लावणी १५६ वी - पति नका जाऊं लष्करा राजअं...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
पति नका जाऊं लष्करा राजअंबिरा ॥धृ०॥
आज या रंगमहालीं बसा या शेजारीं । तुम्ही गुलाब मी शेवंती माझे अधिकारी । घ्या नव्या नवतीचा बहार, कोणाची चोरी ? । चाल । कां सोडून जातां मजला ? । या इष्कानें जीव झुरला । मी स्पष्ट सांगते तुजला । नका अंतर देऊं मजला । आज चला मंदिरीं, बसका दाविते न्यारा ॥१॥
घरीं काय कमी दौलतीसी प्राणविसाव्या ? । खुरबाण करीन जीव, भोगा कोमल काया । राव सोडा मनींची आढी, मी लागेन पाया । चाल । मी शरण कोणासी जाऊं ? । येकली महालीं कशी होऊं ? । मुखचुंबन कुणास देऊं ? । पति जातो, कुणीकडे पाहूं ? । या मंदिरीं, कुणी नाहीं जिवाचा प्यारा ॥२॥
या वतनदारीच्या पेश्यामधीं उमजावें । तुम्ही घरचे आदर (?) बराबर वचन द्यावें । मारिते गळ्यास मिठी, मला भोगावें । चाल । ही वेळ रुताची आली । होती शरीरामधीं काहली । झाली धुंद, मनीं घाबरली । राव बनसीनें पाहिली । कवटाळुनी धरितां हुषार जाला चेहरा ॥३॥
सिद्धनाथ शीघ्र कवीराज कवीश्वर ज्ञानी । नारिनें सजण राहविला कीं, जिवलग प्राणी । चाल । हरी महादु गुणी जन गाती । बाळ्या बहिर्या मनांत झुरती । धोंडयाची तडकली छाती । रघ्या राम्या बाठेल गाती । रामा म्हणे होन्या, दूर होय नकटया चोरा । पति नका जाऊं लष्करा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP