मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
संताप श्राप हा माफ असावा ...

लावणी १५ वी - संताप श्राप हा माफ असावा ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.

संताप श्राप हा माफ असावा मशीं ।
किति सांगुं स्वहित नित हितगुज तुमचेपशीं ? ॥धृ०॥
वाटते मला, आज चला येकांतीं निजूं ।
सामान सिद्ध, शेजेवर होते रुजूं ।
मम सौख्यधुरंधरनिधी म्हणून किती भजूं ? ।
तुमच्या विरहित मी पाय कुणाचे पुजूं ? ।
मजविषयीं कांहीं तिळमात्र नका गजबजूं ।
प्रीतीच्या स्थळीं भाषण बोलावें रुजूं ।
आज्ञेंत सिद्ध, उभी राह्ते मी मागेंपुढें
पुण्याइ सबळ, यशवंत माझे चुडे
थोरासंगें दुर्बळास पाणी चढे
सापडे वस्त अंधा न मिळवितां जशी ॥१॥
तुम्ही माझे समूळ सौभाग्याचे अधिपती ।
तपसाध्य जसें सूर्यबिंब आलें हातीं ।
हा ढग वळला, मन धाले मेघामृतीं ।
पदोपदीं विनंतीच्या करिते आवृत्ती ।
मोहिलें रूपाकडे, चित्त चंचळ व्यावृत्ती ।
जळो माझी दृष्ट लागेल मुखचंद्राप्रती ।
कोणती सवत अशी मजवर चढ भेटली ?
नवि नवि बरी चव गोड तिची वाटली
हें शास्त्र आवडतें, रीत सांगा कोठली ?
गांठली वेळ, श्रम केले जातीनिशीं ॥२॥
विश्वास वृक्ष विस्तीर्ण पूर्ण सागरा ।
चतुरस्र निपुण गुणविद्येच्या आगरा ।
हे सत्यशील सर्वज्ञ सर्वसुगरा ।
जिवप्राण सख्या, तूं बाण मदनमोगरा ।
लागला छंद अति, सुगंध मैलागरा ।
मेजवानी करिन, कधिं येतां माझ्या घरा ? ।
एकनिष्ठपणें म्या संधिसमय साधिला
निष्कपट निकट निळकंठ आराधिलां
सर्वस्वें अतां हा देह पदरि बांधिला
बोधिला बोध, कानमंत्रा पहिले दिशीं ॥३॥
मायासमुद्र थोर ओघ आला वळुन ।
पाण्यांत पाणी एक जैसें गेलें मिळुन ।
पाहिजे तशी पाहिली मला छळछळुन ।
शिरोमणि कंठिंचा हरिं धरिते आवळुन ।
घ्या भोग अविट, हा घट भरला जळमळुन ।
परिपव्क सुरस नवतीचा घ्यावा पिसुन ।
अर्धांग शयन विधिनिर्मित झालें वतन
अंगुष्ट चरणरज माझें पंचायतन
ठेविली सुखी, आजवर मज केलें जतन
होनाजी बाळा म्हणे, मदनमोहो लाविसी ।
सर्वथा अतां अंतर गडे न करूं तुशी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP