मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
आता कां गे दुरदुर पळसी ? ...

लावणी ४२ वी - आता कां गे दुरदुर पळसी ? ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


आता कां गे दुरदुर पळसी ? ।
आण वाहातों तुला, अलिकडे ये गे अंमळसी ।
दैव प्राधान्य उभयतांचें ।
म्हणुन भारजा रत्न लाभलिस तूं कुळवंताचें ।
आता भय काय लोकांताचें ? ।
नको लाजेनें मरूं, बोलणें काढ एकांताचें ।
पहा कौतुक भगवंताचें ।
तुझ्या सुखापुढें अधिक काय तें सुख श्रीमंताचें ।
असा जिव रिझला तुझवरि ग ।
टाकुं दे हात शरिरावरि ग ।
दिवस जाती वर्षापरि ग
सखे तुं होतां विटाळसी ॥१॥
कां गे मन तरी इतुकें भ्यालें ? ।
तुझ्या सुखाचे पाइ विरोधी जन अवघे झाले ।
येउं नये दैवासी आलें ।
होतां इश्वरी कृपा, काय मग दुष्टांचे चाले ? ।
सोंग कां तरी ऐसें केलें ? ।
शरिर मातिचें पहा, यामधें काय तुझें गेलें ? ।
वासना प्राणाच्या पुरुंदे
तुझे स्तन कुरवाळुन धरुं दे  
जिंवा आवडेल तसें करुं दे
व्यर्थ लाजेमुळें तरमळशी ॥२॥
धन्य मर्यादेचें पाणी ।
तुंसारखी पाहतां दिसेना स्त्री लाजिरवाणी ।
पाहतां मुख पवित्र वाणी ।
अधोवदन चालतां खालतीं नेत्राची पाहणी ।
बोलणें अति मंजुळवाणी ।
विषयकाळिं वाटशी सखे तुं अमच्याहून शहाणी ।
दिसे रुप, थेट जशी रंभा
शरिर जणुं कर्दळिचा गाभा
एकांतीं किति पडते शोभा !
स्वाभाविक आहेस मोठी आळशी ॥३॥
भोगितों तुजला दिसरातीं ।
लहान शरिर, नेमस्त बिजांकुर, असलाचे जाती ।
नाहिं मन चंचल कल्पांतीं ।
परपुरुषाचे विषयीं, जशी निर्मळ गंगा वाहाती ।
सगुण नवरत्नाची ज्योती ।
कोटयावधि काळज्या तुझें मुख पाहतां दुर होती ।
कल्पना नाहिं अजुन मेल्या
करुं नये त्याच क्रिया केल्या
म्हणुन या थरीं गोष्टि आल्या
दिलेल्या वचना कंटाळशी ॥४॥
मनामधें तूं अमची म्हणतों ।
सांगशिल जरि तरी जमिन या बोटानें खणतों ।
प्रत्यहीं भेटतां शिणतों ।
दुसरी स्त्री भोगितां तुझे गुण चित्तामधें आणितों ।
दिवस आयुष्याचे गणतों ।
कशि पुरशिल जन्मास, दिसोंदिस यासाठीं क्षिणतों ।
ज्या पाहतां मग होतों वेडे
सुधेपणिं कां गे अजुन न घडे ?
बोलणें मात्र तुझें सुगडे !
करुन मुख तिकडे कां वळसी ? ॥५॥
कां हो मग असें म्हणतां मला ? ।
ये म्हणतां क्षणिं सिद्ध उभी तुमच्या संकेताला ।
कोणत्या मी चुकले बेताला ? ।
ऊन भातासारखी नका दडपुं, पदरीं घाला ।
खेद का मजविषयीं आला ? ।
करिन देहाची शेज, येत जा नित येकांताला ।
येतां क्षणिं उठुन उभी राहतें
प्रीतिनें मुख तुमचें पाहते
शपथ सौभाग्याची वाहते
घ्या हो, देते उचलुन तुळशी ।
होनाजी बाळा म्हणे, व्यर्थ कां पुरुषाला छळसी ? ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP