पाक सुरत कामिना ही गजगामिना । बिलोरी जणुं ऐना लखलखी ।
तुला पाहतां जिव माझा सुखी ॥धृ०॥
सौम्य वदन, वय निटस, कंचुकी तटस, चालतां अटस पदर बांधणें ।
तुझ्या स्वरुपाचें पडे चांदणें ।
देउं उपमा कोणती ? नव्हेस नेणती, जाणतीस बत्तिस गुण शोधणें ! ।
कपाळीं तिळ हिरवा गोंदणें ।
हसत सदासर्वदा, सधन संपदा, धरुन अतिमर्यादा नांदणें ।
जरब नयनाची, विषय भेदणें ।
गोजर्या पोटर्या दुही मांडयांचा जवा
तोरडया शुभ्र जोडव्यास उजळा नवा
सर्वांगि नरम गोरे गाल, दुधाचा खवा
गोड शर्कराधुवा प्रीत आनवा, देखतां जेव्हां तेव्हां सारखी ॥१॥
अशि अबळा निर्मळा, कंठ कोकिळा, वाटोळा टिळा कुंकुम लाविशी ।
जशि नागिण तूं फोफावशी ।
कुरळ वेणिचे बाल, अंगावर शाल, लाल हलकडी नथ सरसावशी ।
उमर पहिली दिसते बेविशी ।
मदनबाण निर्वाण सतीचें वाण, ठेवितों प्राण गहाण तुजपशीं ।
भोगुं देशील कोणत्या दिशीं ?
सकुमार मनोरम फार सरस रूपडें
लागता जरा उन मुख होतें तांबडें
नको चालुं सखे अनवाणि, लागतील खडे
जन वेडेवाकडे, ज्याहाली तुजकडे दृष्ट लागेल गडे उघडे नखीं ॥२॥
तूं पुतळी बिनसुलाख, अगदीं निलाख, दिसे चाख झाक मनमोकळी ।
सडक पातळ जाइची कळी ।
हिरकणी साधि, मुदि घालि कधिंमधिं, गळ्यामध्यें गोपाची साखळी ।
गुलाबी फूल सुगंध पाकळी ।
ज्ञान कळा चतुरशी पाहिली तुशी, विलासी जशि राधा गोकुळीं ।
जन्म जाहला सुमायेचे कुळीं ।
सौंदर्यनिधी मद कामोद्भव भोगिना
सुरसभास्थळींची केवळ दिव्यांगना
लावितां पडोसा लाखामधें लागेना
महासात्विक वासना, कोणा सोसेना मधुर रस नारी भाषण मुखीं ॥३॥
मान्य करी लवकरी, समज अंतरीं, किति तरी परोपरी पढवितों ।
तुला आवडले तसे घडवितों ।
जातों मरुन तुजवरुन, नको जाउं दुरुन, धरुन कर वाटेमधें अडवितों ।
तुझें पाईं तप सारें बुडवितों ।
घरिं येऊन, लाडें घेउन, एकांतीं नेउन, लावुन कडी खोलीमधें दडवितों ।
हवा तितका पैसा उडवितो ।
हे पूर्व दत्त फळ पुण्याचें कंदणें
दैवानसार ही नार हातीं लागणें
आहे चंद्रदिवाकार तोंवर सुख भोगणें
होनाजी बाळा म्हणे, रहा भलेपणें, जिणें तुजविण नको आणखी ।
बर्या अपल्या जाहल्या ओळखी ॥४॥