मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
तूं नार बतीसलक्षणी सखे सा...

लावणी १४० वी - तूं नार बतीसलक्षणी सखे सा...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


तूं नार बतीसलक्षणी सखे साजणी राजअंगणीं राहिलीस उभी करुनी शृंगार । चित्रांतील पुतळी तशी दिसे सकुमार ॥धृ०॥

लावण्य रूप राजसे, तुजे गे नारी असे, रत्नदीप दिसे, जसा गे नारी रंगमहालीं आयना । सुंदर कांता तूं तशी राजीव नयना । नारी तुझे सुरतीचा डोल आहे बीनमोल, आम्हां सगें बोल, पाहाती तुजकडे सकळ सेना । मंजुळ शब्द बोलसी जसी मैना । तुला पाहून जाला येक महिना । येकांत घडों येइना । मन तुझें स्थीर राहिना । तुजसाठीं बांधिल्या पैना । गेली होउनी विद्ध नार मोहना । तूं तशी हेत मनीं धरून, प्रीत हे करून, उगिच भरिं भरून दिवस चाळवण्या लाविशील फार । रंग गेल्यावरी नाहीं कोणी फुकट पुसणार ॥१॥

शृंगार रोज नित नवा तूं करितेस जेव्हां दीसतेस तेव्हां जशी गे इंद्राची रंभा पुतळी । वर्णितां रूप वनिता राजसबाळी । द्वादश वरुषांचें वय, दिसत आहे सोय, नेणतपण होय, निपट कांचन काया कावळी । धरी धुंद गेंद जोबन उरस्थळीं । तटतटींत आंगीं कांचोळी । शृंगार की वेल्हाळी । भांग टिळा तेज झळाळी । बारिक कुंकवाची चिरी लाविलीस बरी कपाळीं । वरी नैनीं काजळ ल्याली सोगेदार । नाकामधीं नथ सरजाची, झुबके चार ॥२॥

बाळ्याबुगडया करुनि फुलवार, मोतीं सरोसर झुबदार तानवडे कानीं । मुखीं विडा रंगला, हंसू लाल वदनीं । त्या चितांकाचे तळवटी, ल्याली चिंचपेटी, शोभे हनुवटी दिसे गोमटी, जशी चंद्रापाशीं चांदणी । जौमाळ दुलड हार माणीकमणी । दंडी बाजुबंद हे दोनी । हातीं चुडा तरेदार कंकणी । नेसली शालु पैठणी । पदराचा झोक टाकुनी । चाल चाले जशी वीज गगनीं । वांक्या सांकळ्या आणि पैंजण वाजे रुणझुण । चाले ठमक्यानें राजअंबरी डोले गजभार । हणवट बिचव्यारी जोडव्यांचा झणकार ॥३॥

तुझें दिव्य रूप चांगलें दृष्टी पाहिलें, चित्त वेधलें, म्हणुनि हटकिलें आम्ही तुजसी । लाउनी प्रीत चाळवण्या कां करिसी ? । तूं खरें सांग साजणी मनापासुनी, प्रीत करुनी पदर धरुनी घरा नेसी । येकांतीं हेत मनींचा कधीं पुरवीसी ? । सुंदर म्हणे सजणासी । घ्या वचन दिलें तुम्हांसी । आजी यावें माझ्या मंदिरासी । मनीं इच्छा माझी ऐसी । जाला रंग भोग सजणासी । कवी संतलीग चातुर ब्रह्मअक्षरे दैवीं लिहिल्यावर नाहीं चुकणार । बाळु नारू म्हणे त्यानें तिचा घेतला रंगभार ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP