मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २१६ ते २२०

पदसंग्रह - पदे २१६ ते २२०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २१६. (चाल-बोलणें फोल झालें.)
राया हरिची माया दुस्तरतर सुर नर बुडवी ॥धृ०॥
शूक म्हणे परिक्षिती ॥ हरिपदीं मुनि मन संरक्षिती ॥
जग हें मृगजळवत्‌ लक्षिती ॥ त्यांला देखुनि मुख दडवी ॥१॥
सुरनर पन्नग भुवनत्रयीं ॥ भुअलवुनि पाडित दुर्घट विषयीं ॥
हर्षामर्षें ठायीं ठायीं ॥ घडि घडि हांसवि रडवी ॥२॥
भुतां वैर परस्परें ॥ असतां ऐक्य निर्मत्सरें ॥
करुनी सूक्ष्म स्थूळ शरिरं ॥ कर्में शुभाशुभें घडवी ॥३॥
मेरुतुल्य अनुष्ठान ॥ करितां देखुनि तपोधन ॥
त्यासि कामक्रोध लावुन ॥ पुण्य क्षणमात्रें उडवी ॥४॥
हरिजन हरिभजनें हरिमाया ॥ जाणती चित्नतरूचि छाया ॥
हरिपदीं न रंगती जे तयां ॥ पदोपदीं मग अडवी ॥५॥

पद २१७.
तरी तृप्ति न बाणे सहसा वारिजनाभ जनाची ॥
अनन्य भावें प्रीति निरंतर ह्रदयी हरिभजनाची ॥धृ०॥
गुण गण स्तवनीं स्तवितां अनंत लीला अनंताच्या ॥
दशशत वदनीं झाल्या दुखंड जिव्हा अनंताच्या ॥१॥
नेति नेति या अर्थें वेदश्रुति गर्जत होत्या ॥
त्याही विस्मित झाल्या अनंत स्वरूपीं पूर्ण आहुत्या ॥२॥
हरिपद-पद्मपरागीं नारद शुक सनकादिक भृंग ॥
रूंझि करुनियां सदैव सेविति सहज पूर्ण निजरंग ॥३॥

पद २१८.
यापरि इहपर-लोकीं मान्य ते धन्य वनिता ॥धृ०॥
स्वरुप सुंदर सगुण शांत ॥ अंतर्बाह्म शुचिष्मत ॥
अनन्य भावें आद्यंत ॥ सेवा कांत तत्वता ॥१॥
नित्य स्वधर्मानुकूळ ॥ मृदुतर-वचनी क्षमाशीळ ॥
दयावंत चित्तीं निर्मळ ॥ धीर उदार गंभिरता ॥२॥
अतीत अभ्यागत महंत ॥ देव ब्राह्मण साधु संत ॥
अन्नपूर्णा मूर्तिमंत ॥ नेणें द्वैताची वार्ता ॥३॥
सर्वांभूतीं भूतदया ॥ अभेदबुद्धी रंका राया ॥
जैसी मनें वाचा काया ॥ ते अनसूया पतिव्रता ॥४॥
ऐशा लक्षणें लक्षणें लक्षणोक्त ॥ विषयी विरक्त हरिगुरुभक्त ॥
पूर्ण रंगीं नित्य मुक्त ॥ एक ब्रह्मांडीं सत्ता ॥५॥

पद २१९.
क्षिर-निधिजाकांता सत्वरतर आणा गोकुळासी ॥ त्यास्तव आम्ही त्यागिलें यातिकुळासी ॥धृ०॥
गोपि म्हणती उद्धवा माधवा दावीं ॥ त्याचीं चरितें सुखभरितें कवणें वदावीं ॥
जेणें बांधोनि घेतलीं माजीं दावीं ॥ वाटे मौळीं त्याचीं पदपद्में वंदावी ॥१॥
सांब सदाशिव ह्मणे नमो नमो हरि तो ॥ दुर्धर दुस्तरतर दुर्निवार मनमोहरि तो ॥
मोहित अबला बाळा वाजवोनि मोहरि तो ॥ ज्याचे स्वरुपीं ब्रह्मांडें सम मोहरि तो ॥२॥
नयनीं निलोकुं मधुसूदन यमुनापुलिनविहारी ॥ दीनबंधु तो भक्तकाजकैवारी ॥धृ०॥
सगुण सुंदर रूप मनोहर मेघ:शाम  ॥ अंतरसाक्षी पुरुषोत्तम आत्माराम ॥
अनन्य भावें अनुभवितां पूर्णकाम ॥ जनीं जनार्दन तो मुनिजनमन-विश्रान ॥३॥
वृंदावनभुवनीं वेणु वाजवितां ऐकुनि श्रवणीं ॥ तन्मय आम्ही गोपिका अंत:करणीं ॥धृ०॥
अगई संगें गोपाळ संवगडे नाचत जाती ॥ श्रीमुख नयनीं देखतां आनंद चित्तीं ॥४॥
ब्रह्मानंदें आम्ही गोपिका पाहूं जाऊं ॥ सासुरवासिनी निर्लज्ज होउनि गाऊं ॥धृ०॥
ऐशा वियोगें दुश्चित चित्तें करुनी ॥ उद्धवातें प्रार्थिती चरण धरुनी ॥
स्फुंदों स्फुंदों बोलती ममता हरुनी ॥ ह्मणती वोंवाळुं जाऊं गा तुजवरुनी ॥५॥
भेटविं आतां अच्युतानंता गोकुळपाळा ॥ निज नि:संगा श्रीरंगा दीनदयाळा ॥धृ०॥

पद २२०.
गुरुदेवदत्त अनंत ब्रह्मांडीं तुझी सत्ता ॥धृ०॥
विश्वव्यापका विश्वंभरिता ॥ विश्वाधीशा विश्वतीता ॥
प्रमेय प्रमाता प्रमाणरहिता ॥ जगद्रुरू अवधूता ॥१॥
नित्य निरंतर अगमागोचर ॥ परात्परतर सुखदाता ॥
दीनदयाकर दत्त दिगंबर ॥ सत्य ज्ञानानंता ॥२॥
नि:संगा निजरंगा सत्वर ॥ धांवें पावें आतां ॥
निजात्मदर्शन देउनि निरसीं ॥ दुर्जय ममता चिंता ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP