनुज्ञ भील वेताळा ?
जंभें उगारिल्या कीं वज्रकर स्वर्पती लवे ताळा ? ६३
यदनुग्रहें अनळविधु ज्या दु:सह, त्याहि अंधकारा ती
धाकेल चंडकररुचि ? किंवा कामासि अंधकाराति ? ६४
सद्वृत्तीस खळाच्या धाकें न कदापि साधु सोडील,
चोरभयास्तव लोभी जन कोण बरें धनें न जोडील ? ६५
धरिलें नसेचि चित्तीं कळिचें भय एकवल्ल भागवतें,
जिंकावें केंवि कधीं स्वाहेच्या प्राणवल्लभा गवतें ? ६६
तरि कां नुगवे भगवच्छुद्धयश:पुंडरीकसुहृदर्क ?
बहुधा दिधलें कळिला अभय, असा हा कसा बरा तर्क ? ६७
दुष्टजना शरणागत व्हावें, साधूंसि हें रुचेनाच;
दैचें रुचतां, न रुचे स्वगुण; रुचे सत्कथा, रुचे नाच. ६८
देते जरि भलत्याला भलतें, जें ज्यास अर्थजात रुचे,
तरि कां कवी न म्हणते कीं ‘ संत सखे समुद्रजा तरुचे ’. ६९
संत विवेकी, करिती पाहुनी अधिकार जी दया साजे;
ऐसे प्रसाद त्यांचे, देती अन्योन्य न प्रयासा जे. ७०
म्हणउनि अभय कळीला दिधलें म्हणतां नयेचि; तरि तो कां
सांप्रत कळींत न दिसे भगवान् मुनि अस्मदादिकां लोकां ? ७१
बहुधा असमद्दृष्टि सछ नसे अमित पातकीं मळली,
घूकेक्षणासि रविसा, मुनि न दिसे, तर्क मति असा फ़ळली. ७२
मति वाखाणी मानुनि सुंदर या तर्कबाळाला जे,
हांसे वाल्मीकिकथा, म्हणउनि ती विश्वपाळका ! लाजे. ७३
करुणा कराल, तरि बा ! तारालचि शुद्ध तर्क हा मात्र.
केले पुष्कळ पामर पापी प्राणी तुम्हीं कृपापात्र. ७४
पाहुनि मनिं रेखावे भवदंघ्रि दयानदा ! सदा पावा.
हा षड्रिपुंनीं, तुमच्या न धरूनि , भया, न दास दापावा. ७५