मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६३६ ते ६४०

पदसंग्रह - पदे ६३६ ते ६४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६३६.
करील तें काय नव्हे राघव ॥ध्रु०॥
जेणें पाण्याचे पुतळे करुनी ऐकवितो दाखवितो रे ॥ तोचि कर्ता तोचि अकर्ता मूढ मीपण धरितो ॥१॥
एका जीववी दुग्धें एका स्मरणें एका द्दष्टीं रे ॥ एका पाषाणीं पुरवी साखर एका जीववी वृष्टीं ॥२॥
वातांबु पर्णाशनें ॥ एका अन्नें मुक्ता फळीं एका हरलें खदिरांगारें रे ॥ निजानंदें एक रंगुनि ठेले केलीं तृणचरें रे ॥३॥

पद ६३७.
भगवत्स्मरण करा जी भजनीं भाव धरा जी ॥ध्रु०॥
दुर्लभ नरतनुचें आयुष्य पळ पळ निष्फळ जातें ॥ हरिस्मरणेंविण सर्व निरर्थक केलें तितुकें होतें ॥१॥
धन सुत दार परिग्रह हे तों नयेति कामा कोणी ॥ देखत अंध ऐकत बधिर होउनि कां जी श्रवणीं ॥२॥
विद्या कळा विक्रम वैभव नामरुप इहलोकीं ॥ क्षणभंगुर जड द्दश्य विकारी जड मूढ जन न विलोकी ॥३॥
विस्मरणें संसरणें जन्म मरणें भोगिती प्राणी ॥ स्मरणें भवनिधी तरणें वरणें चिन्मयपद निर्वाणीं ॥४॥
सहज पूर्ण निजरंग रंगतो संग भंमतो स्मरणें ॥ प्रार्थितसों ह्मणवुनियां काया वाचा अंत:करणें ॥५॥

पद ६३८.
सावधान रे ॥ध्रु०॥
काय सुधारस पान हें मना दुर्घट हा संसार ॥ हरि स्मर ॥ दुस्तर या रे भवाब्धिचा केवीं पावसी तूं पर पार ॥
इह परत्रींचे साजणें क्षणभंगुर दु:ख अपार विषकंदां परि गोड हा वर्म जाणे वीर झुंझार ॥ हरी स्मर ॥१॥
इंद्रिय वर्ग संसर्ग रे यांचा संग सुखावह काय ॥ अंजुळिंचें जळ यापरि अति चंचळ आयुष्य जाय ॥
स्वार्थकर देह संबंधियांचा लौभ तो परम अपाय ॥ दीनबंधु गुरुराय रे धरि धरि पाय हा सार उपाय ॥२॥
सर्वज्ञ दयसिंधू हा याचा सांप्रदाय शुद्ध ज्ञान ॥ साधनयुद्ध स्वभक्ती रे उपदेशुनि निरसी अज्ञान सत्यज्ञानानंत अक्षयी तुज होईल ॥ पूर्ण विज्ञान ॥ रंगें रंगें यांचे चरणी निजानंद हा करुणा निधान ॥३॥

पद ६३९. [दत्तपंचक.]
चित्सूर्योदय जाहला भवनिशी नासूनियां द्वैत हो ॥ लीलाविग्रह पूर्ण ब्रह्म परमात्मा श्रीगुरूदत्तहो ॥
गेले कल्प असंख्य होउनि निन्हीं नेणेचि माया माया ॥ साष्टांगें प्रणिपात हा करित मी त्या देव दत्तात्रया ॥१॥
ब्रह्माविष्णुसदाशिवात्मक त्निधा ऐक्यासि आला असे ॥ नोहे गोचर द्दश्य द्दष्टिसि कदां जो ज्ञान लक्षी दिसे ॥
तो हा चिद्रुप संचला गुरुरुपें दीनासि तारावया ॥ साष्टांगें प्रणिपात हा करित मी त्या देव दत्तत्नया ॥२॥
झाला सद्रुरु देव दत्त ह्मणती सद्भक्त ज्ञानी मनीं ॥ साधु संत उपासिती दिननिशीं सच्छिष्य भावें मनीं ॥
होतां दर्शन पाप ताप निरशी सायुज्य देऊनियां ॥ साष्टांगें प्रणिपात हा करित मी त्या देव दत्तात्रया ॥३॥
भिक्षेचें स्थळ योजिलें करविरीं निद्रेसि मातापुरी ॥ स्नानालगिं करी त्वरा शिवपुरीं भागीरथीचे तिरीं ॥
ऐसा हा अवतार तारक भवाब्धीमाजि तारावया ॥ साष्टांगें प्रणिपात हा करित मी त्या देव दत्तात्रया ॥४॥
ज्याचें ध्यान मनीं प्रबोधसमयीं सूर्योदयीं ज्या घडे ॥ भावें नाम पठे निरंतर मुखें तो मुक्ति माथां चढें ॥
पूर्णानंदपदीं रमे निजसुखें व्यापोनि लोकत्रया ॥ साष्टांगें प्रणिप्रात हा करित मी त्या देव दत्तात्रया ॥५॥

पद ६४०. [राग भूप]
दयासिंधु हरी दीनबंधु रामा पूर्णकामा ॥ध्रु०॥
हरुनि जन्ममरणत्रपा ॥ करुनि मजवरी कृपा ॥
दुर्धर षडरिपुसमूह पाववी विरामा पूर्ण कामा ॥१॥
पतितपावना ॥ मानुनी भरंवसा मना ॥
चरणरजें उद्धरिली गौतममुमिरामा पूर्णकामा ॥२॥
सहज पूर्णानंदा ॥ निजरंगा निर्द्वंद्वा ॥
स्थापिसि निजपदीं सुभाव विभिषणामिरामा पूर्णकामा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP