मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३११ ते ३१५

पदसंग्रह - पदे ३११ ते ३१५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३११. (चा. सदर.)
जाणति गुरुपदिंचे अभिलाषी ॥ चिन्मयभुवन-विलासी ॥धृ०॥
बोल सतेजपणें वदनाचे ॥ जे शर भवकदनाचे ॥१॥
आवडिं नाम तयाचें गातां ॥ अनामय पद ये हाता ॥२॥
संगें भवसंगाप्रति हरिलें ॥ देह विदेह सरलें ॥३॥
मानस ठेवियले समचरणीं ॥ तव हरपली नभ-धरणी ॥४॥
निजसुख सत्य ज्ञानानंत ॥ जेथ रंगले संत ॥५॥

पद ३१२. (राग कलंगडा)
याचि पंथें जातां भय नाहीं रे ॥ निश्वय बोलती चारी साही रे ॥धृ०॥
सत्कर्म जागरीं देह जागवा रे ॥ देवद्विज-गुरुदास्य वागवा रे ॥१॥
रामकृष्ण शिव बोला वाचे रे ॥ निंदा अपशब्द त्याग यांचा रे ॥२॥
मानसीं असार सार शोधा रे ॥ निजानंदें रंगुनि तत्त्व बोधा रे ॥३॥

पद ३१३.
तरोनियां तारक तोचि जाहला ॥ कोण मानी मानवी देह त्याला ॥धृ०॥
पियूषाची न पुरे धनी जैसी ॥ गुरुदास्यीं आवडि जयां तैसी ॥१॥
विश्रांतिसी आलिया क्षमा शांति ॥ ऐक्य-बोधें सारिली द्दश्य भ्रांति ॥२॥
स्वसत्तेनें चिद्रुप विश्व पाहे ॥ नित्य पूर्ण एकलेपणें रहे ॥३॥
त्निविध भेद त्रिविध परिछद ॥ निजांगें हा नातळे जया खेद ॥४॥
निजानंदें रंगला सर्व काळीं ॥ मोक्ष पायांचि धुळी धरी भाळीं ॥५॥

पद ३१४. (चा. सदर.)
तें मज दिधलें सभाग्य गुरुरायें ॥ त्याचे उतराई होऊं आतां काय ॥धृ०॥
ब्रह्मा विष्णु महेश तिन्ही देव ॥ ते जें देऊं न शकति स्वयमेव ॥१॥
ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ ॥ संन्याशाचा न पवे जेथें हस्त ॥२॥
तीर्थाटणें करितां धूम्रपान ॥ नाना साधनें न टके पैं जें स्थान ॥३॥
वेद श्रुति राहिल्या मौन जेथें ॥ निजानंदीं मीनला रंग तेथें ॥४॥

पद ३१५. (चा. सदर.)
माझे प्राचीन तोडीं देवराया ॥ वेळोंवेळां लागेन तुझिया पायां रे ॥धृ०॥
तुझे पाय़ीं आवडी माझी मोठी ॥ तोंडभरी सांगेन तुजशीं गोष्टी ॥१॥
माझें प्राचीन अनावर पाही ॥ तुला तोडितां वेळ नलगे कांहीं ॥२॥
देवराया कांसया रुसलासी ॥ मी तव अनन्य शरण तुझी दासी ॥३॥
मायबापा वियोग सहावेना ॥ तुजवीणं क्षणभरहि राहावेना ॥४॥
तुझे पायीं रंगलों कृपा करीं ॥ निजानंद तूं जनक जननी बरी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP