लावणी १७ वी - याहो याहो घरि, मला दिस पर...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
याहो याहो घरि, मला दिस पर्वतवत् जाती ।
जळो जळो हा चांडाळ विषय घडिघडि छळतो रातीं ॥धु०॥
कंठिच्या तायता, आयता स्नेह झाला
दु:ख वणवा पेटतां कृपारस जणुं पाऊस आला
दिलि पदराला गांठ प्रीतीची, नको विसरूं माला
उभी राहते सेविका अपलें शिर घेऊन हातीं ॥१॥
जन्मापुन अजवर जिवलगा तुझ्यापसीं निजलें
लावनु मधेचें बोट मला कां आडरानीं त्यजिले ?
दगडावर हिरकणी घाशितां देह तैसे झिजले
वाट पाहतां गजबजले, माझी धडधडते छाती ॥२॥
येकांतीं घाबरी होतसे, नित अठवण करितां
जिव धरिला म्या मुठींत, पाहतों नारायण वरता
चांदविण यामिनी तशापरि कांहो दुर धरितां ?
पळ पळ होते अधिरता, पांची प्राण जाउं पाहाती ॥३॥
चतुराला खूण येक असे, कांहीं चित्तामध्यें आणा
पायावरता स्वच्छ ठेविते हात, वाहते आणा
सुखदर्शनसंगमीं भोगिला मग मोतीदाणा
होनाजी बाळा म्हणे, गुणाच्या दुर गेल्या ख्याति ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP