मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
साडि सेसूंद्या, धीरा धरा ...

लावणी ११६ वी - साडि सेसूंद्या, धीरा धरा ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


साडि सेसूंद्या, धीरा धरा तुम्हि, नका घाबरे करूं
दाणादाण पांघुरणें किती फिरफिरून तरी आवरूं ? ॥धृ०॥
येकीकडे जाउन बसुन मी साडी नेसती बरी ।
लपत लपत येऊन, असडितां प्राणविसाव्या निरी ।
शोध करा बाहेर, कसा दंडक आहे घरोघरीं ।
सा चौ महिन्या कुठे नागवी करावी तुम्ही क्षणभरी ।
नित्य उठुन हें काय पाडितां रगत माझे उरीं ।
परदु:ख वाटे सितळ, नाहीं फळ विनवुन नाना परी ।
तुम्ही मतलबगर्जी गडी ।
कां बसून खा ना विडी ? ।
अमळ तरि उघडा कडी ।
घडिभर दुर असा, नका कवटाळुन मजला धरूं ।
प्रौढ अतां वय विसांत, सखया, अजून कां लेकरू ? ॥१॥
लाल कुसुंबी चोळि काल सक्रांतसणिं रे घातली ।
अंगासरशी आधिं तशामधिं मीच हातें बेतली ।
निघेल अंगातून कशी ? बाजुबंदात कुठें रे गुंतली ? ।
सकुमार देखणी रुपानें जणुं पातळ पुतळी ।
हिरवी मला शोभते म्हणुन शेलारि उंच घेतली ।
कंठि गळ्यांतिल बळानें धरितां पहा कुचास रुतली ।
किति येकेक सांगुं तरी ? ।
वाटते नवल अंतरीं ।
निजा तुम्हिच पलंगावरी ।
विनोदानें बोलते, दु:ख मानुन रागें नये भरूं ।
मजा येक वेळ, बिलगुं धावतां, वृथैव हे फिरफिरू ॥२॥
शेज फुलांची सर्व विखरली, परांच्या चुरल्या उशा ।
न्यहाल्या गिर्द्या जितके तिकडे, सांग दिसेना धुशा ।
अव्यवस्त पहा अपुण उभयतां, काय जहाली रे दशा ।
कुठें वळविला हात ? कुणापशि युक्ती शिकला अशा ? ।
मदें करून उन्मत्त, धुंद होऊन दाटला नशा ।
सोड अतां जिवलगा, जळो ही खोड तुझि रे अवदशा ।
मी नाजुक चापेकळी ।
भोगावी मिजाजीनं तळी ।
कां तिंदा पडशी गळीं ? ।
जिव तळमळि, किती नीट हातरुणं हांतरू ? ।
निजुन उभयतां छपरपलंगीं शाल वरून पांघरू ॥३॥
बसा स्वस्थ दुर, सख्या नेसुं द्या शेलारी पैठणी ।
नाहिं इची बरी दशा भिजली आधींच बारीक फणी ।
नाहिं शुद्ध राहिली, बोलले असेन खेखादी उणी ।
इथच्या इथें विसरून करावें शांतवन ये क्षणीं ।
जिथें प्रीत अति दाट तिथें होतच आहे नवेपणीं ।
दोन दिवस गेल्यावर सखया विषय करावा कुणी ? ।
गंगु हैबती कवि चतुर ।
म्हणे पुरुष कामातुर ।
करी स्त्रियेस दिलगीर ।
धीर निघेना ज्यास तो नर कृश होइल झुरूझुरू ।
महादु प्रभाकर म्हणे, अधिर परि स्त्री असे कल्पतरू ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP