मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४७१ ते ४७५

पदसंग्रह - पदे ४७१ ते ४७५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४७१. [चाल-मात: स्वामिणी या]
खरसम नर तो कीं ॥ मानवलोकीं अवलोकीं ॥ध्रु०॥
पावुनियां उत्तम नरकाया ॥ सेवितसे भवतम-नरका या ॥१॥
अंत:करणीं विहिताचरणीं ॥ मूर्ख पराङमुख हरिगुरुभजनीं ॥२॥
सहज पूर्ण निजरंग उपेक्षी ॥ द्दश्य उकरडा फुंकुनि भक्षी ॥३॥

पद ४७२. [काशीबाआण्णाकृत]
खरसम नर कीं तो ॥ शोभत वरि परि नरकीं तो ॥ध्रु०॥
भक्ति विरक्ति विवेकहि नाहीं ॥ अविधि आचरण मानवदेहीं ॥१॥
स्वानंदामृत लोटुनि पायें ॥ सेवित विषवत्‌ विषय उपायें ॥२॥
विषय शिणे परि न शिणे चित्तीं ॥ पश्वात्ताप नसे कल्पांतीं ॥३॥
स्वगुण दोष न विचारी मननीं ॥ तत्पर जो परदोषदर्शनीं ॥४॥
श्रीरंगानुजतनुज तयाला ॥ देखुनियां मनिं विस्मित झाला ॥५॥

पद ४७३.
आतां वसुधातळहि बुडो वैर हें नभमंडळहि पडो ॥ निश्वय कीं निजराम भजावा  तो सहसा न उडो ॥ध्रु०॥
शेवटली पाळी येणें गोड करूं समुळीं ॥ आन उपाय नसे ये काळीं ध्यावा वनमाळी ॥१॥
असेल प्रारब्धीं हें तों न चुके कर्म कधीं ॥ मृगजळास्तव क्लेशी होणें विणमत्वें बुद्धि ॥२॥
मज ह्मणो वेडे परि न पाहें त्यांकडे ॥ साधन तें साधावें जेणें परम पद जोडे ॥३॥
उरलें हें करणें भजनीं लावावीं करणें ॥ लक्ष चौर्‍यायशीं जन्माचें येथें संकट निस्तरणे ॥४॥
निजरंगा  बापा मजवरि करिं गा अनुकंपा ॥ विश्चयानिश्चय तूं देता पथ दावुनि सोपा ॥५॥

पद ४७४.
नवविध भजन घडो ॥ तुझिये स्वरुपीं प्रीति जडो ॥
विषयोन्मुख मन उन्मन होउनि स्वस्वरुपीं मुरडो ॥ तुझिये ॥ध्रु०॥
सत्संगीत आवडो पाउला सन्मार्गींच पडो ॥ विश्वपटीं चित्तंतू एकचि द्दष्ट अशी उघडो ॥ तुझि० ॥१॥
निजशेझे पहुडो मति हे सुखसिंधूंत बुडो ॥ याविरहित जरि आन मागें न मागो जिव्हा समूळ झडो ॥ तुझि० ॥२॥
पूर्ण रंग आवडो जग दाभास समूळ बुडो ॥ हारपलें निजधन तों माझें मजला सांपडो ॥तु०॥३॥

पद ४७५. [चाल-केला निश्चय हाचि०]
साजणी श्रीगुरुराज धणी असतां कळिकाळा न गणीं ॥ काय उणें मज केलें तेणें झालें पट्टराणी ॥ध्रु०॥
जातां एकांता समुळीं हारपलि चिंता समूळीं ॥ जिकडे पाहे तिकडे अवघी सत्ता कोंदली ॥१॥
मीच पुढें मागें याहि संकल्पा ने घे ॥ परात्पर सद्वैतीं कैंची दोघे आणि चौघे ॥२॥
पूर्ण निजानंदें रंगीं रंगुनि स्वच्छंदें ॥ सहज सुखें विचरों गिरिशिखरीं होउनि निर्द्वंद्वें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP