येक राजा चंद्रभान चंपावत नगर । तेथें वामन ब्राह्मण, कमळजा नार ॥धृ०॥
वामन ब्राह्मण हो शिवभक्त । शिवभक्त त्याला सोमवारचें व्रत । अहो व्रतपूजा करितो देवळांत । तेथें आली अकस्मात मदनपुतळी । तिचा गोरा वर्ण अधिक चांफेकळी । तिनें सदाशिव पुजिला तिळ तांदुळीं । तो भटजीबावा उभा देवळाजवळी । त्याला पाहुनशान हसली राजबाळी । करि लुगडयाचा गुंडाळा ठेवी शिरकमळीं । असी खुण दाउनी गेली वरचेवर । तो भटजीबाव मनीं करी विचार ॥१॥
घरासी आला वामनभट, अहो भट । आपुल्या स्त्रीसी सांगे गोष्ट, अहो गोष्ट । ‘देवळा आली येक परिवंट । तिनें पुजला निळकंठ सदाशिव भोळा । होता नवरत्नांचा हार तिच्या गळां । ती मजकडे पाहुन हसली राजबाळा । शिरिं ठेउनशान गेली चंद्रकळा । जशी वीज चमकली गेली वरचेवर । कधीं भेटेल ? मजला धरवेना गे धीर’ ॥२॥
कमळजा म्हणे, ‘ऐक तूं आतां, अहो आतां । मुगुटमणी तिचा पिता, अहो पिता । बंगल्या दरवाज्यावरतां । तेथें जावें प्राणनाथ, वेगि तांतडी । त्या मुगुटमणीच्या म्होरे पातडें सोडी’ । तेथें आली येक सुंदर, त्या पाहून डोळे मोडी । त्या समोर बसली होती घेउन चुनखडी । तिनें चुन्याची वाटोळी रेघ वोडिली । तेथें तांदळाचे ढीग केले चार । येका ढिगाचें मोडुनी गेली शिखर ॥३॥
रेग वोढिली ती आयाळ नगर, अहो नगर । तांदळाचे ढीग चार, अहो चार । देउळ अंबेचें मोडकें शिखर । खुण दाविली तेथें यावें संध्याकाळीं, इशारत केली । त्या ब्राह्मणाला चटपट लागोनी गेली । जाहाला संध्याकाळ, दिवस अस्तानें बुडी दिली । देवळांत बसला, अर्धरात जाली । तेव्हा सुंदर आली, जशी वीज चमकली । ती एकाएकीं देवळांत रिघाली । त्याला पाहुनशान संतोषली नार । म्हणे, ‘चातुर शाहाणा बुद्धीचा सागर’ ॥४॥
नाना परि कौतुकें केली, अहो केलीं । गावांबाहीर गस्त आली, अहो आली । दोघे देवळांत धरियेली । सुंदर कामिन बोलली त्या ब्राह्मणासी । म्हणे, ‘सख्या सजणा, पुढें गत होईल कैसी ?’ । तो म्हणे, ‘घरचे रांडेनं पाडीले फांसी ?’ । सुंदर हात लावी कपाळासी । म्हणे, ‘बैला रे, त्वां कसें घेतलें घर ?’ । सांग नगरामध्यें कोठें तुझें मंदीर ?’ ॥५॥
ब्राह्मण म्हणे, ‘ऐक साजणी साजणी । मारवाडयांत कमळजा राणी, अहो राणी । तुजसारिखी चातुर शहाणी । सुंदरा काय करिते करणी ऐकोनी उत्तर । मनांत विकल्प धरूं नको थोर । जा, मारवाडयामध्यें हांका मार । कोणाचें वढाळ गुरूं चुकलें थोर ? । तेणें वळइ नासली येक मातबर । तेणें गाई गोविली आपणाबरोबर । नाहीं दिवस उगवला सोडुन न्या लौकर । मग कळेल धन्याला, येईल कानावर’ ॥६॥
तेव्हां तो जाउनीयां म्हातारा म्हातारा । मारवाडयांत पिटी डांगोरा । ‘कोणाचें वढाळ गुरूं चुकलें थोर ? । तेणें वळई नासली येक मातबर । तेणें गाई गोविली आपणाबरोबर’ । तेव्हां त्या सुंदरीनें आइकिलें उत्तर । कोणाचे वढाळ गुरूं धरिलें कोणी । त्या चतुर नारिनें धाडिले सांगोनी । मग सोळाही शृंगार करी पद्मीण । घे पंचारती, निघाली तेथुन । तेव्हां येतां देखिली त्या गस्त करानं । ‘तूं कोठुन आलीस ? जा मागें फिरून’ । ती म्हणे, ‘नवस म्या केला कठीण । हा चुकल्यावर अवघीं जाती मरून । जसी जात्यें तैसी येत्यें वरचेवर’ । मग देवळांत ती प्रवेशली सुंदर ॥७॥
मुगुटमणी कन्या बोलिली ‘काई, अगे काई । बरवे घर घेतलें बाई, अगे बाई’ । कमळजा म्हणे ‘चिंता नाहीं’ । मग सोळाही शृंगार दिले उतरून । ‘घे पंचारति. जा वेगीं येथुन’ । असा कावा करून दिली तिला तिला लाउन । दिवस उगवला, नेलीं दोनी धरून । ती सज्ज दारीं उभी केली नेउन । लोक म्हणती, ‘या राज्याची बरवी करणी । दोघें अस्त्री पुरुषें आणिलीं धरुनी’ । वेताळ म्हणे विक्रमा कर उगवणी । या दोघींत नार कोण चतुर शाणी ? । म्हणे भवानी साळी जुनेरकर । त्या ब्राह्मणाची फार चातुर नार ॥८॥