मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
चल दुर हो पलिकडे सुकाळे ज...

लावणी ९ वी - चल दुर हो पलिकडे सुकाळे ज...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


चल दुर हो पलिकडे सुकाळे जन झव कीं तू देहा दिसा ।
गेला भर नवतीचा, यापुढें काय आतां राहिल्या पिसा ? ॥धृ०॥
उतार जाहलें वय, माघारें न ये फिरून जें जें घडलें ।
वाइट झालें तोंड, अतां गडे गालाला पोचे पडले ।
पोटर्‍यांची नळकांडी जहाली, मांडयांचे गोळे झडले ।
भोगावी यापुढें अमंगळ असें तरि कोणाचें अडलें ? ।
कोठुनि पैदा झालें न कळे हें स्वरूप कोणीकडलें ।
द्रव्य खर्चिणें नको, तुझ्याकडे त्या पुरुषाचे मन जडलें ।
येत्या जात्यापाशि घरोघरिं मागत जा पैसा पैसा ॥१॥
थाट करूनि शिंदळीचा फिरसी लोकांचे दारोदारीं ।
कंबर काळी सुकट, पुसेना फुकट कोणि पैश्यावेरी ।
तेलकटीच्या मळ्या अंगावर, उवालिखा माशा वारी ।
भिक मागत जा स्वच्छ मुखानें, म्हणे मल्हारीची वारी ।
सांधोसांधीं डाग चकदळीं, मुख दुर्गंधीची मोरी ।
खवट खोबरें, कच्ची चिकटी डोईला घाशी बेरी ।
नाहिं भीड मुर्वत मर्यादा, धिपट दांडगी औदसा ॥२॥
आपण कायाहीन असून चांगल्या नारीचा आणसी ठेवा ।
एक लुगडें एक चोळी मिळेना, दुसर्‍याचा करिशी हेवा ।
रोज हिंडशी गल्लोगल्लीं रस्त्यानें यावा जावा ।
सवंग मेवा गुळ दमडीचा भलत्यानें घ्यावा खावा ।
अनभ्यस्त पाहून एकादा गरिब बिचारा बुडवावा ।
कोणि तुला भेटतां खपाव्या, मग म्हणशी देवा ! देवा ! ।
न भोगुं देशीं फुकट, कशाला उगाच म्हणशी बसा बसा? ॥३॥
कां ग द्रव्य मागसी धनलोभे, अजुन तुला नाहीं ठावें ? ।
शहाणपणाची गोष्ट ऐक तूं, गुणि जनास भोगूं द्यावें ।
ज्याचें चांगुलपण त्याला तें, आपल्याला तें कशास हवें ।
नलगे मिठाई तुला सुखानें, राताळें भाजुनि खावें ॥४॥
प्रीतीचें सदावर्त, फल परोपकाराचें घ्यावें ।
माल नासका सवंग विकावा, बरें सांगितलें ऐकावें ।
कवन करी होनाजी बाळा, अज्ञानें पहावा अरसा ।
ही खोली तुज इनाम जागा, नांदत जा वरसोवरसा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP